शस्त्रकर्म चालू असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर जवळ बसलेले आहेत’, अशी अनुभूती घेणारे श्री. अभिजित विभूते !

‘माझ्या पित्ताशयात १६ मि.मी. चा एक खडा होता. त्या समवेत अनेक पित्ताचे खडे होते. त्यामुळे १५.११.२०२५ या दिवशी माझे शस्त्रकर्म करण्यात आले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती खाली दिल्या आहेत.

श्री. अभिजित विभूते

१. मला सकाळी ९ वाजता शस्त्रकर्मगृहामध्ये नेले. तेथे मला पुष्कळ दाब जाणवत होता.

२. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे

शस्त्रकर्मगृहामध्ये माझा ‘महाशून्य’ हा नामजप चालू झाला. मला माझ्या बाबांनी (कै. बाळासाहेब विभूते आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे यांनी) सांगितले होते की, ‘आपण गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) हाक मारत आहोत’, असा भाव ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप करावा’; म्हणून मी तसा भाव ठेवून नामजप केला. शस्त्रकर्माच्या वेळी मला भूल दिलेली असूनही ‘प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर माझ्या जवळ बसलेले आहेत’, अशी मला अनुभूती आली. मी दुपारी ३ वाजता शुद्धीवर आलो. तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू येऊन माझी भावजागृती झाली.

३. पत्नीने भावपूर्ण सेवा करणे

अ. शस्त्रकर्मानंतर मला शुद्धीवर येण्यास विलंब झाल्यामुळे माझ्या पत्नीने माझ्यासाठी नामजपादी उपाय केले. ती ‘माझ्या सप्तचक्रांवरील आवरण काढणे, नामजप करणे आणि विभूती फुंकरणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत होती.

आ. माझी पत्नी ‘गुरुदेवांचा एक साधक’ या भावाने माझी सेवा करत होती. या समवेत ती आश्रमातील सेवासुद्धा करत होती.’

४. सहसाधकांनी निरपेक्षपणे सेवा करणे

शस्त्रकर्मापूर्वी आणि नंतरसुद्धा माझ्यासह सेवा करणार्‍या साधकांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. त्यांनी रुग्णालयात माझ्या समवेत राहून प्रतिकूल परिस्थितीत माझी सेवा केली. ते माझी प्रेमाने काळजी घेत होते. माझ्याकडून त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती. माझ्या मनात ‘केवळ सनातनचे साधकच अशी निरपेक्ष भावाने सेवा करू शकतात’, असा विचार आला. गुरुदेवांनी अशा साधकांचा सहवास दिल्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

५. परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे

माझे शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्या मला भेटायला आल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘छान झाले शस्त्रकर्म.’’ तेव्हा क्षणभर ‘गुरुदेवच त्यांच्या माध्यमातून मला भेटायला आले आहेत’, अशी मला अनुभूती आली.’

– श्री. अभिजित विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१२.२०२५)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक