ऑनलाईन गेमिंगविषयी ‘कृती दल’ स्थापन ! – आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री

विधान परिषद लक्षवेधी…

आशिष शेलार

मुंबई, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – ऑनलाईन खेळांविषयी सरकार गंभीर असून त्यासाठी २ फेब्रुवारी या दिवशी ‘कृती दल’ स्थापन केले आहे, अशी माहिती राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. पुढील अधिवेशनाच्या आत कृती दलाने अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमे यांचा योग्य वापर होत नसल्याने अल्पवयीन मुलांची हानी होत असल्याची लक्षवेधी आमदार संजय केणेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मांडली होती. त्याला शेलार उत्तर देत होते.

आमदार केणेकर आणि डावखरे म्हणाले की…,

१. राज्यात अल्पवयीन मुलांंमध्ये संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमे यांच्या अधिक वापरामुळे अधीरता, राग अन् आळस आदी दुर्गुण वाढले आहेत.

२. ऑनलाईन माध्यमांवर कुणाचे कोणतेही नियंत्रण नाही. या माध्यमांतून अल्पवयीन मुलांना अमली पदार्थ, तंबाखू किंवा अश्‍लील सामग्री सहजपणे मिळते. यामुळे आत्महत्यांमध्येही वाढ झाली आहे.

३. १६ वर्षांखालील मुलांना संगणकीय ज्ञानजाल आणि सामाजिक माध्यमे यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मुलांनी संकेतस्थळाचा वापर नियंत्रित करावा, यासाठी कायदा करणे आवश्यक आहे.

४. ऑस्ट्रेलियाने मुलांना सामाजिक माध्यमांचा वापर करण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणला आहे. त्याच धर्तीवर मुलांच्या संरक्षणासाठी असा कायदा आणण्याविषयी राज्यशासनाने केंद्रशासनाकडे शिफारस करायला हवी.

‘सामाजिक माध्यमांच्या वापरावर वयोमर्यादा निश्‍चित करणे आणि अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणार्‍या डिजिटल विज्ञापनांवर बंदी घालण्याविषयी शासन धोरण सिद्ध करणार का ?’, असा प्रश्‍न भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधीच्या चर्चेत उपस्थित केला. यावर मंत्री शेलार म्हणाले की, विचित्र, अश्‍लील, फसवणूक करणारे अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याच्या दिशेने नेणार्‍या विज्ञापनांवर बंदी घालण्यासाठी ‘आयटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत प्रावधान आहे. त्यानुसार राज्य सरकार कारवाई करील.