(म्हणे) ‘राजकारण्यांसमवेत मद्य न पिणारा पत्रकारच नाही !’ – Dinesh Amin Mattu

कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मद्याच्या मेजवानीचे वरिष्ठ पत्रकार दिनेश अमीन मट्टू यांचे समर्थन

पत्रकार दिनेश अमीन मट्टू

बेंगळुरू (कर्नाटक) –  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच पत्रकारांसाठी आयोजित केलेली अर्थसंकल्पापूर्वीची मद्याची मेजवानी सध्या राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक माध्यमे यांवर  मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. या वादावर मुख्यमंत्र्यांचे माजी माध्यम सल्लागार आणि ज्येष्ठ पत्रकार दिनेश अमीन मट्टू यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना अशा मेजवान्यांचे जोरदार समर्थन केले आहे. ‘मद्यपान करण्याची सवय असलेल्या कोणत्याही कार्यरत पत्रकाराने जर राजकारण्यांसमवेत दारू प्यायली नसेल, तर तो पत्रकारच नाही’, असे मट्टू यांनी ‘ठणकावून’ सांगितले.

‘आतील’ बातम्यांसाठी मेजवान्यांना जाणे आवश्यक !

‘राजकारणी आणि पत्रकार यांच्यातील अशा मेजवान्यांचा संबंध आजचा नाही, तर तो दोन्ही ‘व्यवसाय’ चालू झाल्यापासून चालत आला आहे. पत्रकार परिषदांमध्ये केवळ अधिकृत बातम्याच मिळतात; पण बातमीमागचे खरे सत्य आणि गुपिते अशा जेवण आणि मद्य यांच्या मेजवान्यांतूनच बाहेर येतात. मद्यपान केल्यावर माणूस थोडा भावूक आणि प्रामाणिक होतो. त्या वेळी त्याच्याकडून बाहेर पडणार्‍या जुन्या आठवणी आणि सत्य घटना एका व्यावसायिक वार्ताहरासाठी अत्यंत मौल्यवान माहिती असते. केवळ चहा किंवा लिंबाचा रस घेऊन अशा सखोल बातम्या गोळा करणे शक्य नाही’, असे सांगत मट्टू यांनी सांगितले.

‘ही ‘संस्कृती’ सिद्धरामय्या यांच्यापासून प्रारंभ झालेली नाही. माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अरसु हेही ज्येष्ठ पत्रकारांना बोलावून महागड्या मद्यासह जेवण देत विचारविनिमय करत असत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत अनंतकुमार हे देहलीमध्ये पत्रकारांसाठी मद्याची मेजवानी आयोजित करत असत; पण ते स्वतः मात्र लिंबाचा रस घेऊन बसत असत, असा रंजक किस्साही मट्टू यांनी सांगितला.

सरकारी तिजोरीतून पैसा जात नाही

मट्टू यांच्या मते, सिद्धरामय्या यांना मद्याची फारशी आवड नाही. विरोधी पक्षनेते असतांना ते मद्यपान करत नसत. अलीकडच्या वर्षांत मद्याविषयी त्यांचा संकोच अल्प झाला असून मेजवान्यांमध्ये ते एक छोटा पेग (घोट) घेतात. त्यानंतर सर्वांशी बोलून ते निघून जातात. तसेच अशा मेजवान्यांसाठी सरकारी तिजोरीतून पैसा जात नाही, तर एखादे मंत्री त्याचा खर्च देतात, असे त्यांनी स्पष्ट केले. (मंत्री हा खर्च करण्यासाठी पैसे कुठून आणणात, हे जनतेला वेगळे सांगायला नको ! – संपादक)

(म्हणे) ‘मद्याच्या मेजवानीचे छायाचित्र काढून प्रसारित करणारा पत्रकार दायित्वशून्य !’

मट्टू यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात अशा मेजवान्यांमध्ये मद्याच्या बाटल्या आणि ग्लास कॅमेर्‍याच्या नजरेस पडणार नाहीत, याची मी काळजी घेत असे. मुख्यमंत्र्यांनी मेजवानी आयोजित करणे, हा कोणताही गुन्हा नाही; मात्र तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने त्या खासगी क्षणांचे छायाचित्र काढून दायित्वशून्यतेने सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणे, हा गुन्हा नसला, तरी ते नक्कीच सभ्यपणाचे वर्तन नाही, अशी तीव्र नाराजी दिनेश अमीन मट्टू यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

मद्य पिणे न पिणे हे प्रत्येकाचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले, तरी त्याचे अशा प्रकारे समर्थन करणे चुकीचे आहे. राजकारणी मद्य पाजून आणि पैशांची पाकिटे देऊन पत्रकारांना बटिक बनवतात आणि असे पत्रकार कशा प्रकारची पत्रकारिता करतात, हे जनतेला ठाऊक आहे !