नियमांचे उल्लंघन केल्यास भंगार व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई होणार !

  • चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची चेतावणी !

  • हिंदु राष्ट्र-समन्वय समितीच्या निवेदनाची दखल

भंगार व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची विशेष बैठक

चिपळूण – भंगार व्यवसाय कायदेशीर पद्धतीने करावा, शहर स्वच्छ ठेवण्याचे दायित्व सर्वांचे आहे. तुम्ही व्यवसाय करा; मात्र तो नियमांनुसार आणि कायदेशीर असावा. शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले. १९ जानेवारी या दिवशी शहरात भंगार व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ बोलत होते.

या वेळी नगरसेवक निहार कोवळे, नगरसेविका अंजली कदम, आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांच्यासह भंगार व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘चिपळूण शहर आणि परिसरातील अवैध भंगार व्यवसायांवर कारवाई करावी’, अशा मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र-समन्वय समितीच्या वतीने नुकतेच प्रशासनाला देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ पुढे म्हणाले की,

१. भंगार गोळा करण्यासाठी शहरात फिरणार्‍या हातगाड्या अथवा तीनचाकी वाहनांवर नगर परिषदेचे अधिकृत ‘स्टिकर’ लावणे बंधनकारक राहील, तसेच संबंधित वाहन चालकांच्या गळ्यात ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

२.  या वाहनांना चिपळूण नगर परिषदेकडून अधिकृत परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी वर्षाला २००० रुपये फी आकारण्यात येईल.

३. भंगार व्यवसाय करतांना शहर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, रस्त्यांवर गाड्या उभ्या करतांना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच भंगार गोडाऊन परिसरात ‘टायर’ किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ जाळण्यास सक्त मनाई आहे.

४. भंगार गोळा करण्यासाठी ज्या गाड्या फिरतात, तो कर्मचारी कुठून आला ? त्याचा मालक कोण आहे ? या सर्वांची माहिती नगर परिषदेत द्यावी, नगर परिषदेतून ओळखपत्र आणि गाडीसाठी ‘स्टिकर’ दिला जाईल.