Andhra Pradesh Illegal Church : आंध्रप्रदेशामध्ये नियमबाह्य चर्च बांधणार्‍या ख्रिस्ती संघटनेवर कारवाईची मागणी !

निवासी भूमीत नियमबाह्य चर्च बांधल्याचा आरोप !

अनधिकृत चर्च

गोदावरी (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात ‘कलवरी चर्च फाऊंडेशन’ या ख्रिस्ती मिशनरी संघटनेने केवळ निवासी इमारती बांधण्याची मान्यता असलेल्या भूमीवर एक मोठे चर्च बांधल्याचे समोर आले आहे. ‘लीगल राइट्स प्रोटेक्शन फोरम’ने (‘एल्.आर.पी.एफ्.’ने) ‘कलवरी चर्च फाऊंडेशन’वर निवासी अनुज्ञप्तीचा चर्च संकुल उभारण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ‘एल्.आर.पी.एफ्.’ने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

१. तक्रारीत आरोप केला आहे की, निवासी गाळे बांधण्याऐवजी ‘कलवरी चर्च फाऊंडेशन’ने तेथे एक मोठे चर्च बांधले आणि तिथे सार्वजनिक सभा आणि नाताळाचे कार्यक्रम आयोजित करण्यास चालू केले. केवळ निवासी वापरासाठी मान्यता असलेल्या भूमीचे रूपांतर सार्वजनिक प्रार्थनासभेच्या जागेत झाले आहे.

२. ‘एल्.आर.पी.एफ्.’चे सरचिटणीस ए.एस्. संतोष यांनी आरोप केला की, ख्रिस्ती मिशनरी कायदेशीर नियमांकडे दुर्लक्ष करून आक्रमक विस्तार करतात, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केल्यास त्याला ‘धार्मिक लक्ष्य’ असल्याचे स्वरूप देतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तक्रारी करतात.

३. भाग्यनगरमधील ‘कलवरी चर्च’चे संस्थापक तथा पाद्री पी. सतीश कुमार हे या चर्चसंस्थेचे नेतृत्व करतात. ही संस्था ‘कलवरी बायबल कॉलेज’, ‘कलवरी हॉस्पिटल’ आणि ‘कलवरी स्कूल्स’ चालवते. या संस्थेचा आंध्रप्रदेशासह आंतरराष्ट्रीय ख्रिस्ती वर्तुळात मोठा प्रभाव आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारे नियमबाह्य चर्च बांधून तेथे प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. असे चर्च पुढे हिंदूंच्या धर्मांतराचे अड्डे बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या चर्चवर कारवाई आवश्यक !
  • वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ का येते ? तेलुगु देसम् सरकारचे प्रशासन असे बेकायदेशीर चर्च उभे राहीपर्यंत काय करत होते ?