संसार बंधनातून, म्हणजेच नरकातून सुटण्याची उत्कट इच्छाच जिवाला भगवंताकडे नेते !

भगवान श्रीकृष्ण व अर्जुन

‘संसारात अनेक दुःखे, उद्वेग आणि चिंता आहेत. अशुभ म्हणजे संसार आणि अशुभ म्हणजे नरक. त्यामुळे संसार म्हणजे नरक. संसार म्हणजे दुःख, दैन्य, नरक ! दुःखाची यापेक्षा अधिक कल्पनाही करता यायची नाही, असा नरक ! या संसारात इतका नरक, व्यथा, पिडा, दैन्य आणि चिंता आहे की, त्याला मोजमाप नाही. ज्याला थोडीशी बुद्धी आहे, त्याला त्याच्या मनात, कधी तरंग उठतात की, ‘हे कधी सोडू ? कधी यातून मुक्त होऊ ? फार ताप झाला. मला उबग आली.’

‘जो संसारदुःखें दुःखवला ।
जो त्रिविधतापें पोळला ।
तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ।।’

(दासबोध, दशक ५, समास ३, ओवी ३४),

अर्थात् जो संसारदुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थप्राप्तीसाठी योग्य अधिकारी ठरतो.’ सगळेच दुःखाने होरपळतात आणि भाजून निघतात, तरीही त्यांची संसाराची वासना सुटत नाही. मरण दाराशी येते, तरी मन संसारातून सुटत नाही. पुन्हा मनुष्य जन्म घेतो ! जन्म जन्म भटकला, तरी संसारवासना जात नाही. हीच माया आहे. संसारदुःखाने होरपळून निघाला नाही, असा कोण आहे ? संसार मृगजळ आहे, हे कळले, तरी तहान भागवायला तिथेच जातात. त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. ते जन्म जन्म आणि नाना योनी भटकतच रहातात. ज्याला हा नरक जाणवतो, त्याचे संसारबंधन संपते. केवळ त्याचीच या बंधनातून, नरकातून, आगीतून सुटण्याची उत्कट अभिप्सा (तीव्र तळमळ) जागते आणि कोटी कोटीतून एखादाच भगवंताकडे वळतो. ज्याला संसार विषासारखा वाटतो आणि त्याचा उबग येतो, तोच भगवंताकडे वळतो. तोच भक्तीचा अधिकारी होय ! त्यालाच भगवान भक्ती सांगतात.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०१३)