Homecoming In Dumgarh Village : छत्तीसगडमध्ये ६६ ख्रिस्ती कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

कवर्धा (छत्तीसगड) – जिल्ह्यातील दमगड गावात २ फेब्रुवारी  या दिवशी एका भव्य कार्यक्रमात ६६ ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. भाजपच्या आमदार भावना बोहरा यांच्या उपस्थितीत या आदिवासी कुटुंबांनी त्यांच्या मूळ धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. या वेळी आमदारांनी स्वतः त्यांचे पाय धुऊन आणि टिळा लावून स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात या घरवापसीची चर्चा चालू होती.

१. दमगड गावात आयोजित ‘आदिवासी गौरव संमेलना’त या कुटुंबांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. आमदार भावना बोहरा यांनी सांगितले की, आदिवासी समाज हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा खरा रक्षक आहे. काही ख्रिस्ती मिशनरी प्रलोभन दाखवून गरीब हिंदूंची दिशाभूल करतात; मात्र आता हिंदु समाज जागृत झाला आहे.

२. यापूर्वी नेऊर आणि कुई-कुकदूर भागांतील सुमारे १८५ जण आमदार भावना बोहरा यांच्या पुढाकाराने हिंदु धर्मात परतले होते.

३. परिसरात चालू असलेल्या घरवापसीकडे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या प्रयत्नांना ठोस उत्तर म्हणून पाहिले जात आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.