‘पुष्कळ पूर्वीच्या भूतकाळात न जाता इ.स. १५०० मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या काळात राष्ट्र अन् धर्म उत्थानासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे विचार, कार्य जाणून घेऊया. हे समजून घेतांना प्राचीन ऋषी अन् त्यांच्या वैदिक हिंदु धर्म तत्त्वज्ञानांचा संदर्भापुरता उल्लेख करणे इष्ट राहील.
(भाग – ३)
या लेखाचा या आधीचा भाग बघण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1002971.html
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

१. ‘सेल्युलर जेल’मधील सश्रम कारावास अमानवीय शिक्षा प्रकार
सेल्युलर जेलमध्ये वर्ष १९११ ते १९२४ अशी सतत १३ वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अनन्वित, अमानवीय अत्याचार करण्यात आले. तेल घाणीचा कोलू उघड्या अंगाने ओढून ठरवून दिलेल्या प्रमाणाइतके तेल काढणे, हे काम प्रचंड शारीरिक श्रमाचे होते.
नारळाच्या शेंड्या सोलण्यासाठी जवळपास अर्धी गोणी (पोते) नारळ प्रत्येक कैद्यापुढे टाकले जात. तेलघाणीचा कोलू ओढण्याने आणि नारळ शेंड्या काढण्याच्या कामाने त्यांच्या हाताची सालटे निघून ते रक्ताळून तळहातांची भयंकर आग होत असे. त्यासह कारागृहाच्या भिंतीची साफसफाई, शेतीची कामे आणि इतर शारीरिक कष्टप्रद कामेही त्यांना करावी लागत होती.

मानसिक छळही अतिशय निर्दयपणे केला जायचा. कुटुंबापासून दूर एकांतात, छोट्याशा खिडकीतून येऊ शकेल, इतक्या अल्प प्रकाशात कोंदट खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. अपुरे अन्न, दुर्गंधीयुक्त वातावरण, कठोर मजुरीची बळजोरी यांचा समावेश होता. अशा तर्हेने मानसिक दबावाने क्रांतीकारकांची भावना आणि आत्मा पूर्णपणे तोडून टाकण्याचाच उद्देश ब्रिटिशांचा होता, जेणेकरून ते पुन्हा देशासाठी लढू शकणार नाहीत. अशा तर्हेची क्रूर शारीरिक आणि मानसिक शिक्षेची अवहेलना सहन करत असतांनाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या पुत्राच्या मृत्यूचे आणि पत्नी सौ. यमुनाबाई यांच्याही अतिशय हाल अपेष्टांचे आणि पत्नी विरहाचे दुःख सोसावे लागले.
अशा या भीषण परिस्थितीतही सावरकरांनी हार मानली नाही आणि कारागृहात असतांनाच त्यांनी अनेक साहित्यकृतींची रचना केली. ‘कमला’ आणि ‘गोमंतक’ सारखी महाकाव्ये केली. ज्यात त्यांनी अंदमान कारागृहातील जीवनाचे वर्णन केले. कारागृहात त्यांना कागद-पेन दिले जात नसत, तेव्हा ते कोळशाच्या साहाय्याने भिंतीवर लिहून ती काव्ये कंठस्त करत असत. कारागृहात असतांनाच त्यांनी सागराला उद्देशून लिहिलेले ‘ने मजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे काव्य ऐकून हृदय पिळवटून जाते. सावरकरांचा १२-१३ वर्षांचा सश्रम कारावास ही केवळ शिक्षा नव्हती, तर तो भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या बलीदानाचे प्रतीक होते. या काळात इतक्या शारीरिक मानसिक यातना सोसून आपले साहित्यिक आणि वैचारिक कार्य चालू ठेवले, जे त्यांच्या देशभक्तीची आणि दृढ निश्चयाची साक्ष देते.
२. आंतरराष्ट्रीय दबावामुळे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कारागृहातून मुक्तता
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सेल्युलर कारागृहात अतिशय क्रूर तर्हेच्या सश्रम कारावास भोगल्यानंतर त्यांना लक्षात आले की, अशा तर्हेचा क्रूर अत्याचार सहन करून जेलमध्येच आपला अंत झाला, तर मातृभूमीला स्वतंत्र करण्याचा आपला निर्धारही आपल्या जीवितासमवेतच अंत पावेल. त्यापेक्षा ब्रिटिशांकडे दयेचा अर्ज करून पहावा आणि अर्जाला संमती मिळाल्यास कारावासातून बाहेर पडल्यानंतर सशस्त्रक्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचे कार्य जे बंद पडल्याच्या स्वरूपात होते, ते परत आपल्याला करता येईल.
अशा प्रकारे सावरकरांच्या डावपेचाचा आणि रणनीतीचा मार्ग अवलंबून त्यांनी ब्रिटीश सत्तेकडे दयेचा अर्ज केला. ब्रिटिशांनी त्यांची जन्मठेप न्यून केली; पण ब्रिटिशांच्या दृष्टीने सावरकर धोका देणारे क्रांतीकारक असल्यामुळे त्यांनी सावरकरांना दयेच्या अर्जात ‘कारागृहातून मुक्त झाल्यानंतर मी क्रांतीची चळवळ पूर्णतः सोडून देईन’ यावर विसंबून त्यांना शिक्षेतून मुक्त केले नाही, तर संपूर्ण भारतात आणि अमेरिका, युरोपीय देश यांच्याकडून त्यांच्या सुटकेसाठी जे निषेधात्मक दबावतंत्र वापरण्यात आले, त्यामुळे ब्रिटिशांना सावरकरांना जन्मठेप शिक्षेतून मुक्त करावे लागले. अन्यथा अर्जामुळे त्यांच्यावर दया करून त्यांना मुक्त करण्याइतके ब्रिटीश दयाळू नव्हते.
३. अष्टपैलू स्वांतत्र्यवीर सावरकर

वर्ष १९२३ मध्ये सेल्युलर कारागृहातून मुक्त झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असतांना पहिल्यांदा ‘हिंदुत्व’ ही संकल्पना मांडली आणि ‘हिंदु म्हणजे भारताला आपली पितृभूमी अन् पुण्यभूमी मानणारी व्यक्ती’, असा अर्थ सांगितला. त्या समवेतच हिंदुत्वाची राजकीय विचारसरणी मांडली. स्थानबद्धतेत असतांना त्यांनी ‘हिंदूपदपादशाही’ या ग्रंथातून मराठा साम्राज्याच्या महान कार्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील हिंदु स्वराज्याच्या स्थापनेचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणला. त्यासह यांनी भारतीय इतिहासातील ‘सहा सोनेरी पाने’, ‘माझी जन्मठेप’, ‘काळेपाणी’, ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ‘मोपल्यांचे बंड’ या ग्रंथ रचना, ‘अनादी मी अनंत मी’, ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते श्री महन मंगले’, ‘शत जन्म शोधितांना’, ‘कोठडी’ इत्यादी अनेक कविता, तसेच ‘हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ आणि ‘तानाजी पोवाडा’ या त्यांच्या कविता प्रचंड लोकप्रिय झाल्या. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी ‘संन्यस्त खड्ग’, ‘उःशाप’, ‘पद्मिनी’, ‘उत्तर क्रिया’ अशी नाटके, अनेक प्रकारचे स्फुट लेख, अनेक कथा, कादंबर्या अशा तर्हेचे त्यांचे प्रचंड लिखित साहित्य उपलब्ध आहे. भाषाशुद्धी आणि भाषा लिपीतही त्यांनी मौलिक कार्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मातृभूमीला परदास्यातून मुक्त करण्यास्तव जे व्रत आयुष्यभर पाळले, त्या विषयी ते म्हणतात,

की घेतले व्रत हे न अम्ही अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग माने ।
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे ।
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे ।।
तरुणपणी क्रांतीवीर चाफेकर यास इंग्रजांनी फाशी दिल्याची वार्ता ऐकून व्यथित होऊन त्यांनी कुलदेवतेपुढे जी शपथ घेतली की, सशस्त्रक्रांतीच्या मार्गाने मी या जुलमी इंग्रजी राक्षसांना मारता मारता मरेन.
