राजापूर येथे छत्रपतींच्या शौर्याची साक्ष देणार्‍या ब्रिटीशकालीन वखारीच्या परिसराचे सुशोभीकरण

ब्रिटीशकालीन वखारीचे सुशोभीकरण

राजापूर – येथील ब्रिटीशकालीन वखार छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारी वास्तू आहे. महाराजांनी याच ठिकाणी इंग्रजांचा बीमोड केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ही ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित होती; मात्र आता तिचे पुनरुज्जीवन केले जात आहे. शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून या कामासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

१. माजी आमदार प्रमोद जठार, छत्रपती शिवस्मारक जीर्णोद्धार समिती आणि ‘माय राजापूर’ या संस्थांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.

२. जुन्या ब्रिटीशकालीन कचेरी इमारतीचे बळकटीकरण आणि सुशोभीकरण केले जात आहे. या परिसरात अ‍ॅम्पी थिएटर, नवीन स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. शिवकालीन प्रसंगांवर आधारित म्युरल पेंटिंग्स, चित्रफीत गॅलरी, आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

३. या सुशोभीकरणामुळे राजापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडणार असून शिवप्रेमी आणि पर्यटक यांना शिवकालीन इतिहासाची माहिती देणारी एक नवी ‘शिवसृष्टी’ येथे पहायला मिळणार आहे.

ब्रिटीशकालीन वखारीचा इतिहास

इंग्रजांनी वर्ष १६४९ मध्ये व्यापारासाठी राजापूर येथे ही वखार बांधली होती. अर्जुना नदीच्या काठी वसलेले राजापूर हे त्याकाळी एक महत्त्वाचे बंदर आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या धडा शिकवण्यासाठी वर्ष १६६०-६१ आणि वर्ष १६७० मध्ये अशा २ वेळा या वखारीवर स्वारी केली होती. पन्हाळगडच्या वेढ्यात इंग्रजांनी सिद्धी जोहरला तोफा पुरवून साहाय्य केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी महाराजांनी ही कारवाई केली होती.