दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेल्या दृष्टीकोनांचे महत्त्व !

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे समष्टी विचार सांगणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना समष्टी साधनेत साहाय्यभूत ठरून प्रगतीपथावर नेण्यास प्रयत्नरत असलेले स्थुलातील एक साधन आहे. याच अनुषंगाने माझे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सत्संगात त्यांच्याशी बोलणे झाले. त्यासंदर्भातील सूत्रे आणि माझे झालेले चिंतन पुढे दिले आहे. 

बोधचित्राच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर योग्य दृष्टीकोन बिंबवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे समष्टी विचार सांगणारे दैनिक ‘सनातन प्रभात’! 

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना ‘कुणी कोणत्या मार्गाने सेवा केल्यास त्याची प्रगती होऊन त्याला आनंद मिळेल’, हे ठाऊक असल्याने ते त्याला तशा प्रकारची सेवा आणि साधना सांगतात. मी गेली २६ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करत आहे. अनेक साधकांच्या सेवेत पालट होत असतात; मात्र माझ्या सेवेत कधीही पालट झाला नाही. दैनिक हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे समष्टी विचार सांगणारे माध्यम आहे. त्याद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील आघातांवर वैचारिक प्रहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच त्यातून हिंदूंचे प्रबोधन केले जात आहे. ही सेवा करतांना आणि त्यातील बातम्यांवरील दृष्टीकोन लक्षात घेता साधक समष्टीचा अधिक सखोल विचार करू लागतो. तसा मी गेली २६ वर्षे प्रयत्न करत आहे. यातून लक्षात आलेली काही सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. प्रशांत कोयंडे

२. दैनिकातील दृष्टीकोनांचा अभ्यास करणे साधनेसाठी आवश्यक !

२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दृष्टीकोन केवळ समाजासाठी नाहीत, तर प्रत्येक साधकासाठी आहेत ! : सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी दैनिकाच्या माध्यमातून शिकवलेल्या दृष्टीकोनांतून ‘समष्टीमध्ये म्हणजे समाजामध्ये काय चुकत आहे आणि योग्य काय असायला हवे’, हे लगेच लक्षात येते. दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि त्यातील दृष्टीकोन केवळ समाजासाठी नाही, तर प्रत्येक साधकासाठी आहेत. साधकांनी त्यांचे चिंतन केल्यास ‘समष्टी स्तरावर आपण कुठे चुकत आहोत आणि योग्य काय करायला हवे ?’, हे त्यांच्या लक्षात येऊ शकते. त्यातून समष्टी साधना अधिक चांगली होऊ शकते. त्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील व्यष्टी साधनेच्या संदर्भातील लिखाण वाचण्यासह बातम्या आणि राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयीचे लिखाण वाचणे आवश्यक आहे.

२ आ. दायित्व असलेल्या साधकांनी दैनिकातील समाजातील घटकांसाठी दिलेल्या दृष्टीकोनांचा अधिक अभ्यास करावा ! : विशेषतः दायित्व असलेल्या साधकांसाठी हे दृष्टीकोन अधिक लाभदायक आहेत. ‘शासनकर्ते, प्रशासन, पोलीस, न्यायालये आदी दायित्व असणार्‍या समाजाच्या घटकांकडून कशा चुका होत आहेत ? त्यांनी योग्य काय करायला हवे ? चुकीसाठी त्यांना कशी कठोर शिक्षा करायला हवी ?’ हे दैनिकातील दृष्टीकोनांतून सांगितले जाते. ‘साधकांनी साधना म्हणून आपण यात कुठे येतो किंवा आपण अशा प्रसंगांमध्ये योग्य कृती करू शकलो असतो का ? जर आपल्याकडे एखाद्या सेवेचे दायित्व असेल, तर आपण तिला त्या संदर्भात योग्य न्याय देत आहोत का ?’, याचा अभ्यास आणि चिंतन केले पाहिजे. त्याच वेळेस ‘गुरूंच्या इच्छेने मिळालेली सेवा करण्याची क्षमता आपल्यात नाही’, असे वाटत असेल, तर आपण क्षमता वाढवण्याचा आणि त्या सेवेतील बारकावे शिकण्याचा अभ्यास करतो का ?’, याचा विचार केला पाहिजे. असे केले, तर ही समष्टी साधना अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यातून आपण आपल्या सेवा आणि दायित्व यांच्या अंतर्गत येणार्‍या साधकांना आनंद देऊ शकतो. समाजाच्या समस्या सोडवण्याचे दायित्व शासनकर्त्यांचे आहे, तर आपल्या सेवेच्या अंतर्गत येणार्‍या साधकांच्या समस्या सोडवण्याचे दायित्व संबंधित सेवेचे दायित्व असलेल्या साधकाचे आहे. ‘साधकांनी समस्या सांगण्यापूर्वीच त्यांना येणार्‍या अडचणी किंवा सेवेतील समस्या आपल्या लक्षात येत आहेत का ?’ हा प्रयत्नही दायित्व असलेल्या साधकांनी करायला हवा. भगवान श्रीरामाचे राज्य आणण्याचा, म्हणजे रामराज्य आणण्याचा व्यापक विचार केला, तर आपल्या हे लक्षात येऊ शकेल.

३. दायित्व असलेल्या साधकांनी स्वतःची सेवा आणि ती सेवा करणारे साधक यांच्या संदर्भात दैनिकातील दृष्टीकोनांचे चिंतन करावे !

समाजामध्ये संघटना, संस्था, पक्ष आदी प्रशासन आणि शासनकर्ते यांना विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदने देत असतात. त्यावर दैनिकातून ‘सरकारला हे सांगावे का लागते ? स्वतःला का कळत नाही ?’, असा दृष्टीकोन दिला जातो. दायित्व असलेल्या साधकांनी ‘हा दृष्टीकोन आपल्यासाठीही आहे’, असा विचार करून चिंतन करण्यास आरंभ केल्यास ‘दायित्व संभाळण्यात स्वत:मध्ये कुठे न्यूनता आहे ?’, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी साधकांच्या, तसेच सेवेत येणार्‍या समस्या स्वतः जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला, तर प्रेमभाव वाढण्यासह समष्टी विचार व्यापक होऊन सेवा अधिक चांगली आणि गुरुदेवांना आवडणारी होऊ शकते.’

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.