British Tourists expelled : पुष्कर (राजस्थान) येथे इस्रायलविरोधी भित्तीपत्रके लावल्यावरून २ ब्रिटीश पर्यटकांचा व्हिसा रहित !

भारत सोडून जाण्याचा आदेश

(व्हिसा म्हणजे एखाद्या देशात अमुक कालावधीसाठी वास्तव्य करण्याची अनुमती देणारी कागदपत्रे)

जयपूर (राजस्थान) – राज्यातील हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र पुष्कर येथे दोन ब्रिटीश नागरिक असलेल्या पर्यटकांनी आक्षपार्ह कृत्य केल्याच्या प्रकरणी त्यांचा व्हिसा रहित करण्यात आला आहे. ते येथील गल्लीबोळांत इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन समर्थक स्टिकर (भित्तीपत्रके) लावत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. यावरून प्रशासनाने दोघांचा व्हिसा तातडीने रहित करत त्यांना भारत सोडण्याचा आदेश दिला.

लुईस गॅब्रियल आणि त्यांची मैत्रीण अनुशी एम्मा अशी या ब्रिटीश पर्यटकांची नावे असून ते पर्यटक व्हिसावर भारतभ्रमणासाठी आले होते. त्यांनी राजकीय स्वरूपाच्या कृत्यांमध्ये सहभागी होऊन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

ही घटना २१ जानेवारीची आहे. पुष्करच्या गल्लीबोळांत राजकीय संदेश असलेले स्टिकर लावले जात असल्याची माहिती पोलिसांकडून गुप्तचर विभागाला मिळाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर या ब्रिटीश जोडप्याची ओळख पटली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुष्करमध्ये इस्रायली पर्यटकांची संख्या मोठी असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.