‘पुष्कळ पूर्वीच्या भूतकाळात न जाता इ.स. १५०० मध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या काळात राष्ट्र अन् धर्म उत्थानासाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे विचार, कार्य जाणून घेऊया. हे समजून घेतांना प्राचीन ऋषी अन् त्यांच्या वैदिक हिंदु धर्म तत्त्वज्ञानांचा संदर्भापुरता उल्लेख करणे इष्ट राहील.
(भाग – २)
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

‘हे मातृभूमि, तुजसाठी मरण ते जनन तुज विन जनन ते मरण’ हे राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या अजरामर काव्यातून पोटतिडकीने आम्हा हिंदूंसह सर्व भारतियांना कथन करणार्या महामानवाने, प्रखर देशभक्ताने स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या संसाराचा त्याग करून घरादारावर तुळशीपत्र ठेवून सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना केली. देशव्यापी चळवळ उभी करणारा, राष्ट्र आणि धर्मच सर्वतोपरी मानणारा क्रांतीचा महानायक याच काव्यातून स्वातंत्र्य देवतेला आवर्जुन सांगतो, ‘मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे, तुलाच वेदान्ती । स्वतंत्र्यते भगवती योगीजन परब्रह्म वदती ।।’ किती मौलिक संदेश हा ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा संदेश आम्ही देशवासीय कितपत अनुसरतो ? याचा केवळ तरुणांनीच नव्हे, तर अबालवृद्ध सर्वांनीच विचार करून राष्ट्र आराधना केली पाहिजे. ‘हम करे राष्ट्र आराधन । तनसे, मनसे, धनसे, तन मन धन जीवनसे । हम करे राष्ट्र आराधना ।।’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत सावरकरांनी त्यांच्या जीवनांत तंतोतंत अनुसरले.
१. अद्वितीय देशभक्त

स्वातंत्र्यवीर सावरकर निर्विवाद पराकोटीचे परम देशभक्त होते. याविषयी कुणाचेही दुमत असेल, तर ते कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. मातृभूमीला परदास्यातून मुक्त करून स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी जे स्वतःचा गृहस्थ संसार, घरादार, पत्नी-पुत्र यांचा त्याग केला. इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी ८ जुलै १९१० या दिवशी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात ‘मोरिया’ जहाजातून समुद्रात उडी मारली आणि पोहत जाऊन त्यांनी फ्रान्सचा किनारा गाठला. जहाजाच्या ‘पोर्टहोल’मधून उडी मारतांना त्यांचे अंग सोलून निघाले आणि जखमा झालेल्या अंगाचा समुद्रातील खार्या पाण्यामुळे प्रचंड दाह त्यांना सहन करावा लागला. त्यांच्या या ऐतिहासिक धाडसाच्या घटनेने एका भारतीय स्वातंत्र्यसैनिकाचा स्वातंत्र्यलढा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला.
२. हिंदुहृदयसम्राट सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर बुद्धीवादी, विज्ञाननिष्ठ असल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ असण्यावर टिकाही प्रखर स्वरूपाची झाली. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक ग्रंथाचा, वेद-उपनिषदे, स्मृती, गीता, पुराणे, महाभारत इत्यादींचा सखोल अभ्यास केला. अध्यात्म पूर्णतः समजून घेण्यासाठी विज्ञानालाही एका मर्यादेच्या पुढे शक्य झालेले नाही, हे त्यांच्या बुद्धीवादाला मान्य करावेच लागेल.
वेदोक्त चातुर्वर्णनिर्मिती ही जन्माधारीत नसून गुणकर्माप्रमाणे गीतेतही सांगितलेली असतांना समाजात याचा विपर्यास होऊन जातीपाती, स्पृश्यास्पृश्यता या वर्गभेदामुळे समाजाचे जे घोर विघटन झाले, त्याचा ब्रिटिशांनी अपलाभ घेतला आणि ‘फोडा आणि झोडा’ या नीतीचा अवलंब करत १५० वर्षे या राष्ट्रात जुलमी राजवट राबवत भारतियांना गुलामगिरीत खितपत ठेवले. जातीपाती भेदाभेद नष्ट करून एकसंघ होणे, हे गुलामगिरीला नष्ट करण्याला आणि राष्ट्राचे उत्थान होण्याला अत्यावश्यक असल्याचे ते भारतियांना भाषणातून सांगत राहिले.

