हिमालयातून भगवान शिवाची गंगा भूस्थलावर प्रवेश करते, ते क्षेत्र !

‘भारताच्या उत्तर दिशेच्या सीमेचा (सरहद्दीचा) रक्षणकर्ता पर्वतश्रेष्ठ हिमालय हा प्रत्यक्ष देवतांचा आत्मा आहे’, असे कविश्रेष्ठ कालिदासांनी हिमालयाचे वर्णन केले आहे. ‘स्वर्ग म्हणतात तो या हिमालयावरच आहे’, असे म्हटले जाते. गंगोत्री या हिमालयातील अतीउंच पहाडावर गंगा नदी उगम पावते आणि ती पहाडातील सुमारे २०० मैलांचा अतीदुर्गम मार्ग ओलांडून हरिद्वार येथेच प्रथम मैदानी प्रदेशात प्रवेश करते. हरिद्वार हे हिमालयाच्या पायथ्याशी आहे. स्वर्गातून, म्हणजे हिमालयाच्या जटिल भागांतून खळाळत येऊन भूसपाटीवर ज्या स्थळी गंगा पदार्पण करते, त्या स्थळी हरिद्वार हे अतिशय पुरातन काळापासून प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र गंगेच्या उजव्या तीरावर शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
गंगेच्या तीरावरचे हे पहिलेच मोठे गाव आहे. हे क्षेत्र म्हणजे, हिमालयाच्या यात्रेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथे गंगा वेगाने वहाते. या ठिकाणी गंगेच्या पात्राची रुंदी जवळजवळ १ मैल भरेल. नदीचे तीर घाट आणि देवळे यांनी गजबजून गेले आहेत. या ठिकाणी गंगेच्या पात्रातील पाणी अतिशय स्वच्छ आणि पवित्र असे आहे. (साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५)
भगवान विष्णूच्या चरणांचा ठसा असलेली ‘हर की पौडी’ !
हरिद्वारमधील प्रसिद्ध मुख्य घाट म्हणजे ‘हर की पौडी’ (हरीची पायरी) हा आहे. यात्रेकरू लोक रेल्वेस्थानकावरून सरळ या घाटावर येतात. ‘हर की पौडी’ या घाटावर स्नान करण्यात विशेष पुण्य मानले जाते; कारण या ठिकाणी भगवान विष्णूच्या पावलांचा ठसा आहे. वैशाख मासात येथे प्रतिवर्षी कुंभमेळा भरतो. त्या वेळी लक्षावधी यात्रेकरू स्नानासाठी येथे गोळा होतात, तसेच ग्रहणाच्या वेळीही येथे अनेक यात्रेकरू स्नानासाठी येतात. |
भगवान शिवाची गंगा जिथे अवतरली आहे, त्या हरिद्वार तीर्थक्षेत्राचे महत्त्व जाणून घेऊ !
अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः । – कुमारसंभव, सर्ग १, श्लोक १
अर्थ : उत्तर दिशेला देवतास्वरूप असलेला ‘हिमालय’ नावाचा पर्वतांचा राजा आहे.
लक्षावधी भाविक, यात्रेकरू आणि साधू-संत यांचे स्थान !
हिमालयातील हरि म्हणजे विष्णु (बद्रीनारायण) आणि हर म्हणजे, कैलासनाथ श्री शंकर (केदारेश्वर) यांच्या दर्शनासाठी जाण्याचा रस्ता हरिद्वार या तीर्थक्षेत्रावरूनच जातो; म्हणून ‘हरिद्वार’ किंवा ‘हरद्वार’ असे नाव या तीर्थक्षेत्राला प्राप्त झाले आहे. येथे स्नान, देवदर्शन आणि यात्रा यांसाठी प्रतिवर्षी येणार्या लक्षावधी भाविकांची नित्य गर्दी असते. या क्षेत्राचा उल्लेख महाभारतातही आढळून येतो. अर्जुन जेव्हा तीर्थयात्रेला निघाला होता, तेव्हा तो या गंगाद्वार तीर्थक्षेत्रावर काही दिवस राहिला होता. फार प्राचीन काळापासून हरिद्वार हे क्षेत्र पवित्र साधू आणि संन्यासी यांचे रहाण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेकरूंचा येथील कार्यक्रम म्हणजे गंगेत स्नान करणे, घाटावरील देवतांचे दर्शन घेणे आणि कुशावर्तावर जाऊन श्राद्धविधी करणे असा असतो. यात्रेकरूंची व्यवस्था करण्यासाठी ‘पांडे’ (ब्राह्मण पुजारी) असतात. ते यात्रेकरूंची चौकशी करून त्यांची सोय करतात. यात्रेकरूंना उतरण्यासाठी येथे अनेक धर्मशाळा आहेत. या धर्मशाळा यात्रेकरूंनी नेहमी भरलेल्या असतात.
पुराणात वर्णिलेली मोक्षनगरी !
पुराणात अयोध्या, मथुरा, मायावती, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारावती अशा मोक्ष देणार्या ७ नगरींचे वर्णन केले आहे. त्यांपैकी मायावती म्हणजे हरिद्वार, ही एक श्रेष्ठ नगरी आहे. ही नगरी म्हणजे, स्वर्गाची, मोक्षाची किंवा पुण्याची (पाप- पुण्यातील पुण्याची) पायरीच म्हणतात ! येथील सृष्टीसौंदर्य, पर्वतप्रदेशाचे सान्िनध्य आणि भारतातील सर्वांत मोठ्या गंगानदीचा थंड अन् आसमंतात घुमणारा असा प्रवाह यांमुळे मनुष्याच्या मनाला शांती देणारे आणि मोक्ष मिळवून देणारे असे तीर्थक्षेत्र येथे निर्माण झाले. या ठिकाणी शंकर पार्वतीसह रहातात; म्हणून येथे राहून शंकराची भक्ती करणार्या आणि येथील गंगेत स्नान करणार्या मनुष्याला मोक्ष मिळतो. असे या स्थानाचे महात्म्य आहे !
‘गङ्गाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते ।
स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म न विद्यते ।।’
अर्थ : हरिद्वार, कुशावर्त, बिल्वकेश, नील पर्वत आणि कनखल तीर्थ या ठिकाणी स्नान केल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.
हरिद्वारचे पौराणिक महत्त्व आणि कुंभमेळा
देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून अमृत काढले. ते अमृत मिळवण्यासाठी त्यांच्यात भांडण चालू झाले. धन्वन्तरीने तो अमृतकुंभ इंद्रपुत्र जयंत याच्या स्वाधीन केला. जयंत पळून गेला. दैत्यांनी त्याचा पाठलाग केला. तेव्हा पळतांना जयंताने तो अमृतकुंभ प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी आणि नाशिक या ४ ठिकाणी ठेवला. या ४ ठिकाणी त्या कुंभातील अमृत थोडे सांडले; म्हणून या स्थळांना अमृतक्षेत्राचा मान मिळाला !; म्हणून या ४ ठिकाणी ‘कुंभमेळा’ नावाची यात्रा भरण्यास आरंभ झाला. या ४ तीर्थक्षेत्रांपैकी हरिद्वारचा कुंभमेळा फार मोठा असतो. सूर्य जेव्हा कुंभ राशीत येतो. तेव्हा वैशाख मासामध्ये हा मेळा फार मोठ्या प्रमाणात भरतो. प्रति १२ वर्षांनी ही कुंभमेळ्याची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरते.

गंगातीरावरील विविध घाट आणि त्यांचे वैशिष्ट्य !
एक मोठे घंटाघर गंगेच्या घाटावरील शोभा वाढवते. श्रीमंत बिर्लाशेठ यांनी ते बांधलेले आहे. त्याच्या ४ बाजूंना ४ घड्याळे बसवली आहेत. या घाटाजवळच महंत शांतानंद यांनी बांधलेले श्री श्रवणनाथ मंदिर (शंकराचे देऊळ) प्रेक्षणीय आहे. त्या मंदिरात भगवान श्री शंकराची पिंडी सुमारे अडीच फूट उंचीची आहे. येथील नंदीही मोठा असून फार सुंदर आहे.
हरिद्वारमध्ये गंगाद्वार, स्वर्गद्वार, मोक्षद्वार इत्यादी अनेक घाट आहेत. सुभाष घाटावर नेहमी कथा-कीर्तने चालू असतात. गोघाटावर प्रायश्चित्तविधी केला जातो. श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला कुशावर्तघाट, श्रवणघाट, विष्णुघाट, गणेशघाट इत्यादी अनेक घाटांवरील शोभा प्रेक्षणीय असते.
यात्रेकरूंसाठी केलेल्या सोयी !
पूर्वी येथील मुख्य घाट फारच लहान, म्हणजे ३४ फूट रूंदीचा होता. या घाटाला ९० पायर्या होत्या. कुंभमेळ्याच्या दिवसांत येथे यात्रेकरूंची फारच गर्दी होत असे आणि अपघातात अनेक यात्रेकरू मृत्यूमुखी पडत. तेव्हा प्रशासनाने यात लक्ष घालून घाटाची रूंदी वाढवली आणि अनेक पायर्या नवीन बांधल्या. येथील पुलावर लाद्या बसवून (फरसबंदी करून) यात्रेकरूंना स्नानाच्या वेळी लोखंडी साखळ्यांची सोय केली.
