रुद्राभिषेकाचे महत्त्व !

१. रुद्र म्हणजे काय ?

अ. रुद्र अर्थात् भूतभावन (संपूर्ण प्राणीमात्रांप्रती स्नेह असणारा) शिवाचा अभिषेक म्हणजे त्याला स्नान घालणे किंवा करवणे. रुद्राभिषेक म्हणजे पंचामृताने मंत्र उच्चारणासमवेत देवाचे पूजन करणे. ‘रुद्र’ हे शंकराचे एक स्तोत्र आहे.

आ. रुद्राभिषेकाचा आध्यात्मिक अर्थ : अभिषेकपात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते, तसे आपले मन सतत परमेश्वरचरणी असले पाहिजे.

इ. शिवाला समानार्थी शब्द : शिव आणि रुद्र एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. शिवाला ‘रुद्र’ असे म्हटले गेले आहे; कारण ‘‘रुतम्-दु:खम्, द्रावयति-नाशयतीति रुद्र: ।’ म्हणजे ‘जो दुःख नष्ट करतो तो रुद्र.’’ अर्थात् ‘महादेव सर्वांचे दुःख नष्ट करणारा देव आहे !’

(निवृत्त) बिग्रेडियर हेमंत महाजन

२. महत्त्व

श्री गुरुचरित्र, तसेच शिवलिलामृतातील अकरावा अध्याय यांत रुद्राभिषेकाचे महत्त्व सांगितले आहे.

३. लघुरुद्र आणि महारुद्र !

‘रुद्र’ ११ वेळा म्हटले की एक ‘एकदष्णी’ होते. अकरा एकदष्णीचा एक लघुरुद्र. अनेक ठिकाणी शंकराच्या देवळांत लघुरुद्र केले जातात. ११ लघुरुद्रांचा १ महारुद्र आणि ११ महारुद्र केले की १ अतिरुद्र होतो. अशा प्रकारे रुद्र म्हणत अभिषेक करणे ही अभिषेक भक्तीची, उपासनेची एक पद्धत आहे.

४. रुद्राभिषेकाचे लाभ !

अ. महापापे भस्म होणे : रुद्राभिषेक केल्याने कुंडलीतील महापापेही जळून भस्म होतात आणि व्यक्तीत शिवतत्त्वाचा उदय होतो.

आ. सर्व देवतापूजन : एकमात्र सदाशिव रुद्राचे पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा होते.

इ. मनोकामना पूर्ण होणे : रुद्राभिषेकामुळे महादेवाचा शुभाशीर्वाद प्राप्त होतो. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्ती मिळते.

उ. रुद्राभिषेक : एक प्रभावी अनुष्ठान !

कलियुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटांतून आपली सुटका करावयाची असल्यास, तसेच वास्तूतील दोष आणि कलह यांचा परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या अन् लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच शिवाचे आशिर्वाद मिळवण्यासाठी रुद्राभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे. रुद्राभिषेकामुळे समृद्धी प्राप्त होते आणि जीवनात आनंद प्राप्त होतो.

५. भगवान शंकर अभिषेकाने प्रसन्न होणे !

भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणार्‍या गंगानदीकडे जाते, ही भावना असते.

शिवोपासनेचे विविध मार्ग

देवतांमध्ये भगवान शंकर ही मुख्य देवता आहे. प्रत्यक्ष शिवाचे रूप हे निर्गुण स्वरूपाचे आहे; परंतु उपासनेसाठी त्याचे रूप लिंगस्वरूपाचे आहे. भगवान शिव हे आपल्याला लिंगरूपाने दर्शन देत असतात. शिवोपासना करण्याचे विविध मार्ग आहेत. रुद्राभिषेक करणे, शिवलीलामृताचे पठण करणे, ‘नमः शिवाय’ हा जप करणे, श्रावणी सोमवारचा महाशिवरात्रीचा उपवास करणे इत्यादी.

लेखक – श्री. हेमंत सहस्रबुद्धे (साभार : संकेतस्थळ)

६. ज्योतिर्लिंगांची उपासना रुद्राभिषेक करून करणे

ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रूपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ ‘आत्मज्योत’ असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.

७. श्रावण मासातील विशेष कृत्य : रुद्राभिषेक  

श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक दिवशी म्हणजे शुद्ध प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत काही ना काही धर्मकृत्य करावयास सांगितले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘रुद्राभिषेक’ करणे हे विशेष कृत्य मानले जाते.

८. पारद शिवलिंगाचे वैशिष्ट्य !

नियमित पूजत असलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने फलप्राप्ती होते; परंतु पारद शिवलिंगावर अभिषेक केल्याने लवकरच शुभ फल प्राप्त होते.

लेखक – श्री. हेमंत सहस्रबुद्धे

(साभार : संकेतस्थळ)