तात्पर्य, स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतातील महान राष्ट्रपुरुष एकाचवेळी स्वातंत्र्यसैनिक, सशस्त्रक्रांतीचे उद्गाते, सक्रीय कार्यकारी नेते, समाजसेवक, हिंदुत्वाचे प्रखर पुरस्कर्ते, साहित्यिक, जातीभेद-स्पृश्यास्पृता आणि विकृत रूढीवादाचे विरोधक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, हिंदु महासभेचे अध्यक्ष, छत्रपती शिवरायांच्या आदर्शांवर चालणारे, महान काव्यरचना कलेचे प्रतिभावंत, वक्ता सहस्त्रेशु असे तत्त्वचिंतक वक्ते, धर्माची आणि ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या सांगणारे, धर्माेपदेशक, धाडसी आणि धैर्यवान, राष्ट्रासाठी स्वतःचा गृहत्याग, संसरिक जीवनाचे त्यागी, तपस्वी, अखंड भारताचे पुरस्कर्ते आणि फाळणीचे कडवे विरोधक, सनातनला शाश्वत मानणारे अशा सद्गुणी व्यक्तीमत्व होते. अशा या महान राष्ट्रपुरुषाच्या नखाचीही योग्यता नसणार्यांनी त्यांची निंदानालस्ती करावी, हा केवळ सावरकरांचाच नव्हे, तर सर्व देशभक्तांचा घोर अपमान आहे. रत्नागिरीत स्थानबद्ध असतांनाच्या कालावधीत त्यांनी तेथील पीडित आणि निम्न जातीतील लोकांसाठी पतित पावन मंदिर उभारून सर्व मानवास समानतेचा संदेश दिला.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर होत असलेली टीका
सावरकरांवर त्यांच्या समकालीन टीकाकारांनी त्यांचा बुद्धीवाद, विज्ञानवाद आणि त्यांना अभिप्रेत असणारे हिंदुत्व यांवर यथेच्छ टीका केली; परंतु टिकाकारांच्या आक्षेपांना त्यांनी समर्थपणे आणि तत्त्विकतेने उत्तरे देऊन निरूत्तर केले आहे.

सांप्रत राहुल गांधी या राजकीय नेत्याने वर्ष २०२३ मध्ये लंडनमध्ये अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणात सावरकर ब्रिटिशांकडे ‘दया याचना अर्ज करून जन्मठेपेच्या शिकेतून मुक्त झाले. त्यामुळे ते स्वातंत्र्यवीर नसून माफीवीर आहेत’, असे त्यांनी अपमानजनक विधान केले.
विद्रोही साहित्य संमेलनात भाषण करणारे आणि स्वतःला पत्रकार म्हणवणारे निरंजन टकले यांनी तर त्याच्या भाषणाचा विषयच ‘सावरकरांची पोलखोल’ असा ठेवून अतिशय खालची पातळी गाठली. ‘सावरकर हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील स्वातंत्र्यवीर नसून स्वातंत्र्यवैरी होते’, अशी अतिशय नीचपणे निर्भत्सना केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा न्यायालयात केला; पण त्यासमान या निरंजन टकले यांच्यावर अद्याप मानहानीचा दावा का केला नाही ? याचे सखेद आश्चर्य आहे.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अखेरचा श्वास
नाशिक जिल्ह्यातील भगुर येथे २८ मे १८८३ या दिवशी जन्मास आलेले, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर प्राणाची बाजी लावून राष्ट्र उत्थानाचे महान कार्य
करणारे आणि हिंदुत्वाला कालानुरूप विज्ञानाचे निकषांवर पारखून सकल समाजाभिमुख कल्याणाच्या नवनिर्मितीचा प्रयत्न सावरकरांनी केले. धर्मउत्थानाची कास समस्त भारतियांनी धरावी, हा मोलाचा संदेश देऊन २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी मुंबईतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेऊन काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी आत्मसमर्पण केले.
