Kavya Maran : ‘सनरायझर्स लीड्स’च्या मालकीण काव्या मारन यांनी पाकिस्तानी खेळाडूला घेतले विकत !

इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत मारन यांचा ‘सनरायझर्स लीड्स’चा संघ

काव्या मारन व अबरार अहमद

नवी देहली – ‘इंडियन प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धे’तील सनरायझर्स हैदराबाद क्रिकेट संघाच्या मालकीण काव्या मारन (‘सन टीव्ही’च्या मालकीण) यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमद याला इंग्लंड येथील त्यांच्या संघासाठी विकत घेतले आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्‍या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये ‘सनरायझर्स लीड्स’ हा काव्या मारन यांच्या मालकीचा संघ आहे. १२ मार्च या दिवशी ‘द हंड्रेड’ लीगसाठी लिलाव झाला. २ लाख ५५ सहस्र डॉलर मोजून अबरार अहमद याला विकत घेण्यात आले. ‘द हंड्रेड’मध्ये प्रथमच भारतीय मालकीच्या संघाने एका पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतले आहे. यावरून भारतात वाद चालू झाला आहे.

सामाजिक माध्यमांवर अनेक जण सनरायजर्स हैदराबाद आणि त्यांची मालकीण काव्या मारन यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय भावनांचा सन्मान न केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे सनरायजर्स लीड्सचे ‘एक्स’ खाते अचानक बंद करण्यात आले आहे. संघ मालकांनी अजून यावर उत्तर दिलेले नाही. यावर आता सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल विटोरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, ‘द हंड्रेड’च्या लिलावात आम्ही अदिल रशिदला (अफगाणिस्तानचा खेळाडू) विकत घेऊ शकलो नाही; म्हणून त्याच्याजागी अबरार अहमदला घेतले.

संपादकीय भूमिका

भारताच्या शत्रूदेशाच्या खेळाडूला कोट्यवधी रुपये देऊन विकत घेणार्‍या मारन यांच्या ‘इंडियन प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धे’तील ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघावर आता बंदीची मागणी जनतेने केली पाहिजे !