वर्ष १९१० ते १९२३ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना २ जन्मठेपा आणि त्यानंतर वर्ष १९२३ ते १९३७ पर्यंत रत्नागिरी येथे स्थानबद्धता या दोन्ही शिक्षा झाल्या. त्यातून मुक्त झाल्यावर उघडपणे ते विश्व हिंदु परिषदेच्या अध्यक्ष पदावरून आणि राजकीय क्षेत्रात हिंदूंचा पक्ष घेऊन बोलू लागले. विज्ञानाची कास धरूनच पाश्चात्य राष्ट्रे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, जपान, रशिया आणि चीन आज ज्या प्रगतीच्या, विकासाच्या टप्प्यावर पोचले, तसे भारतानेही विज्ञानाची कास धरूनच आपले राष्ट्रोत्थानाचे उद्दिष्ट का गाठू नये ? हे सांगण्याचा ते सतत प्रयत्न करत राहिले.
३. काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना पक्षात येण्यास्तव आवाहन

‘स्वातंत्र्यवीर सावरकर बुद्धीवादी, विज्ञान सिद्धांतांना महत्त्व देणारे असे क्रांतीकारक आहेत’, असा विचार करून सावरकरांना काँग्रेस पक्षात यावी, अशी इच्छा अनेकांनी दाखवली; परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यास साफ नकार दिला आणि सांगितले ‘हिंदुत्वाचा प्रश्नावर काँग्रेसशी माझा मतभेद आहे. काँग्रेसची नीती मुसलमानांची मनधरणी करण्याची आणि मुसलमानधार्जिणी असल्याने माझ्या हिंदुत्व मतांशी प्रतारणा करून मी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचारही करू शकत नाही.’ यावरून ते बुद्धीवाद आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणारे जरी ते होते, तरी त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली नव्हती, हे दिसून येते. ‘वाटेल ते झाले, तरी मी हिंदूंचा पक्ष सोडणार नाही अन् हिंदुविरोधी म्हणून वैभवाचे जिणेही माझ्या वाट्याला येणार असले, तरी मी त्याचा धिक्कारच करीन’, असा त्यांचा निर्धार होता.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेल्या २ अन्यायकारक जन्मठेपा
वयाच्या १३ व्या वर्षी सावरकरांचे शालेय शिक्षण चालू असतांना वर्ष १८९७ मध्ये पुण्यातील ‘प्लेग कमिशनर’ वॉल्टर चार्ल्स रँड याची हत्या केल्याच्या अपराधासाठी चापेकर बंधूनां दोषी ठरवून त्यांच्यापैकी दामोदर चापेकर यांना १८ एप्रिल १९९८ मध्ये फाशी देण्यात आली. ही घटना स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजताच त्यांनी ब्रिटीश साम्राज्याला देशातून हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्याचे मनोमन ठरवून टाकले. त्यासाठी त्यांनी त्यांची कुलदेवता देवी भगवती पुढे शपथ घेतली, ‘मी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने क्रूर पाशवी इंग्रजांना मी मारता मारता मरेन; पण त्यांना यापुढे या माझ्या भारत देशात राज्य करू देणार नाही आणि भारतमातेला स्वतंत्र करीनच.’ त्यांनी अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली.
पुढे ते कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी लंडन येथे गेले. बॅरिस्टर पदवी शिक्षण घेत असतांना त्यांनी ‘फ्री इंडिया सोसायटी’ची स्थापना केली आणि स्वतः घेतलेल्या शपथेला अनुसरून सशस्त्र क्रांतीची चळवळ चालू केली. ‘जोसेफ मॅझिनी’चे चरित्र आणि ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे ग्रंथ लिहून भारतात पाठवले. या ग्रंथांतून भगतसिंह, सुभाषचंद्र बोस यांसह अनेक तरुणांनी स्फूर्ती घेऊन सशस्त्रक्रांतीच्या चळवळीत भाग घेतला. लंडन येथील वास्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर इंडिया हाऊसमध्ये रहात असतांना मदनलाल धिंग्रा त्यांच्या सहवासात होते. त्यांनी सशस्त्रक्रांतीच्या विचाराने प्रेरीत होऊन कर्झन वायलीच्या हत्येचा कट रचला आणि लंडनमध्येच त्याची हत्या केली.
४ अ. मार्सेलिसची ऐतिहासिक उडी

