Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनच्या राजधानीसह २ मोठ्या शहरांवर झालेल्या आक्रमणात १३ जण घायाळ

कीव (युक्रेन) : गेल्या ४ वर्षांपासून चालू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप थांबवण्यावर सहमती झालेली नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने आक्रमणे केले जात आहेत. आता रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि खारकीव या दोन शहरांना लक्ष्य केले. यात १३ जण घायाळ झाले आहेत.

१. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीत घायाळ झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

२. युक्रेनच्या वायुसेनेने माहिती दिली की, राजधानीवर झालेल्या या आक्रमणात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे अशा दोन्ही शस्त्रांचा वापर करण्यात आला. यामुळे शेकडो निवासी इमारतींमधील वीज आणि हीटिंग (उष्णता निर्माण करणे) व्यवस्था ठप्प झाली आहे. आपत्कालीन कर्मचारी रहिवाशांच्या सेवा पूर्ववत् करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

३. खारकीवचे महापौर इगोर तेरेखोव यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोनद्वारे विस्थापित लोकांसाठीचे वसतीगृह, एक रुग्णालय आणि प्रसूतीगृह यांच्यावर आक्रमण करण्यात आले.