Pro-Khalistan Dal Khalsa : ‘शिखांवर हिंदुत्व संस्कृती लादण्याचा प्रयत्न असून तो स्वीकारणार नाही !’

‘वन्दे मातरम्’ गाण्याला खलिस्तान समर्थक ‘दल खालसा’चा विरोध

कंवरपाल सिंह बिट्टू

अमृतसर (पंजाब) – ‘वन्दे मातरम्’ शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी म्हणणे अनिवार्य करण्याचा निर्णय हा भारतीयत्वाच्या नावाखाली हिंदुत्व विचारसरणी शीख समुदायावर लादण्याचा प्रयत्न आहे. शीख असल्यामुळे आम्ही हे स्वीकारणार नाही. हा निर्णय शीख समुदायाच्या भावना आणि त्यांच्या धार्मिक ओळखीच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया खलिस्तानचे समर्थन करणार्‍या ‘दल खालसा’ या शीख संघटनेचे नेते कंवरपाल सिंह बिट्टू यांनी निवेदन प्रसारित करून व्यक्त केली आहे.

कंवरपाल सिंह बिट्टू यांनी संपूर्ण शीख समुदायाला आवाहन केले आहे की, त्यांनी हा निर्णय मानू नये आणि तो रहित करण्याची मागणी करावी. त्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय शीख संस्कृतीवर एक विशिष्ट विचारसरणी लादण्यासारखा आहे, जो शीख परंपरांशी जुळत नाही. हे एक सूक्ष्म आक्रमण आहे. शिखांनी हे सूत्र गांभीर्याने समजून घेतले पाहिजे आणि त्याचा विरोध केला पाहिजे. जर भारत सरकार किंवा पंजाब सरकार यांच्याकडून कोणताही निर्णय कपट, फसवणूक किंवा कोणत्याही गुप्त कार्यसूचीखाली शीख समुदायावर लादला गेला, तर त्याचा यापूर्वीही विरोध करण्यात आला आहे आणि पुढेही केला जात राहील.

खलिस्तान समर्थक ‘दल खालसा’ची माहिती

‘दल खालसा’ एक शीख धार्मिक संघटना आहे. तिची स्थापना वर्ष १९७८ मध्ये पंजाबमध्ये झाली. ही संघटना शीख समुदायाच्या धार्मिक आणि राजकीय सूत्रे यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करते. शिखांच्या कथित हक्कांसाठी, पंजाबशी संबंधित सूत्रांसाठी आणि खलिस्तानच्या मागणीसाठी या संघटनेने नेहमीच आंदोलन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा राष्ट्रघातकी खलिस्तान समर्थक संघटनेवर बंदीच घातली पाहिजे !
  • पंजाबमध्ये हिंदूंच्या घरातून एक व्यक्ती शीख होऊन धर्माच्या रक्षणासाठी लढत होती आणि आजही ही परंपरा चालू असतांना हिंदुत्वाला शीख पंथापासून वेगळे समजणारे देशद्रोही आणि हिंदुद्रोहीच आहेत.
  • शिखांच्या सर्व धर्मगुरूंनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी प्रयत्न केले, तर त्यातील काहींनी प्राणत्याग केला, हा इतिहास असतांना ‘दल खालसा’सारख्या संघटना खलिस्तानच्या नावाखाली त्याला विरोध करत असतील, तर अशा संघटनांना धडा शिकवणे आवश्यक आहे !