प्रेमभाव, तत्त्वनिष्ठ आणि सकारात्मक राहून शारीरिक त्रासांना सामोरे जाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी (वय ४५ वर्षे) !

‘९.२.२०२६ या दिवशी दंतवैद्या (सौ.) संगीता चौधरी यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

डॉ. (सौ.) संगीता चौधरी

१. प्रेमभाव 

अ. ‘मी ४ वर्षांपूर्वी रुग्णाईत होते. एका तपासणीसाठी मला मोठ्या रुग्णालयात जायचे होते. तेव्हा ताई स्वतःहून माझ्या समवेत आली. तिने मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घेतली.

आ. माझ्या विवाहाच्या वेळीही ताईने घरातील सदस्याप्रमाणे सर्व साहाय्य केले, उदा. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, वधूची (माझी) सिद्धता करणे. तिने हे सर्व स्वतःची साधना म्हणून केले.

इ. एकदा ताई माझ्या माहेरी आली होती. तेव्हा तिने माझ्या सर्व कुटुंबियांशी जवळीक साधली. माझे कुटुंबीय अजूनही तिची आठवण काढतात.

ई. ताईकडे एका साधकाला काही औषधे देण्याची सेवा आहे. काही वेळा ते साधक औषध घ्यायला विसरतात. तेव्हा ताई जिना चढून त्यांच्या खोलीत त्यांना औषध द्यायला जाते.

२. शारीरिक त्रास होत असूनही सेवारत असणे

ताईला पुष्कळ शारीरिक त्रास आहेत. तिचे एक मोठे शस्त्रकर्म झाले आहे. तिला अजूनही औषधोपचार घ्यावे लागतात, तरीही ती निराश न होता ‘यातून माझे प्रारब्ध लवकर संपत आहे’, असा सकारात्मक विचार करते. तिला शारीरिक त्रास होत असला, तरीही ती सतत सेवारत असते.

३. सकारात्मक वृत्ती

सौ. वैजयंती विनयकुमार

‘प्रत्येक प्रसंगात साधना व्हायला हवी’, असा तिचा दृष्टीकोन असतो. एखाद्या प्रसंगात संघर्ष झाल्यास ती देवाचे साहाय्य घेऊन प्रयत्न करते. देवाने आश्रमात ठेवल्याबद्दल तिला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

४. तत्त्वनिष्ठ राहून आध्यात्मिक स्तरावर साधनेत साहाय्य करणे

ताईशी मला मनमोकळेपणाने बोलता येते. मला तिचा आधार वाटतो. ती मला आध्यात्मिक स्तरावर आणि तत्त्वनिष्ठ राहून साहाय्य करते. ‘मी साधनेचे प्रयत्न वाढवल्यास कशी स्थिर राहू शकते आणि इतरांना साहाय्य करू शकते’, याविषयी ताई मला सांगते. ती मला माझ्यावर असलेल्या देवाच्या कृपेविषयी सांगते आणि माझ्यात कृतज्ञताभाव वृद्धींगत करण्यास साहाय्य करते.

५. ती उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातील आहे; मात्र तिच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवत नाही.

६. गुरुधनाप्रती भाव

ताई अनावश्यक व्यय करत नाही. तिचा गुरुधनाच्या संदर्भातही असाच विचार असतो. वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ताईकडे सत्कार समितीची सेवा होती. ताईच्या सेवेची व्याप्ती बरीच मोठी होती. माझ्याकडे विविध समित्यांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांना लागणारी फुले अन् हार उपलब्ध करून देण्याची सेवा होती. तेव्हा तिने मला माझ्या सेवेचा अभ्यास करण्यासाठी साहाय्य केले आणि मला प्रोत्साहनही दिले. त्या वेळी ‘गुरुधनाचा योग्य विनियोग होण्यासाठी कशा प्रकारे सेवा करायची ?’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.

७. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती भाव

एकदा ताई मला म्हणाली, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची सावली दिसली, तरीही मला धन्य झाल्यासारखे वाटते. तुला त्यांच्याकडे जायला आणि त्यांना अनुभवायला मिळते. तुला सेवेनिमित्त त्यांचा सत्संग मिळतो. तू भाग्यवान आहेस.’’

८. संतांना जाणवलेले पालट

ताईची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्याच्या आदल्या दिवशी मी तिच्याशी बोलत होते. तेव्हा तिने संतसेवा करतांना तिला आलेल्या काही अनुभूतींविषयी सांगितले. ताईने सांगितले, ‘‘एका संतांनी सत्संगात सांगितले, ‘‘तुझ्या (ताईच्या) चेहर्‍यात पालट झाला आहे.’’ आमचे बोलणे झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ताईची आध्यात्मिक पातळी घोषित झाली.

‘मला संगीताताईच्या सहवासात तिचे जे गुण लक्षात आले, ते आत्मसात होण्यासाठी माझ्याकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न होऊ देत’, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. वैजयंती विनयकुमार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२६)