बंगालमधील कोळसा घोटाळ्यातील पैशांची गोव्यात गुंतवणूक

‘आय-पॅक’च्या माध्यमातून २० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट उघडकीस

प्रतीक जैन (उजवीकडे)

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – बंगालमध्ये गाजलेल्या कोळसा घोटाळ्याचे लोण आता थेट गोव्याच्या गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पोचले आहे. राजकीय सल्लागार संस्था ‘आय-पॅक’ यांनी कोळसा घोटाळ्यातील किमान २० कोटी रुपये ‘हवाला’मार्गे गोव्यात वळवल्याचा खळबळजनक आरोप ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘एन्स्फोर्टमेंट डिरेक्टरेट’ने – ‘ईडी’ने) केला आहे. या प्रकरणी ‘ईडी’ने कोलकाता येथील ‘आय-पॅक’चे कार्यालय आणि संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर धाडी घालून महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत.

‘ईडी’च्या अन्वेषणात समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाता येथून ही २० कोटी रुपये रक्कम ‘आर्. कांतीलाल’ आणि ‘राजेश मगनलाल’ या ‘हवाला’ आस्थापनांच्या माध्यमांतून गोव्यात पाठवण्यात आली. गोव्यातील एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ (कार्यक्रमांचे व्यवस्थापन पहाणारे आस्थापन) आस्थापनाला तृणमूल काँग्रेसच्या (‘टी.एम्.सी.’च्या) निवडणूक प्रचाराच्या खर्चासाठी ही रोख रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी निगडित सागर कुमार पटेल, अक्षय कुमार आणि पंकज मलिक यांसारख्या व्यक्तींची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यांनी ‘ही रक्कम ‘हवाला’मार्गे मिळाल्याची आणि ती ‘ऑय-पॅक’च्या कामासाठी वापरली’, अशी साक्ष दिल्याचे समोर आले आहे.

गोव्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ कोळसा घोटाळ्याचाच नव्हे, तर देहली येथील मद्य घोटाळ्यातील पैसाही वापरला गेल्याचा संशय ‘ईडी’ने यापूर्वी व्यक्त केला आहे. आता या नवीन खुलाशामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.