इंग्रजांनी मदनलाल धिंग्रा यांना फासावर चढवून सावरकरांना हत्येच्या कटात सामील असणे, इंग्रजी शासनाविरुद्ध सशस्त्रक्रांतीची चळवळ चालू करणे, चळवळीला पोषक साहित्य, शस्त्रास्त्र आणि आवश्यक रसद पुरवणे, राजद्रोह करणे, निरनिराळे कट कारस्थाने आणि ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध विद्रोहाचे प्रोत्साहन क्रांतीकारकांना देणे असे आरोप ठेवले. त्यांच्याविरुद्ध खटला चालू करण्यासाठी त्यांना समुद्रमार्गे आगबोटीतून भारतात आणले जात असतांना इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ जहाजातील ‘पोर्टहोल’मधून समुद्रात उडी घेतली आणि समुद्रखाडी पोहून जात फ्रान्सचा किनारा गाठला. त्यांची ही समुद्रात घेतलेली उडी ऐतिहासिक अशी ठरून ती त्रिखंडात गाजली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे शौर्याचे धाडस आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले. फ्रान्स किनार्यावरील सैनिकांना सावरकर यांनी इंग्रजीतून सांगितलेले काहीच कळले नाही. दरम्यान ब्रिटीश पोलीस तेथे पोचले, त्यांनी फ्रान्स शिपायांना लाच देऊन सावरकरांना कह्यात घेतले. बेड्या ठोकून भारतात आणले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना २ जन्मठेपांची म्हणजे ५० वर्षांच्या काळ्यापाण्याची सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांना अंदमान निकोबारच्या सेल्युलर कारागृहात आणण्यात आले. आंतरराष्ट्रीय कायद्यातील राजकैद्यांच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करून फ्रान्सने त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात दिलेल्या घटनेचे जबरदस्त पडसाद अमेरिका आणि युरोप, फ्रान्स आणि इंग्लडमध्येही उमटले. सर्वत्र विरोध झाल्याने ब्रिटन आणि फ्रान्स यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे हे प्रकरण नेण्याचे मान्य केले; पण साम्राज्यधार्जिण्या हेगच्या लवादाने ब्रिटिशांच्या बाजूने निकाल दिला.
बोटीतून समुद्रात उडी घेऊन अशा तर्हेने इंग्रजांच्या तावडीतून निसटून जाण्यात सावरकरांचा पळपुटेपणा मुळीच नव्हता, तर ‘कारावासाची शिक्षा दीर्घकाळ भोगत पडल्यास सशस्त्रक्रांतीच्या मार्गाने मातृभूमीला स्वतंत्र्य करण्याची चळवळ बंद पडेल आणि ब्रिटिशांच्या तावडीतून निसटून भूमीगत राहून चळवळ चालू ठेवता येईल’, असा त्यामागे मुत्सद्दीपणाचा त्यांचा विचार होता.
– अधिवक्ता प्रकाश उ. अंबादास देशपांडे, रावेत, पुणे. (१५.१२.२०२५)
संत कबीर यांच्या उलटबांसिया !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
संस्कारक्षम पालकत्व कसे असावे ?
भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली पिढी !
संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मिती : काळाची आवश्यकता !