UP Namaz On Road : रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांचे पारपत्र रहित होणार !

उत्तरप्रदेशातील मेरठ पोलीस प्रमुखांची चेतावणी

मेरठ (उत्तरप्रदेश) –  येथे रस्त्यावर नमाजपठण करण्याविषयी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. शहराचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक विपिन टाडा यांनी चेतावणी दिली आहे की, सार्वजनिक रस्ते अडवून नमाजपठण केल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई होईल आणि त्यांचे पारपत्रही रहित होतील.

१. मेरठ पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, धार्मिक प्रार्थना केवळ निर्धारित स्थळीच कराव्यात. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी जमाव करून नमाजपठण करण्यास अनुमती नाही. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी ही भूमिका घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

२. ‘रस्त्यावर नमाजपठण केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवले जाऊ शकतात. अशा प्रकरणांची नोंद सरकारी अभिलेखांत राहू शकते आणि त्याचा परिणाम पारपत्र पडताळणी किंवा विदेश प्रवासाशी संबंधित प्रक्रियांवर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे’, असे आवाहन करण्यात आले.

३. धार्मिक कार्यक्रमांसाठी स्थानिक अधिकार्‍यांची पूर्वअनुमती घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती मोठ्या संख्येने जमणे टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशीही चेतावणी देण्यात आली आहे.