शिवाजीनगर मुख्यालयात १ सहस्र मद्यपी वाहनचालकांना दिला दम !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ सहस्र मद्यपी वाहनचालकांना शिवाजीनगर मुख्यालयात बोलावून मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास भर चौकात पोलिसांच्या खास शैलीत सत्कार करू, असे सांगून मद्यपी वाहनचालकांना दम दिला. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात रस्तेसुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत समुपदेशन आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. पोलीस आयुक्तांनी कारवाई केलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त उपस्थित होते.

मद्य प्राशन करून वाहन चालवल्यास कडक कारवाई करण्यात येईल. संकेतस्थळ, सामाजिक माध्यमे यांद्वारे मद्यपी वाहनचालकांची छायाचित्रे प्रसारित केली जातील, तसेच पुढील काळात कारवाई तीव्र करण्यात येणार आहे, अशी चेतावणीही अमितेश कुमार यांनी दिली. एकाच दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, अशा प्रकारे नियम भंग करणार्‍यांचे वाहन अनुज्ञप्ती पत्र (परवाना) जप्त केले जाईल. शहरातील गंभीर स्वरूपाचे अपघात न्यून करण्यासाठी पोलिसांनी निर्धार केल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.