७ कोटी ५० लाख साहित्यरसिकांनी सामाजिक माध्यमांद्वारे पाहिले संमेलन !

सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यप्रेमींच्या अलोट आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गर्दीचा नवा उच्चांक गाठला गेला. सामाजिक माध्यमांद्वारे देश-विदेशातील अनुमाने ७ कोटी ५० लाख साहित्यप्रेमी दर्शकांनी संमेलनात घेतल्याने हे संमेलन खर्‍या अर्थाने ‘अटकेपार’ पोचले आहे, असे गौरवोद्गार संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.

संमेलनाविषयी मान्यवरांचे अभिप्राय…

१. प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ : साहित्य संमेलनाची दैदिप्यमान परंपरा जपत नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांद्वारे शतकपूर्व संमेलन अधिक साहित्य, पुस्तक आणि वाचककेंद्री करण्याचा निर्धार केला होता. साहित्य संमेलनास लाभलेला विक्रमी प्रतिसाद बघता हा निर्धार पूर्णत्वास गेला आहे, असे ठामपणे सांगावेसे वाटते. जुन्या परंपरांची कास धरत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक साहित्यप्रेमींपर्यंत पोचवण्यात यशस्वी झालेले हे संमेलन पुढील साहित्य प्रवासासाठी पथदर्शी ठरले आहे.

२. श्री. विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष, अ.भा.म. साहित्य संमेलन : संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ज्याप्रमाणे विविध समित्या स्थापन करून आयोजनाला दिशा दिली, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग करत संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमी रसिकांपर्यंत पोचवण्यात यश आले आहे. ज्याप्रमाणे थोरल्या शाहू महाराजांच्या कार्यकाळात मराठीचा झेंडा अटकेपार रोवला गेला, तीच परंपरा साहित्य क्षेत्रात पुढे नेत संमेलन सातासमुद्रापार नेण्यात यश लाभले आहे.

३. मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष, अ.भा.म. साहित्य संमेलन : सध्या वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, सकस साहित्याची निर्मिती होत नाही, नव्या लेखकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोचत नाही, अशी नकारात्मक चर्चा असतांना सातारा येथे आयोजित केलेले शतकपूर्व संमेलन या सर्व चर्चांना छेद देणारे ठरले असून वाचक, लेखक, साहित्यप्रेमी यांना संमेलनाच्या मांडवात आणण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले गेले.

सामाजिक माध्यमांद्वारे संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी ‘रॉकलाईक टेकव्हेंचर्स’ यांच्या माध्यमातून ३१ तज्ञांची विशेष यंत्रणा उभारली गेली. यासाठी साईराज भोसले यांनी समन्वय केला. ४८० हून अधिक ‘क्रिएटर्स’नी सहकार्य केले. याचे फलित म्हणून फेसबुक, एक्स, यू ट्यूब, इन्स्टाग्राम यांवर चांगला प्रतिसाद मिळाला.