‘हिंदु दिनदर्शिके’चे मुंबई महापौरांच्या हस्ते प्रकाशन !

‘हिंदु दिनदर्शिके’चे प्रकाशन करतांना महापौर रितु तावडे आणि अन्य

मुंबई – बाजारात मिळणार्‍या बहुतांश दिनदर्शिका सौर कालगणनेनुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशा सिद्ध केलेल्या असतात. आर्थिक वर्षाचा आरंभ एप्रिलपासून होत असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित आस्थापने १ एप्रिल ते ३१ मार्च अशा दिनदर्शिका प्रकाशित करतात. कुर्ल्यातील नववर्ष स्वागतयात्रा समितीने मात्र या सर्वांना छेद देऊन शालिवाहन शक अर्थात् हिंदु नववर्ष चालू होते, त्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडवा ते फाल्गुन अमावास्या अशी दिनदर्शिका सिद्ध केली आहे. यंदाच्या हिंदु दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

जगातील सर्वांत प्राचीन आणि प्रगत अशा हिंदु संस्कृतीचे, ऋषिमुनींनी मांडलेल्या प्रगत कालगणनेचे, तसेच तिथीनुसार येणारे सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांचे महत्त्व हिंदूंना कळावे, हिंदूंनी त्यांचे वाढदिवस आदी विधी तिथीनुसार साजरे करावेत आणि तिथींचे महत्त्व त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.

या अभिनव संकल्पनेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. हिंदु कालगणनेनुसार बनवण्यात आलेल्या या दिनदर्शिकेमध्ये वर्षभरात येणार्‍या हिंदु तिथी, सण, धार्मिक उत्सव, व्रते ठळकपणे मांडण्यात आले आहेत. या वेळी मुंबईतील टिळकनगर येथील नगरसेवक सुषमा सावंत आणि ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’चे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदु दिनदर्शिकेचे स्वागतमूल्य २५ रुपये ठेवण्यात आले असून ज्यांना दिनदर्शिका घरपोच हवी आहे, त्यांनी ९५२४४ ०००७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समिती, कुर्ला यांनी केले आहे.