प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने अनेक पूल बांधले आहेत. सुंदर बागबगीचे केले आहेत. प्रवाशांना थांबण्यासाठी आणि फिरावयास येणार्या लोकांसाठी विश्रांतीस्थळे केली आहेत. अशा तर्हेने हरिद्वार हे आता चांगलेच मोठे शहर झाले आहे. हरिद्वारमध्ये महापालिका प्रशासन आहे.
(साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५)
गंगेचे महत्त्व आणि गंगास्नानाचा संकल्प !
‘स्मरणे, स्तवने, स्नाने शुचि करते विश्व, चित्त, वाक् अंगा’ या व्युक्तीप्रमाणे ही गंगा नदी स्मरणाने, स्तवनाने आणि स्नानाने माणसाचे मन, वाणी आणि अंग पवित्र करत असते. गंगास्नानाने मनुष्य अंतर्बाह्य पवित्र बनतो आणि आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे मानतो. या ठिकाणी संकल्पपूर्वक स्नान करावयाचा प्रघात आहे. घाटावर ‘गंगापुत्रां’ची गर्दी असते. हे गंगापुत्र प्रत्येक यात्रेकरूला स्नानाचा संकल्प सांगतात. संकल्पपूर्वक गंगेत ३ डुबक्या मारल्या आणि गंगादान करून गंगापुत्रांना दान दिले म्हणजे, गंगास्नानाचे पुण्य मिळते. आपल्या मुलाच्या समवेत वृद्ध मातापित्यांना तर येथील गंगास्नानामुळे धन्यता वाटते. येथील स्फटिकासारख्या स्वच्छ आणि शांत जलाशयात स्नान करतांना मन अतिशय प्रसन्न होते. श्रीहरीच्या पायरीजवळील ब्रह्मकुंडात छातीइतके पाणी असते. येथील घाटांवर पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत यात्रेकरूंची स्नानाची गडबड चाललेली असते. दुपारी कथा-कीर्तने, पुराण-प्रवचने निरनिराळ्या घाटांवर चालू असतात. (साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५) |
गंगारतीचा अपूर्व आणि अविस्मरणीय सोहळा !

‘हर की पौडी’ या घाटाला लागूनच गंगाद्वार नावाचे मंदिर आहे. येथे असलेल्या अनेक देवळांपैकी हे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे देऊळ आहे. प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी पूजा आणि आरती होत असते. आरतीचा देखावा अविस्मरणीय असतो. आपल्यासारख्याच जमलेल्या भाविक यात्रेकरूंच्या गंगापूजनाचे विधी पाहून मन हरपून जाते. प्रत्येक यात्रेकरू आपल्या समवेत स्वच्छ असे गंगोदक ‘तीर्थ’ म्हणून घेतो. सूर्यास्ताच्या सुमारास आरत्यांचा थाट दिसून येतो. हा सोहळा पहाण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी झालेली दिसून येते. येथील घाटावर उभे राहून गंगाप्रवाहाची अपूर्व शोभा पहाण्यात यात्रेकरू रमून जातो. बराच वेळ गंगेचे पात्र पाहिले, तरी मनाचे समाधान होत नाही.
मुख्य पुजारी गंगेला ओवाळण्यासाठी ५०-७५ वातींची आरती घेतो. त्याचप्रमाणे यात्रेकरूही त्यांच्या ऐपतीप्रमाणे ‘आरत्या’ (दीप) विकत घेतात. हे दीप गुलाबाच्या फुलांनी भरलेल्या द्रोणांत विकत मिळतात. निरनिराळ्या वाद्यांच्या घोषांत आणि घंटांच्या निनादात या आरत्या चालू असतात. नंतर त्या आरत्यांचे द्रोण गंगेच्या प्रवाहात सोडले जातात. हे तरंगणारे दिवे गंगाप्रवाहात पसरतात. हा देखावा तर फारच अप्रतिम असा असतो.
(साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५)
कनखल तीर्थक्षेत्राचे पौराणिक महत्त्व !
