Amul Expired Goods : ‘एक्सपायरी डेट’ संपलेले अमूल आस्थापनाचे दीड लाख किलो खाद्यपदार्थ नष्ट !

  • एफ्.एस्.एस्.ए.आय. कडून ४ दिवस चालू होती नष्ट करण्याची कारवाई

  • पदार्थांवरील ‘एक्सपायरी डेट’ पालटून तो नव्याने विकण्याचा चालू होता प्रयत्न

(‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण)

जयपूर (राजस्थान) – येथे ‘एक्सपायरी डेट’ उलटून गेलेली अमूल आस्थापनाची तब्बल दीड लाख किलो खाद्य उत्पादने जप्त करून नष्ट करण्यात आली. एफ्.एस्.एस्.ए.आय. विभागाने कारवाई करून हा मोठा साठा नष्ट केला. एवढा माल नष्ट करण्यासाठी ४ दिवस लागले. एकूण २७ ट्रक भरेल एवढा हा माल होता. ही कारवाई जयपूरच्या खो नागोरियन परिसरातील एका गोदामावर धाड घालून करण्यात आली. तपासात मोठ्या प्रमाणात कालबाह्य खाद्यपदार्थ साठवून त्यावरील ‘एक्सपायरी डेट’ पुसून नवीन दिनांक छापून बाजारात विक्री करण्याची सिद्धता चालू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती.

तपासाच्या वेळी अधिकार्‍यांना अनुमाने १२ सहस्र कार्टन (खोकी) कालबाह्य उत्पादने सापडली. यांपैकी अनुमाने ३ सहस्र ‘कार्टन’मधील पाकिटांवरील ‘एक्स्पायरी डेट’ पुसल्याचे आढळले. गोदामातून थिनर, ॲसिटोन आणि इतर रसायनेही जप्त करण्यात आली. ही रसायने पाकिटांवरील जुना दिनांक काढून टाकण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय आहे.

संपादकीय भूमिका

  • खाण्यायोग्य नसलेला एवढा माल जनतेच्या माथी बडवला जाणार होता, हे अमूल आस्थापनाचे मालक अथवा उच्चपदस्थ अधिकारी यांना ठाऊक नसेल, हे शक्य नाही.  त्यामुळे आता सरकारने यावरून संबंधित अधिकार्‍यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे !
  • अशा घटनांतून असे प्रकार सर्वच आस्थापनांकडून सर्रास होतात कि काय, अशी शंका कुणा नागरिकाच्या मनात आली, तर त्यास कुणाला उत्तरदायी धरले पाहिजे – आस्थापनांना, व्यवस्थेला कि अन्य कुणाला ?