विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतची गोडी निर्माण करावी ! – शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड

संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन

शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड

रत्नागिरी – प्रत्येक शाळेत श्रवणाच्या दृष्टीने भाषा प्रयोग करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २ ठिकाणी अशा प्रयोगशाळा होणार आहेत. केवळ विषय शिकवण्यावर भर न देता संस्कृत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृत भाषेविषयी गोडी कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. अल्प शब्दांत अधिकाधिक आशय असलेल्या रसाळ संस्कृत भाषेत पुष्कळ सामर्थ्य आहे. संस्कृतच्या शिक्षकांनी प्रतिमासातून एकदा ऑनलाईन माध्यमातून एकत्र येऊन केवळ संस्कृत भाषेतूनच संवाद साधावा, मीसुद्धा सहभाग घेईन, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि भारतीय भाषा समिती शिक्षा मंत्रालय, (नवी दिल्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत माध्यमातून संस्कृत शिक्षण २ दिवसांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि संस्कृत शिक्षक मंडळाचे सहकार्य याकरता लाभले आहे.

देववाणी संस्कृतचे अद्वितीयत्व !

या वेळी मंचावर प्रतिभावंत संस्कृत लेखक महाबल भट्ट आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई अन् उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते. उद्घाटक आणि प्रमुख अतिथी महाबल भट्ट आणि शिक्षणाधिकारी गावंड यांचे शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर संस्कृत भाषेतून संस्कृत शिक्षण याचा उद्देश आणि कार्यशाळेची रूपरेषा रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी प्रास्ताविकाद्वारे सांगितली.

महाबल भट्ट यांनी आपल्या मनोगतात बोधपर कथांचा दाखला देत महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले, ‘संस्कृत भाषेचा नित्य सराव अत्यंत आवश्यक आहे, तसेच संस्कृत भाषेची शास्त्रीय, व्याकरण आणि शाब्दिकदृष्ट्या असलेली उपयोगिता जाणण्याचा दृष्टीकोन शिक्षकांनी आत्मसात केल्यास अध्यापन प्रक्रिया सुकर होऊ शकते.’

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा कोषाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सुचविले. संस्कृत भाषिक सुबत्ता विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेतील पाठ्यांश शिकवतांना तो संस्कृत अधिष्ठित आणि संवादात्मक कसा होईल ? यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा स्मिता सरदेसाई यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी दूरस्थ शिक्षण विभागाचे समन्वयक स्वरूप काणे यांनी वन्दे भारत गीत सादर केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश चव्हाण यांनी केले. या वेळी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक, उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.