६. उपसंहार
कोणत्याही राष्ट्रातील विशिष्ट प्रजासमुहाच्या वांछित वा अवांछित आग्रहाने वा त्यांनी केलेल्या प्रयत्नाने वा साम्राज्याविस्तार आकांक्षा असणार्या राष्ट्र प्रमुखांनी केलेल्या सैनिकी आक्रमणाने राष्ट्राच्या आस्तित्वात असलेल्या सीमा पालटू शकतील आणि राष्ट्र संकल्पना एकवेळ बदलू शकेल. अखंड प्राचीन भारत पूर्वेकडे ब्रह्मदेश, म्हणजे आताचे म्यानमार आणि पश्चिमेला अफगाण प्रांतापर्यंत विस्तारलेला होता; परंतु आता पाकिस्तान निर्मिती आणि अफगाणही स्वतंत्र असल्यामुळे भारताच्या सीमांचा संकोच झाला आहे. असे असले, तरी सनातन वैदिक हिंदु धर्म, शाश्वत तत्त्वाधिष्ठीत असा अनादि असल्याने त्यामध्ये परिवर्तन सदोदित असंभवच आहे. बुद्धी सामर्थ्य आणि एका विशिष्ट वैज्ञानिक शोध मर्यादेच्या पलीकडे जे अनाकलनीय तत्त्व अस्तित्वात आहे आणि ज्याची अनुभूती केवळ आमच्या प्राचीन ऋषिमुनींना आणि श्रेष्ठतम संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम अन् नामदेवादी समान संतांना आहे. त्यांच्या तपश्चर्येने आणि भक्ती साधना मार्गाने होऊ शकली, ती सत्यानुभूती वादातीत असून आम्हा हिंदूंचे ते अढळ श्रद्धास्थान आहे. अहिंसा हे हिंदु धर्माचे ही मूलतत्व आहे; पण जो मारेल, अत्याचार-अन्याय करेल, त्याचे निमूटपणे सहन करणे अशी भेकड अहिंसा आमच्या धर्माला आणि आम्हा हिंदूंना कदापि मान्य नाही. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास
कठिण वज्रासम भेदू ऐसे ।
भले तर देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथा हाणू काठी ।।’
हे संत तुकारामांचे बोल आमच्या अंगात भिनले आहेत.
युगंधर श्रीकृष्णाने कुरुक्षेत्री धर्मयुद्धात अर्जुनासमोर कौरवसेनेत सर्व आप्त मंडळी आणि भीष्म द्रोणाचार्यांसारखे गुरुवर्य पाहून ‘त्यांना ठार मारून हिंसेच्या पापाचा धनी होणे अयोग्य आहे’, असे सारथी श्रीकृष्णाला सांगत धनुष्य टाकून तो गर्भगळीत झाला. त्यास श्रीकृष्णाने केलेला बोध सर्वश्रुत आहे. ‘तू ज्याला हिंसा म्हणून समजत आहेस, ती हिंसा नसून तुझा क्षत्रिय धर्म आहे आणि कौरवसेनेतील ज्यांना तू आप्त अन् गुरु मानून युद्ध करण्यास विन्मुख होत आहेस, ते तुझे पराकोटीचे शत्रू आहेत. त्यांनी तुझे राज्य कपटाने हिरावून तुझ्यावर घोर अन्याय केला आहे.’ श्रीकृष्णाने पार्थ अर्जुनाला सांगितलेला हा अहिंसा धर्मच सर्वश्रुत आहे आणि हाच कर्मयोग आहे.
महान त्यागी तपस्वी राष्ट्र आणि धर्म सर्वतोपरि मानून त्यांच्या उत्थानार्थ आपले सर्व जीवन वाहिले असे २ महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रापासून बोध घेऊन आपणही राष्ट्र आणि धर्म उत्थानाचे कार्य आपल्या जीवनात आपापल्या क्षमतेप्रमाणे केले पाहिजे हाच निष्कर्ष निघतो.
– अधिवक्ता प्रकाश उपाख्य अंबादास देशपांडे, रावेत, पुणे. (१५.१२.२०२५)
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !