धूसर ‘सीसीटीव्ही’ !

आजच्या काळात सर्वत्रच ‘सीसीटीव्ही’ (क्लोज सर्कीट टीव्ही) कॅमेर्‍यांची (छायाचित्रकांची) आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या कॅमेर्‍यांचे विशेष लाभ होतात, म्हणजे ते लावले, तर काही चोरांचे तरी चोरी करण्याचे धाडस होत नाही. चोरांच्या मनात भीती निर्माण होत असल्याने काही गुन्हेही थोड्या प्रमाणात का होईना, न्यून होतात. पोलिसांच्या दृष्टीने म्हटले, तर कोणताही गुन्हा घडला की, ‘सीसीटीव्ही फुटेज’ पुरावा म्हणून लाभदायक ठरते. याचा आणखी एक लाभ, म्हणजे देखरेख करण्यासाठी होत असल्याने अनेक जण त्यांच्या कार्यालयातील किंवा दुकानातील हालचालींवर भ्रमणभाषच्या साहाय्याने लक्ष ठेवू शकतात. थोडक्यात ‘सुरक्षितता’ हा यातील महत्त्वाचा लाभ दिसून येतो. याच भावनेतून दुकानदार, अनेक आस्थापने, अधिकोष, बसस्थानके, रेल्वेस्थानके, तसेच रस्त्यारस्त्यांवर अशा विविध ठिकाणी ‘कॅमेरे’ लावलेले आढळतात. गेल्या काही वर्षांपासून दुकान असो वा इमारत अशा ठिकाणी पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ लावणे बंधनकारक केले आहे.

सीसीटीव्ही

१. कॅमेरे बंद स्थितीत

आता हेच सीसीटीव्ही जर बंद पडले किंवा त्यातून अंधुक दिसू लागले, तर काय होईल ? म्हणजे ज्या सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणून ते लावले, त्याचा लाभ शून्यच म्हणावा लागेल. असाच प्रकार रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतही झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोली या प्रमुख शहरांसह जिल्ह्यातील ३ सहस्र ५०० पेक्षा अधिक ठिकाणी असे कॅमेरे बसवण्यात आले होते, जे आता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हे कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय संबंधित आस्थापनांशी पाठपुरावा करत आहे. रायगड जिल्ह्यातीलही ५० टक्के कॅमेरे बंद स्थितीत आहेत. हे सूत्र विधानसभेतही उपस्थित करण्यात आले.

श्री. संतोष गांधी

२. …सध्या तरी सुरक्षा धोक्यात !

रत्नागिरी शहरात ‘रत्नागिरी सिटी सर्व्हिलन्स प्रोजेक्ट’च्या अंतर्गत सीसीटीव्ही बसवणे आणि देखभालीचे दायित्व ‘पोटाकॉल वन आयटी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाकडे होते. अटींचे पालन न केल्याने आणि ४३ लाख ३५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या आस्थापनाच्या २ संचालकांविरुद्ध डिसेंबर २०२५ मध्ये रत्नागिरीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवणे, त्याची पुढील प्रक्रिया किंवा त्याचा निकाल लागणे, हे होईलच; पण तोपर्यंत काय ? याचे उत्तर सध्या तरी सर्वांचीच सुरक्षितता धोक्यात ! असेच म्हणावे लागेल.

३. ‘सीसीटीव्ही’ दुरुस्त करण्यासाठी प्रशासन कशाची वाट पहात आहे ?

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नारायण तलाव परिसरात मुसलमानांनी नमाजपठण केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिल्यास तेथे लावलेले ‘सीसीटीव्ही’ बंद पडले होते. त्यामुळे नमाजपठणाचे ‘फुटेज’ पोलिसांना मिळणे अवघड झाले. ‘सीसीटीव्ही बंद पडले आहेत’, हे नगर परिषद प्रशासनाला समजले कसे नाही ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित रहातो. ‘नाक दाबले की, तोंड उघडते’, या म्हणीप्रमाणे घटना घडून गेल्यानंतर आणि हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केल्यानंतर ‘सीसीटीव्ही’ दुरुस्तीचे आदेश निघाले. अाता जिल्ह्यातील बंद असलेले सीसीटीव्ही चालू होण्यासाठी आणखी एखादा प्रसंग घडायची किंवा जनतेने याविषयी आंदोलन करण्याची वा निवेदन देण्याची वाट प्रशासन पहात आहे का ? रत्नागिरी पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘डिजिटल बंदोबस्त’ राबवला आहे; पण सध्या तरी ‘सीसीटीव्ही’ धूसर झाल्याने त्यांनाही मर्यादा येतात.

– श्री. संतोष गांधी, फोंडा, गोवा. (१८.२.२०२६)