गुरुस्तवन भावांजली

  • २९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने...

  • गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

गुरु वैराग्याचें मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ ।
गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ।। 

अर्थ : गुरु हे वैराग्याचे मूळ कारण आहे. ते शुद्ध परब्रह्म आहे. गुरु हे लिंगदेहातील आत्मा आणि अनात्मा (शरीर, मन, बुद्धी, अहं इत्यादी, जे सतत पालटत असते) यांची गाठ तात्काळ सोडवतात.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

संत ज्ञानेश्वरांनी ज्या उच्च कोटीच्या गुरूंचे वर्णन केले आहे, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ! वैराग्य म्हणजे केवळ संसार सोडून अरण्यात जाणे नव्हे, तर सांसारिक जीवनातील भोग, नश्वर वस्तू आणि व्यक्तींमधील आसक्ती किंवा मोह पूर्णतः गळून पडणे होय ! अशी ती उच्चतम अवस्था असते. ‘वैराग्याचे मूळ’ हे केवळ श्री गुरूंच्या चरणांपाशी असते. स्थितप्रज्ञ अवस्थेतील गुरुदेव हे साक्षात् ‘परब्रह्मा’चे सगुण रूप आहेत. जेव्हा आपण वैराग्यस्वरूप गुरुदेवांच्या चरणी शरणागत होतो, तेव्हा त्यांच्या चैतन्यामुळे आपल्या मनातील विषयांची ओढही आपोआप न्यून होऊ लागते.

आपल्या सूक्ष्मदेहामध्ये पूर्वजन्मांचे संस्कार, अतृप्त वासना आणि प्रबळ इच्छा साठलेल्या असतात. त्यामुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी यालाच ‘लिंगदेहाची गाठ’, असे संबोधले आहे. ही गाठ सोडवण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरूंमध्येच असते. ते आपल्या कृपादृष्टीने आणि मार्गदर्शनाने साधकाचा लिंगदेह शुद्ध करतात अन् त्याला आत्मज्ञानाची अनुभूती देतात.

आजच्या धावपळीच्या आणि रज-तमात्मक युगात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांमधील स्वभावदोष अन् अहंकार यांचे निर्मूलन करून त्यांना मोक्षाच्या दिशेने नेत आहेत. ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंधार आपोआप नष्ट होतो, त्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या केवळ सूक्ष्म अस्तित्वानेही साधकांच्या मनातील अज्ञान आणि वासनांची जळमटे दूर होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज सहस्रो साधक ‘लिंगदेहाची गाठ’ सोडवून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत. अशा वैराग्यस्वरूप अन् परम शुद्ध श्री गुरूंच्या श्री चरणी कोटी कोटी नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२३.७.२०२६)