मायापूरच्या दक्षिणेला १ मैल अंतरावर ‘कनखल’ गाव आहे. कनखल याचा अर्थ असा सांगतात की, येथे कुणी ‘खल’ (दुष्ट) नाही. म्हणजे या ठिकाणी सर्वांना मोक्ष मिळतो. या गावात ब्राह्मण आणि संन्यासी यांचीच वस्ती अधिक आहे. हे गाव हरिद्वारपेक्षा मोठे आहे. एकंदर गावाचा देखावा स्वच्छ आणि सुंदर आहे. या भागात मुख्यतः सधन लोकांची वस्ती आहे.
या क्षेत्राची पौराणिक कथा अशी सांगतात की, प्राचीन काळी दक्षप्रजापतीने येथे यज्ञ केला. या प्रसंगी त्याने आपल्या मुलीला, सतीला आणि जावई शंकर यांना आमंत्रण दिले नव्हते; परंतु शंकर आणि सती दोघेही यज्ञाला आली; परंतु दक्षाने दोघांचा अपमान केला; म्हणून सतीने स्वतःला जाळून घेतले. हे कळल्यावर शंकराच्या गणांनी आणि वीरभद्राने दक्षाचा शिरच्छेद केला. यज्ञमंडपाचा विध्वंस केला आणि भयंकर युद्ध केले. तेव्हा देवांनी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न होऊन त्यांनी दक्षप्रजापतीला दिव्य स्वरूप दिले. ही जागा दक्षस्थान म्हणून आज ओळखली जाते. येथे प्रसिद्ध असे दक्षेश्वर नावाचे दक्षाचे देऊळही आहे. ज्या ठिकाणी सतीने जाळून घेतले तेथे सतीकुंड आहे.
कनखलच्या हरिहर आश्रमात मृत्युंजय महादेवाचे मंदिर आहे. ते सुंदर आणि कलाकौशल्यपूर्ण आहे. श्रीकृष्णनिवास आश्रमामध्ये पाताळेश्वर, लक्ष्मीनारायण आणि शंकर यांच्या मूर्ती आहेत. शिवाय जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचीही मूर्ती येथे आहे. या ठिकाणी ‘रामकृष्ण मिशन’चे अनेक मठ आहेत. तेथील रुग्णालयात रुग्णांच्या उपचाराची सोय उत्तम आहे.
तीर्थक्षेत्रावरील ज्ञानकेंद्रे !
गंगेच्या डाव्या किनार्यावर स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलेले ‘गुरुकुल विश्वविद्यालय’ (कांगडी) नावाचे एक महान विद्याभवन आहे. भारतीय संस्कृतीच्या शिक्षणाची सोय येथे आहे. पंजाबच्या आर्य प्रतिनिधी सभेने येथे विद्यादानाचे पवित्र कार्य आदर्श रितीने केले आहे. प्रतिवर्षी फाल्गुन मासाच्या शेवटी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. याच ठिकाणी बिर्लाबंधूंचे वेदमंदिर आणि मोठे ग्रंथालय आहे. येथील आयुर्वेदभवन, छात्रनिवास, रुग्णालय आणि बागबगीचे प्रेक्षणीय आहेत.
हरिद्वारपासून सुमारे ४ मैलांवर ज्वालापूर आहे. हरिद्वारच्या मुख्य पंड्यांची वस्ती या भागात आहे.
(साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५)
निर्मला आखाडा
कनखल तीर्थक्षेत्राजवळच साधूसंत आणि महंत यांचे मोठमोठे मठ आहेत. त्यांपैकी निर्मला आखाडा फारच प्रसिद्ध आहे. कुंभमेळ्याच्या वेळी या महंत मठाधिपतींच्या आणि साधूसंन्याशांच्या मिरवणुका फारच भव्य अशा निघतात. उदासी, निर्मला, निर्वाणी आणि निरंजनी यांचे आखाडे आणि त्यांच्या मिरवणुका फार प्रसिद्ध आहेत. अन्य प्रेक्षणीय स्थळे
रेल्वेस्थानकाच्या वाटेवरील गीताभवन आणि तेथील भव्य कृष्णमूर्ती पहाण्यासारखी आहे. गीतेतील तत्त्वज्ञान येथे मूर्तीमंत उभे केले आहे. या क्षेत्री अनेक पाठशाळा आहेत. राजा मानसिंहाची समाधीही येथे आहे. हरिद्वारपासून सुमारे १ मैल अंतरावर ‘मायापूर’ नावाचे गाव आहे. या ठिकाणी मायादेवी, भैरव आणि नारायण यांची जुनी देवळे आहेत. मोक्ष देणार्या ७ नगरींपैकीच ही एक आहे. हरिद्वारची जुनी वस्ती या भागात असावी. (साभार : मासिक ‘प्रसाद’, मार्च १९६५) |




शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !