
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये चालू असलेल्या सुरक्षा कारवाईच्या अंतर्गत सुरक्षादलांनी राज्यातील विविध डोंगराळ आणि खोर्यांतील जिल्ह्यांत व्यापक शोधमोहीम राबवली. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या कारवाईत एकूण २९ शस्त्रे, ५० स्फोटके आणि इतर सैन्य साहित्य जप्त करण्यात आले. सुरक्षायंत्रणांसाठी हे मोठे यश मानले जात असून यामुळे संभाव्य हिंसक कारवाया रोखण्यास साहाय्य होणार आहे. आसाममधील निवडणुकीपूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याच्या शेजारी मणीपूर राज्यात शस्त्रे आणि स्फोटके जप्त होणे, ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
तेंगनुपाल जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई
भारत-म्यानमार सीमेजवळील असलेल्या तेंगनुपाल जिल्ह्यातील लोइसी आणि सैवोम गावांच्या परिसरातून २९ स्फोटके, ५ हँड ग्रेनेड, ५ विद्युत् डेटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. या जिल्ह्यातील यांगौबुंग गावातही शोधमोहीम राबवण्यात आली. तेथून १२ स्फोटके, ४ रेडिओ संच, ३ पिस्तुले आणि १ ग्रेनेड प्रक्षेपक जप्त करण्यात आला. एस्.एल्. झौगम परिसरातून ९ तात्पुरती स्फोटके, १ पिस्तूल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सर्व स्फोटक उपकरणे सुरक्षा नियमांचे पालन करून घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.
अन्य जिल्ह्यांतही कारवाई
१. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामदेंग आणि कामेंग भागांत सुरक्षादलांना मोठे यश मिळाले असून तेथून ११ पिस्तुले, ८५ काडतुसे, ४ बुलेटप्रूफ जॅकेट आणि ३ इतर शस्त्रे जप्त करण्यात आली.
२. थौबल जिल्ह्यातील टेकचम संजी चिंग पर्वताच्या पायथ्याशीही ५ अग्नीशस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
३. काकचिंग जिल्ह्यातील वाबागई तुरेल मामेई परिसरात राबवलेल्या विशेष कारवाईत एक एके-५६ रायफलीसह ६ अग्नीशस्त्रे, ३ हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
शोधमोहिमेचा उद्देश आणि परिणाम
सुमारे २ वर्षांपूर्वी उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर मणीपूरमध्ये सुरक्षादलांकडून सतत शोधमोहिमा राबवण्यात येत आहेत. सुरक्षादलांच्या या कारवाईचा उद्देश बेकायदेशीर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करून राज्यात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करणे हा आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !