भारतीय स्त्री

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. औद्योगिक संस्कृतीने स्त्री हृदय होरपळून निघणे

‘आजच्या औद्योगिक तंत्रज्ञानाच्या युगाने आणि त्या संस्कृतीमुळे स्त्री हृदय होरपळून निघाले आहे. तिला ‘निसर्गातच कुठेतरी जबरदस्त विरोध आहे’, असे जाणवते. स्त्री हृदय आणि औद्योगिक संस्कृती, ही आमची अत्याधुनिक जीवन रहाटी, म्हणजे आग आणि पाणी किंवा विळ्या भोपळ्यासारखे त्यांचे सख्य आहे. ‘त्या शिक्षणाने या आजच्या औद्योगिक संस्कृतीने स्त्री हृदयाच्या चिंध्या चिंध्या उडवल्या आहेत’, हे तिला प्रकर्षाने जाणवते.

२. स्त्रीचे मन जुन्या वळणाकडे ओढ घेत असूनही सध्याच्या संस्कृतीच्या भीषण संस्काराने तिच्या श्रद्धेच्या ठिकर्‍या उडणे 

स्त्रीचे मन जुन्या वळणाकडे ओढ घेते; पण आजच्या संस्कृतीचे संस्कार इतके भीषण की, तिच्या श्रद्धेच्या ठिकर्‍या उडतात. तिचा मूर्तीपूजेवर विश्वास नसतो. अर्थातच आई-वडील सांगतात, तरी ती घरात देव आणत नाही. मुलगा ५ वर्षांचा होतो. त्याच्यावर पूर्वीचे संस्कार आवश्यक आहेत ना ! त्याच्याकरता ती एक बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा अशा मूर्ती आणते. त्याच्यावर संस्कार व्हावेत; म्हणून ती प्रतिदिन पूजा करते; पण तिचे पूजेत मन नसते.

३. नव्या औद्योगिक संस्कृतीच्या जीवनरहाटीमुळे धार्मिक आचार नाहीसे होऊन घरपण नष्ट होणे

हळूहळू पूजेचा नियम सुटत जातो. मग ती रविवारी आणि गुरुवारी पूजा करते. हळूहळू तीही सुटते. मग सणावारी पूजन होते; पण त्यात अंतःकरण नसते. ते देव देवघराचा, देव्हार्‍याचा उपहास करत नाहीत ना ! ते आपणाकडे पाहून छद्मी हसत नाहीत ना !

मुलांना ती रामरक्षा शिकवते; पण आचारावरची तिची श्रद्धा लटकी पडते. आचारापासून दूर सरणारे मन तिला काही केल्या वळवता येत नाही. या घरच्या रितीभाती, कुळाचार, कधी कधी जुने माहेरचे संस्कार तिला तिकडे खेचतात, तर कधी नव्या तंत्रज्ञानाच्या, नव्या औद्योगिक संस्कृतीच्या जीवनरहाटीकडे ती खेचली जाते. दोघे पती-पत्नी प्रवाहाच्या भोवर्‍यात गरगर फिरत असतात. विलक्षण भांबावतात. घरचे घरपण नष्ट झाल्याचे दोघांनाही जाणवते. धार्मिक आचार, रितीरिवाज, कुळाचार आणि परंपरा यांविना घराला घरपण कसे येईल ?

४. भारतीय मध्यमवर्गातील माणसाचा मेंदू मानवाचा आणि देह पशूचा असणे

हा आमचा भारतीय मध्यमवर्ग, म्हणजे त्याचा देह पशूचा आणि डोके किंवा मेंदू मात्र मानवाचा आहे. मेंदू आणि डोळे यांचे कार्य वेगळे. त्यांचा स्वभाव वेगळा आणि पोटाचा आकार वेगळा.

५. औद्योगिक संस्कृतीतील अर्थप्रधान धारणेमुळे संघर्ष अटळ !

औद्योगिक संस्कृती आणि अर्थप्रधान धारणा या दोघांत संघर्ष अटळ होतो. त्यांच्या जिवाची विलक्षण उलाढाल होते. ते जीवन स्फोटक, विदारक होत जाते. अर्थप्रधान समाजरचनेत मध्यमवर्ग दैवीसंपत्ती करता फकिरी बाणा पत्करायला सिद्ध नसतो. त्याचाच अर्थ संस्कृतीच्या उच्चतम मूल्यांच्या रक्षणाचे त्याचे जे कार्य त्याचाही विध्वंस होत असतो. अर्थप्रधानता त्याला नामोहरम करते. लाचार बनवते. धर्मसंस्कृती रक्षणाकरता ब्राह्मण-जीविकेने फकिरीबाणा पत्करून जीवन जगायचे त्याच्यात धाडस उरत नाही. ब्राह्मणाची चिकाटी, परिश्रम, सातत्य, चिवटपणा, श्रद्धा, निष्ठा, कर्मठपणा अशा सगळ्यांना तो मुकतो. तो भ्याडभेकड होतो आणि इंद्रियांचा दास बनतो. श्रद्धेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्याने त्याचे हृदय रखरखलेले आणि वैराण होतात. मग दोघे पती-पत्नी भांड भांड भांडतात. पती पत्नीला उत्तरदायी ठरवतो. पत्नी पतीला दोषी ठरवते. दोघे भांडतात. नंतर हुरहुरतात.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२२)