अंनिसची दृष्ट !

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या चालू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातील एका प्रसंगावर आक्षेप घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘कलर्स’ मराठी वाहिनीला आणि निवेदकांना निवेदन दिले आहे. ४ फेब्रुवारी या दिवशी कार्यक्रमाचा २५ वा भाग प्रसारित झाला. या भागात कलाकारांची दृष्ट काढतांनाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. ‘दृष्ट काढणे’ ही अतिशय गंभीर गोष्ट असून असे प्रसंग पडद्यावर दाखवून ‘बिग बॉस मराठी’कडून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे आरोप अंनिसकडून निवेदनात करण्यात आले आहेत. ‘कार्यक्रमाचे निवेदक रितेश देशमुख यांनी हे निवेदन पुढील भागात वाचून दाखवावे, जेणेकरून प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल’, अशी मागणी अंनिसने केली आहे.

‘दृष्ट काढणे’ किंवा ‘नजर उतरवणे’ या प्रथेचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेद यांमध्ये आढळतो. ‘वाईट नजरे’पासून संरक्षण होण्यासाठी अथर्ववेदात मंत्र आणि औषधी सांगितल्या गेल्या आहेत. रामायण, महाभारत काळातही लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून संरक्षणात्मक उपाय केल्याचे संदर्भ आढळतात. युद्धासाठी जाणार्‍या योद्ध्यांनाही त्या काळ्या दुष्ट शक्तींपासून संरक्षणासाठी ताईत अथवा मंत्र दिल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत सापडतो. बाळ श्रीकृष्णाला दृष्ट लागू नये म्हणून माता यशोदेने विविध उपाय केल्याचे उल्लेख श्रीकृष्णलीलेत आढळतात. बाळाला काजळ आणि तीट लावणे, हातात काळे मणी बांधणे या प्रथासुद्धा पूर्वापार चालत आल्या आहेत. राजपुत्र-राजकन्या यांचे वाईट नजरेपासून रक्षण व्हावे, यासाठी विधीवत रक्षणसूत्र बांधल्याचे, विविध पूजाविधी केल्याचे संदर्भ प्राचीन ग्रंथांत आढळतात. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतात पीक बहरल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळी बाहुली अथवा लिंबू-मिरची बांधण्याची प्रथाही परंपरागत चालत आली आहे. सध्या वाहनांनाही प्रत्येक शनिवारी लिंबू-मिरची आणि बिब्बा बांधला जातो. लहान मूल घरी आल्यावर, वर-वधू गृहप्रवेश करतांना, नवीन गाडी किंवा वस्तू घेतल्यावर दृष्ट काढली जाते. वाईट नजरेपासून रक्षण व्हावे, यासाठी दृष्ट काढणे, ही भारतीय संस्कृतीतील एक प्रथा परंपरेचाच एक सामान्य भाग असून तो पूर्वापार चालत आला आहे; मात्र हिंदु धर्मातील प्रथा परंपरांना अंनिसने आजतागायत अंधश्रद्धेच्या चष्म्यातूनच पाहिले आहे, त्यामुळे जे ऋषिमुनींना मान्य आहे, ते अंनिसला नाही; कारण ती स्वतःला त्यांच्यापेक्षा शहाणी समजते. ग्रीक, अरबी, इजिप्त, युरोपीय या संस्कृतींतही दृष्ट काढल्याचे उल्लेख आहेत. विकासात उत्तुंग भरारी घेणार्‍या भारताच्या खेड्यापाड्यांपर्यंत आज वैद्यकीय सोयीसुविधा पोचल्या आहेत. त्यामुळे आज लहानसहान खेड्यातही रुग्णाची दृष्ट काढण्यासमवेत त्याला वैद्यकीय उपचारही दिले जातात. त्यामुळे अंनिसने त्याविषयी अधिक काळजी करू नये !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई