आज वसंतपंचमी (२३.१.२०२६) या दिवशी सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…

१. प.पू. भक्तराज महाराज यांनी सेवेच्या माध्यमातून साधकाला आपलेसे करणे आणि नंतर साधकाला हळूहळू प.पू. भक्तराज महाराज यांच्या दर्शनाची ओढ लागणे
‘वर्ष १९९२ मध्ये मी प्रत्येक आठवड्याला स्वारगेट (पुणे) येथून जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या आळेफाटा या गावी दंतवैद्य म्हणून रुग्ण तपासण्यासाठी जात असे. प.पू. बाबांचे भक्त डॉ. अरुण पाटील हे तेथून जवळच असलेल्या कांदळी येथे रहात होते. काही वेळा डॉ. पाटील माझ्याकडे रुग्ण तपासण्यासाठी पाठवत असत. तेव्हा ते मला ‘रुग्णांकडून पैसे घेऊ नको’, असे सांगत असत. आरंभी मला वाटले, ‘हे रुग्ण डॉ. पाटील यांचे नातेवाईक असतील.’ नंतर लक्षात आले की, ते वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. याविषयी डॉ. पाटील यांनी मला सांगितले, ‘‘येणारे रुग्ण हे माझे गुरुबंधू असून आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आहेत.’’ प.पू. बाबांचे दर्शन घेणार्यांविषयी आरंभी माझ्या मनात थोडे नकारात्मक विचार होते.
एकदा प.पू. बाबा त्यांचे भक्त (कै.) दत्तात्रेय जोशीकाका यांच्याकडे होते. एक निरोप देण्यासाठी मी तेथे गेलो. तेव्हा एका भक्ताने माझी प.पू. बाबांशी ओळख करून दिली. त्यांनी माझी अत्यंत आपुलकीने चौकशी केली आणि ‘मी दंतवैद्य आहे’, असे कळल्यावर त्यांनी स्वतःची कवळी काढून मला दिली आणि म्हणाले, ‘‘ही स्वच्छ करून आणून द्याल का ?’’ प.पू. बाबांनी मला जोशीकाकांच्या मुलाची दुचाकी दिली आणि माझ्या समवेत डॉ. मिलिंद खरे यांना दिले. आम्ही दुचाकीवरून चिकित्सालयात (दवाखान्यात) गेलो आणि कवळी स्वच्छ करून परत जोशीकाकांच्या घरी आलो. तेव्हा प.पू. बाबा त्यांच्या एका भक्ताकडे (श्री. अंजनीकुमार यांच्याकडे) भजन करण्यास गेले होते. तेथे उपस्थित असलेल्या एका भक्ताने आम्हाला सांगितले की, प.पू. बाबांनी त्यांची चारचाकी तुमच्यासाठी (मी आणि डॉ. मिलिंद खरे यांच्यासाठी) येथे ठेवली आहे आणि तुम्हाला भजनाच्या ठिकाणी बोलावले आहे. मी (डॉ.) खरे यांच्या समवेत तेथे गेलो आणि प.पू. बाबांना कवळी दिली. त्यांनी ती घालून पाहिली आणि महाप्रसाद घेत असतांना म्हणाले, ‘‘कवळी छान बसली.’’
त्यानंतर सर्वांचा महाप्रसाद झाला आणि प.पू. बाबांनी भजने म्हणायला आरंभ केला. मला ‘भजनामृत’ ग्रंथ दिला होता. मी त्या ग्रंथात पाहून भजने म्हणत होतो. ‘ते दोन घंटे आनंदात कसे संपले ?’, हे कळलेसुद्धा नाही. त्या कालावधीत मला बाह्य जगाचा विसर पडला होता. मला आता लक्षात येत आहे की, ‘कवळी स्वच्छ करवून घेणे’, हे एक निमित्त होते. मी रविवारी आळेफाटा येथे रुग्ण तपासण्यासाठी गेलो की, डॉ. अरुण पाटील मला म्हणायचे, ‘‘आज प.पू. बाबा कांदळीत आहेत. तुम्ही येता का ?’’ किंवा पुणे येथे प.पू. बाबा जोशीकाकांकडे आले की, डॉ. पाटील मला तेथे बोलवायचे. मलाही प.पू. बाबांच्या दर्शनाची ओढ लागल्याने मी आनंदाने जायचो.
अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असणे आणि ते पूर्ण शिकण्यासाठी अनेक जन्म आवश्यक !

‘गेली ४० वर्षे मी अध्यात्माच्या संदर्भातील विविध ग्रंथांचे वाचन करून त्यातील विविध पैलू शिकत आहे. अनेक संत आणि माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनाही अनेक प्रश्न विचारून मी अध्यात्म शिकलो. त्यामुळे लक्षात आले की, अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते पूर्ण शिकायचे असेल, तर त्यासाठी अनेक जन्म आवश्यक आहेत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
२. प.पू. बाबांच्या सहवासात असतांना मायेतील विचार अल्प होऊन एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळणे
वर्ष १९९२ ते १९९४ या कालावधीत मी वर्षातून साधारण ४ ते ६ वेळा कांदळी येथे गेलो असेन. तेथे अन्य कोण काय बोलते ? याकडे माझे फारसे लक्ष नसे; परंतु तेथे गेल्यानंतर प.पू. बाबांच्या सहवासात मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळत असे. प.पू. बाबा माझ्याशी बोलत असत असेही नाही; पण प.पू. बाबांच्या अस्तित्वाने सर्व वातावरण पालटलेले असे. पुष्कळ वेळा नाम घेऊनही मन निर्विचार होत नसे. म्हणजे मायेतील विचार येण्याचे बंद होत नसत; परंतु प.पू. बाबांच्या सहवासात थोडा वेळ थांबलो, तरी मायेतील सर्व विचार अल्प होत किंवा पूर्णपणे थांबत.
३. प.पू. बाबांच्या भजनाच्या कार्यक्रमाला थांबण्याची इच्छा असूनही न थांबण्याचा निर्णय घेतल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास होणे

वर्ष १९९२ मध्ये मी गोवा येथे प.पू. बाबांच्या गुरुपौर्णिमेला एक समाजातील व्यक्ती; म्हणून गेलो होतो. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम (गुरुपूजन, गुरुदर्शन) आणि महाप्रसाद झाल्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम होता. दुसर्या दिवशी माझ्या दवाखान्यामध्ये रुग्ण येणार असल्याने ‘भजनाच्या कार्यक्रमाला थांबू नये’, असे मी ठरवत होतो. भजनाच्या कार्यक्रमाला थांबण्याची इच्छा होती; परंतु मन द्विधास्थितीत होते. शेवटी मी रात्री ‘ट्रॅव्हल्स’ने पुणे येथे जाण्याचे ठरवले. सावंतवाडीच्या अलीकडे आमची गाडी नादुरुस्त झाली. रात्रीची वेळ असल्याने दुरुस्त होण्यास पुष्कळ वेळ लागणार होता. ‘सकाळपर्यंत काही दुरुस्त होण्याची शक्यता नाही’, असे चालकाने सांगितले. हळू-हळू एकेक प्रवासी ट्रॅव्हल्समधून उतरून एस.टी. बसने जाऊ लागले. मी पण सावंतवाडी येथे बसने आलो. मला सावंतवाडी येथून सातार्याला जाणारी बस मिळाली. त्या बसने सातारा येथे आलो. त्यानंतर सातार्याहून पुण्याची बस मिळाली, असा प्रवास करत सायंकाळी पुणे येथे पोचलो. प.पू. बाबांच्या भजनाचा कार्यक्रमही गेला, रुग्णही तपासता आले नाहीत, शारीरिक आणि जास्त मानसिक त्रास झाला, तो वेगळाच. देवाच्या इच्छेनुसार न वागता स्वतःच्या मनाने जाण्याचे ठरवले, त्याचा परिणाम देवाने मला दाखवून दिला.
४. प.पू. बाबांनी ‘सेवा करतांना नाम घ्यायला हवे’, असे शिकवणे
एकदा प.पू. बाबा पुणे येथील श्री. जोशी यांच्याकडे आले होते, तिथे मी गेलो होतो. तेव्हा तेथे एक बटाट्यांनी भरलेले पोते होते. प.पू. बाबांनी ते ‘बटाटे चांगले आहेत का ?’ हे पाहून स्वच्छ करण्यास सांगितले. तेथे असलेल्या आम्ही सर्वांनी बटाटे तपासून स्वच्छ केले. नंतर आम्ही बटाटे सुपाने पोत्यात भरू लागलो. अर्धे पोते भरून झाले असतांना प.पू. बाबांचे आमच्याकडे लक्ष गेले. तेव्हा ते आम्हाला ओरडले आणि भरलेले पोते परत खाली ओतण्यास सांगितले. प.पू. बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘बटाटे पोत्यात एकदम कशाला भरता ? एक-एक बटाटा पोत्यात भरा.’’ त्याप्रमाणे आम्ही एक-एक बटाटा पोत्यात भरू लागलो. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, ‘एकदम बटाटे भरले, तर लवकर पोते भरून होईल, एकेक भरण्यास वेळ लागेल.’ असा विचार येतो न येतो, तोच प.पू. बाबा परत ओरडले आणि म्हणाले, ‘‘नाम घेत नाही. काही करत नाही. एकेक बटाटा पोत्यात भरतांना नाम घ्या.’’
५. ‘नाम अखंड घ्यायला हवे’, असे उदाहरणाच्या माध्यमातून शिकवणे
एकदा इंदौर (मध्यप्रदेश) येथील आश्रमात असतांना कुणीतरी गुलाबजाम आणले होते. तेव्हा प.पू. बाबांनी प्रत्येकाला एकेक गुलाबजाम स्टीलच्या ताटलीमध्ये खाण्यास दिला. आम्ही सर्व जण चमच्याने गुलाबजाम तोडून (अर्धा करून) खात होतो; कारण गुलाबजाम मोठा होता. तेव्हा प.पू. बाबा आम्हाला रागावून म्हणाले, ‘‘तोडून तोडून काय खाता, अखंड गुलाबजाम खायला हवा ना ?’’ तेव्हा सर्वांनी गुलाबजाम मोठा असूनही अखंड तोंडात घातला. माझ्या मनात विचार आला की, ‘प.पू. बाबा असे का सांगत आहेत ?’ तेवढ्यात प.पू. बाबा म्हणाले, ‘‘नाम कसे अखंड घ्यायला हवे. तोडून तोडून नको.’’
६. साधकाच्या मनातील विचार ओळखून त्याला बोलावून घेणे
एकदा सकाळी मी चिकित्सालयात काम करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. बाबा एवढ्या सर्व भक्तांमध्ये मला ओळखत असतील का ?’ त्यानंतर सायंकाळी साधारण ६ वाजता प.पू. बाबांचे एक भक्त माझ्या चिकित्सालयात आले आणि मला म्हणाले, ‘‘प.पू. बाबांची कवळी नीट बसत नाही. त्यामुळे त्यांना खाता येत नाही; म्हणून त्यांनी तुम्हाला बोलावले आहे.’’ मी प.पू. बाबांकडे गेलो आणि त्यांच्या कवळीला काय अडचण आहे ? कवळी लावल्यानंतर त्यांना खायला काय अडचण येते ? हे सर्व पहात होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, त्यांनी वरची कवळी नवीन तयार केली होती आणि खालची कवळी जुनी होती. त्यामुळे त्यांना खातांना अडचण येत होती. वरची आणि खालची अशा दोन्ही कवळ्या नवीन वापरायला हव्या होत्या. मी प.पू. बाबांना तसे सांगितल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिले. ते मिस्कील हसले आणि म्हणाले, ‘‘हो का ?’’ तेव्हा मला असे वाटले की, हे सर्व प.पू. बाबांना ठाऊक होते आणि हे सर्व माझ्या साधनेसाठीच होते. सकाळीच माझ्या मनात विचार आला होता. ‘प.पू. बाबा मला ओळखत असतील का ?’ माझ्या मनातील हा विचार ओळखून प.पू. बाबांनी मला कवळीचे निमित्त करून बोलावून घेतले.
७. ओंकारेश्वर येथे भंडार्यासाठी दोन दिवस रहाण्याच्या निमित्ताने जाणे आणि प्रत्यक्षात एक आठवडाभर राहूनही ‘तेथून जावूच नये’, असे वाटणे
वर्ष १९९२ किंवा १९९३ मध्ये डॉ. अरुण पाटील यांनी मला विचारले, ‘‘मध्यप्रदेशमधील ओंकारेश्वर येथे भंडारा असतो. त्याला तुम्ही येता का ?’’ तेव्हा मला ‘चिकित्सालय बंद करून जावे’, असे वाटत नव्हते; म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘‘मी शनिवार आणि रविवार येतो.’’ मी दोन दिवस रहाण्याच्या निमित्ताने गेलो; पण नंतर तेथे एक आठवडाभर राहिलो. मी तेथे कसा आणि का थांबलो याचे कारण लक्षात आले नव्हते; पण परत येतांना ‘तेथून निघूच नये’, असे मला वाटत होते. तेथे पुष्कळ आनंद मिळत होता. अनेक दिवस नामजप आणि साधना करून माझे मन निर्विचार (मायेतील विचार बंद होणे) होत नाही. ते प.पू. बाबांच्या कृपेनेच विनासायास अनुभवता आले.
प.पू. बाबा आणि प.पू. डॉक्टर यांच्या अपार कृपेनेच मला हे अनुभवता आले. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६७ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.११.२०२५)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !