Supreme Court : महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्नच ! 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे कृत्य म्हणजे ‘बलात्काराची पूर्वसिद्धता’ असल्याचा दिला होता निर्वाळा

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि तिच्या पायजाम्याची नाडी सोडणे, हे कृत्य ‘बलात्काराचा प्रयत्न’ याच क्षेणीत मोडते, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा गुन्हा म्हणजे ‘विनयभंग’ अथवा ‘बलात्काराची पूर्वसिद्धता’ असल्याचा निर्वाळा दिला होता. या निर्णयावर तीव्र विरोध झाला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने साधारण वर्षभरापूर्वी, म्हणजे १७ मार्च २०२५ या दिवशी दिलेल्या निर्णयानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या विरोधाची स्वत:हून नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हे विधान रहित ठरवले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती एन्.व्ही. अंजारिया यांच्या खंडपिठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रहित ठरवला. न्यायालयाने दोन आरोपींवरील ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत ‘बलात्काराचा प्रयत्न’ हा आरोप पुन्हा कायम केला आहे.

कायदेशीर निर्णय हे माणुसकी आणि समजूतदारपणा यांचे प्रतिबिंब असावेत ! – सर्वाेच्च न्यायालय

न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण विधान केले. ‘न्यायाधिशांनी केवळ घटनात्मक आणि कायदेशीर तत्त्वांचा विचार न करत करुणा अन् सहानुभूती सुद्धा दाखवायला हवी’, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. ‘कायदेशीर निर्णय हे माणुसकी आणि समजूतदारपणा यांचे प्रतिबिंब असावेत’, असेही न्यायालयाने म्हटले.