मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते मुकेश मल्होत्रा यांची आमदारकी रहित !

  • निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या विरोधातील गुन्हेगारी प्रकरणांची लपवली माहिती

  • दुसर्‍या क्रमांकावर असलेले भाजप उमेदवार रामनिवास रावत यांना आमदार घोषित करण्याचा आदेश

काँग्रेसचे आमदार मुकेश मल्होत्रा आणि भाजपचे उमेदवार रामनिवास रावत (उजवीकडे )

भोपाळ (मध्यप्रदेश) – निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या विरोधात असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याच्या प्रकरणी विजयपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार मुकेश मल्होत्रा यांची आमदारकी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपिठाने रहित केली. या प्रकरणी पोटनिवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर असलेले, म्हणजे मल्होत्रा यांच्या खालोखाल मते मिळालेले भाजपचे उमेदवार रामनिवास रावत यांना विजयपूरचे नवे आमदार घोषित करण्याचा न्यायालयाने आदेश दिला.

वर्ष २०२४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार मल्होत्रा यांनी उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र यांत त्यांच्या विरोधातील गुन्हेगारी प्रकरणांची संपूर्ण माहिती दिली नव्हती. या प्रकरणी रावत यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, मल्होत्रा यांच्या विरुद्ध एकूण ६ गुन्हेगारी प्रकरणे नोंदवली गेली आहेत; मात्र त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केवळ ४ प्रकरणांचा उल्लेख केला असून २ प्रकरणांची माहिती लपवली. यावर न्यायमूर्ती जी.एस्. अहलुवालिया यांच्या खंडपिठाने रावत यांचे म्हणणे मान्य करत ‘निवडणूक प्रतिज्ञापत्रात तथ्य लपवणे, हे निवडणूक कायद्याचे उल्लंघन आहे’, असे सांगितले आणि मल्होत्रा यांची आमदारकी रहित केली.

रावत हे वर्ष २०२३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विजयी होऊन आमदार झाले होते. तथापि वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले आणि त्यांना भाजपचे मुख्यमंत्री मोहन यादव सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री करण्यात आले. त्यानंतर विजयपूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली होती.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती मल्होत्रा यांचे अधिवक्ता प्रतीप बिसोरिया यांनी दिली.

संपादकीय भूमिका

एरव्ही राज्यघटना धोक्यात असल्याची ओरड करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या या घटनाविरोधी कृतीविषयी गप्प का ?