Dr. (Mrs.) Medha Kulkarni : ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीचा ‘मंदिर शहर विकास आराखड्या’त समावेश करा !

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली आग्रही मागणी

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि वारकरी संप्रदायाचा प्राण असलेली संतश्री ज्ञानोबा माऊली. त्यांचे ‘संतश्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर’ आळंदीत आहे. या ‘पवित्र आळंदी नगरी’चा समावेश केंद्र सरकारच्या ‘मंदिर शहर विकास आराखड्या’त करावा, अशी आग्रही मागणी भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘केंद्र सरकारच्या आगामी धोरणात्मक संधीचा लाभ आळंदीला मिळाल्यास या तीर्थक्षेत्राचा कायापालट होऊन भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील’, असे कुलकर्णी यांनी ‘विशेष उल्लेखा’द्वारे राज्यसभेत म्हटले.

  • संसदेत मांडलेली महत्त्वाची सूत्रे !

  • पायाभूत सुविधांवरील ताण दूर करण्याची आवश्यकता !

आळंदी हे देशातील अत्यंत पूजनीय तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी यांच्या निमित्ताने येथे लाखो भाविक येतात. या अलोट गर्दीमुळे स्थानिक नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि पर्यावरणीय संसाधने यांवर प्रचंड ताण येतो. हा ताण अल्प करण्यासाठी नियोजित विकासाची आवश्यकता आहे.

अनियोजित शहरीकरणाचे आव्हान !

राष्ट्रीय स्तरावर आध्यात्मिक महत्त्व असूनही आजही आळंदीला अनियोजित शहरीकरण आणि अपुर्‍या पायाभूत सुविधा यांचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात ‘टीयर-२’ शहरे आणि मंदिर शहरांच्या विकासावर जो भर दिला आहे, ती या समस्या सोडवण्याची सर्वाेत्तम संधी आहे. (‘टीयर-२’ शहरे ही भारतातील अशी वेगाने विकसित होणारी शहरे आहेत, ज्यांची लोकसंख्या साधारणपणे १ ते ५ लाख यांमध्ये असते. ही शहरे महानगरांच्या खालोखाल असतात.)

इंद्रायणी नदीचे प्रदूषण आणि पुनरुज्जीवन

आळंदीची ओळख पवित्र इंद्रायणी नदीशी अविभाज्यपणे जोडलेली आहे. सद्य:स्थितीत नदीचे प्रदूषण रोखणे आणि तिचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मंदिर शहर’ (टेम्पल टाऊन) दर्जा मिळाल्यास ‘रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट’ (नदीलगतच्या भागाचा विकास) आणि पूर नियंत्रण यांसाठी एकात्मिक नियोजन करणे शक्य होईल.

‘मंदिर शहर’ दर्जा मिळाल्यास होणारे लाभ !

१. भाविकांसाठी सोयी : स्वच्छ पाणी, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे आधुनिक प्रकल्प होतील.

२. वाहतूक सुधारणा : सुसज्ज वाहनतळ व्यवस्था, रस्ते जोडणी आणि सार्वजनिक वाहतुकीचे बळकटीकरण

३. वारसा जतन : आळंदीचा आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करून आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी

४. जीवनमानात सुधार : स्थानिक रहिवाशांचे आरोग्य आणि जीवनमान यांत सुधारणा होईल.