नियोजनकौशल्य आणि गुरुसेवेची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री मेघा चव्हाण (वय ४३ वर्षे) !

‘५.१.२०२६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या सुश्री मेघा चव्हाण यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधिकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सुश्री मेघा चव्हाण

१. सौ. तन्वी सरमळकर, फोंडा, गोवा. 

सौ. तन्वी सरमळकर

१ अ. ‘मेघाताई प्रगल्भ आणि हुशार आहे.

१ आ. व्यवस्थितपणा : ‘तिची प्रत्येक वस्तू व्यवस्थित असते. ती परिधान करत असलेले कपडे व्यवस्थित असतात. तिला कितीही घाई असली, तरीही ती व्यवस्थित आवरून येते.

१ इ. सेवाभाव 

१. तिची सेवा करण्याची पद्धत उत्कृष्ट आहे. परिणामी तिच्या सेवांमध्ये चुका अल्प होतात.

२. ती सेवा एकाग्रतेने आणि मनापासून करते. ‘सेवेत कोणतीही त्रुटी रहायला नको’, असे तिला वाटत असते.

३. तिचे कुटुंबीय आश्रमातच रहातात, तरीही ‘ताई त्यांच्याशी कधी गप्पा मारत आहे किंवा त्यांच्या समवेत अधिक वेळ व्यतीत करत आहे’, असे दिसत नाही. ती अधिकाधिक वेळ सेवा करण्याचा प्रयत्न करते.’

२. सौ. कीर्ती जाधव, फोंडा, गोवा. 

सौ. कीर्ती जाधव

अ. ताई कधीही सेवेच्या वेळेत अन्य गोष्टींना प्राधान्य देत नाही. त्यामुळे तिची प्रत्येक सेवा ठरवलेल्या समयमर्यादेत पूर्ण होते. तिच्यात उत्तम नियोजनकौशल्य आहे.

आ. गुरुसेवेतील तिची एकाग्रता खरेच कौतुकास्पद आहे. त्यामुळे तिला पूर्वी झालेल्या सेवांविषयीच्या समन्वयांमधील सर्व सूत्रे व्यवस्थित लक्षात रहातात आणि पुढील सेवा करण्यासाठी त्यांचा संदर्भ कधी सहसाधकांना हवा असेल, तर ती त्या संदर्भांत व्यवस्थित सांगते.

इ. ती कधीच अनावश्यक विचार करतांना दिसत नाही. ‘तिचे नियोजन आणि तिच्या सेवा’, एवढेच तिचे विश्व आहे’, असे तिच्याकडे पाहून वाटते.

ई. तिच्याकडून कधी काही चूक झाल्यास तिचा तिच्या सेवांवर कधीच परिणाम होत नाही. ती गुरुसेवा तेवढ्याच तन्मयतेने करते.

उ. तिला पाठ दुखण्याचा तीव्र त्रास आहे; मात्र त्या त्रासातही ती सर्व नियोजनानुसारच करते.

‘प.पू. गुरुमाऊली, आपल्याच कृपेने मला मेघाताईचा सहवास लाभत आहे. ‘तिच्यातील गुण शिकून मला ते लवकरात लवकर आत्मसात करता येऊ देत’, अशी माझी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ७.१.२०२६)