हिंदूंच्या रक्षणासाठी प्रत्येक गावातून हिंदूंची ‘इकोसिस्टम’ आवश्यक ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जालगाव (दापोली) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

डावीकडून श्री. संजय जोशी, दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री रमेश कडू

दापोली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु धर्म आणि हिंदूंवरील आघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे होत आहेत. या विविध आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी प्रत्येक गावातून हिंदूंची इकोसिस्टम (यंत्रणा) सिद्ध होणे आवश्यक आहे, असे  आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले. जालगाव (दापोली) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात २१ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनीही संबोधित केले.

डावीकडून सद्गुरु सत्यवान कदम आणि बोलतांना संजय जोशी

श्री. संजय जोशी म्हणाले की,

भारतातील ९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. देशभरातून प्रतिवर्षी ३.५ लाख मुली, महिला गायब होत आहेत. देशाच्या सीमा काही ठिकाणी उघड्या राहिल्याने घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. संजीवनी बुटी आणायला जाणार्‍या हनुमंताला फसवून मारण्यासाठी कालनेमी राक्षसाने साधूचा वेश धारण केला, त्याप्रमाणे धर्मांध नाव पालटून हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी फेसबुकसारखी सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. समाजात वावरणार्‍या या कालनेमींपासून हिंदूंनी सावध रहायला हवे. हिंदूंनी स्वरक्षणासाठी तात्काळ एकत्र येण्याचा सराव करणे, कराटे लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेणे, कायद्याने संमत साधने वापरणे आवश्यक आहे. हिंदुस्थानचा रंग भगवा आहे आणि भविष्यातही भगवाच राहील, हे धर्मांधांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.

कलियुगात नामस्मरण ही साधना आहे !- सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जीवनात ८० टक्के समस्या आध्यात्मिक कारणामुळे निर्माण होतात. त्यामुळे त्यावर आध्यात्मिक उपाय म्हणजे साधना करणे आवश्यक असते. साधनेमुळे या आध्यात्मिक समस्या सुटतात किंवा त्या सहन करण्याची म्हणजेच प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. भगवंतप्राप्तीसाठी म्हणजेच आनंद प्राप्तीसाठी युगपरत्वे वेगवेगळी साधना सांगितली आहे. कलियुगात नामस्मरण ही साधना आहे. ‘कलियुगी नामची आधार’ असे संतांनी सांगितले आहे. श्रीमद् भगवतगीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णाने ‘यज्ञानां जपयज्ञोस्मि’ असे म्हटले आहे. नामजप साधनेला स्थळ -काळाचे बंधन नाही. कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे.

या सभेला रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. केदार साठे,  महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. गजानन कांबळे, जालगावचे सरपंच श्री. अक्षय फाटक, जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, जालगावचे गाव अध्यक्ष श्री. अशोक जालगावकर, तंटामुक्त अध्यक्ष श्री. सुरेश मिसाळ, भाजप मंडल अध्यक्षा सौ. जया साळवी यांच्यासह २५० हून अधिक धर्मप्रेमी-हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

उपस्थिती

कार्यक्रमाचा प्रारंभ सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, समितीचे श्री. संजय जोशी आणि जालगाव-ब्राह्मणवाडी येथील श्री महालक्ष्मी देवस्थानाचे अध्यक्ष श्री. रमेश कडू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान धर्मप्रेमी रमेश मिसाळ यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. राजेंद्र गोवले यांनी केला. समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रतीक टेमकर यांनी केले. सभेची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ ने झाली. हे गीत अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी म्हटले.

अभिप्राय

१. धर्मप्रेमी श्री. राजेंद्र गोवले : धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी लवकरच नियोजन करावे. ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार गाव आणि शहरात मोठ्या प्रमाणात वाढवूया.

२. श्री. राजेंद्र जालगावकर, जालगाव : ‘आपण आपली भूमी मुसलमानांना देऊ नये’, असे माझे मत आहे.

३. श्री. सुभाष अबगुल, जालगाव : हिंदु मुला-मुलींचे धर्माविषयी प्रबोधन होणे आवश्यक आहे.

४. सौ. निकिता बेनेरे, गव्हे : आपल्या घरातील समस्यांवर मात कशी करावी, आपल्या मुलांना हिंदु धर्माविषयी शिक्षण देण्याचा योग्य मार्ग कोणता, या गोष्टींची माहिती मिळाली.