दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर पाटील यांना ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता’ पुरस्कार २०२६ प्रदान !

पत्रकार दिनानिमित्त भिवंडी येथे पत्रकार सन्मान सोहळा !

ठाणे, ८ जानेवारी (वार्ता.) – पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक ‘स्वराज्य तोरण’ आणि ‘स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी शहर अन् ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी चंद्रानंद कृषी पणन आणि समाजकल्याण संस्थेच्या वतीने दैनिक ‘स्वराज्य तोरण’चे संपादक डॉ. किशोर पाटील यांना त्यांच्या सामाजिक अन् पत्रकारितेतील भरीव योगदानाविषयी ‘बाळशास्त्री जांभेकर प्रेरणा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. येथे पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

कार्यक्रमाचा प्रारंभ पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. ठाणे, रायगड, पालघर, तसेच धुळे आणि नंदुरबार यांसारख्या दुर्गम आदिवासी भागांत जाऊन आदिवासी ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेत डॉ. किशोर पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. यशवंत म्हात्रे यांच्या हस्ते, मान्यवर पाहुणे आणि शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ११ सहस्र १११ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे होते.

डॉ. किशोर पाटील यांनी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात भिवंडी शहर, ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, स्थानिक समस्या, शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांचा आवाज त्यांनी सातत्याने शासन-प्रशासनापर्यंत पोचवण्याचे कार्य केले. मागील १८ वर्षांपासून संपादक म्हणून त्यांनी दायित्व समर्थपणे पार पाडले.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि मान्यवर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. उपस्थित पत्रकारांना ब्लँकेट आणि भेटवस्तू यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.