
१. शरीर सुदृढ आणि आरोग्यसंपन्न रहाण्यासाठी शारीरिक व्यायामाची आवश्यकता
‘सर्वसाधारणपणे व्यायाम म्हणजे शारीरिक व्यायाम करणे’, असे आपण समजतो आणि त्याविषयी बहुतेक जण जागरूकही असतात. शरीर सुदृढ आणि आरोग्यसंपन्न रहावे; म्हणून आपण शारीरिक व्यायाम करतो. व्यायाम हा नियमितपणे आणि ठराविक वेळीच करावा लागतो. व्यायामाचे महत्त्व एकदा पटले, म्हणजे ते वारंवार सांगावे लागत नाही. व्यायामाचे निरनिराळे प्रकार असतात. यातील ‘आपल्याला कोणते व्यायाम योग्य आणि हितकारक आहेत’, यांची माहिती करून घ्यावी लागते. काही जण फिरण्याचा व्यायाम चालू करतात, तर काही व्यायामशाळेत किंवा योगासनांच्या वर्गात नावे घालतात. एकदा व्यायामाला आरंभ केला की, तो नियम सहजासहजी मोडला जात नाही.
२. शरिराप्रमाणे मन निरोगी रहाण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक असणे; कारण मन म्हातार्या शरिराला सोडून दुसर्या देहात जन्म घेत असणे
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आपण शरीर निरोगी रहाण्यासाठी व्यायाम करतो; पण ‘मन निरोगी असणे आवश्यक आहे’, हे आपल्याला कळते का ? त्यासाठी ‘आपण काही उपाय शोधणे, मनाला काही व्यायाम करायला लावणे आवश्यक आहे’, हे आपण लक्षात घ्यायला हवे. वास्तविक पहाता शरिराची वाढ होत जाते आणि वाढ पूर्ण झाल्यावर ते उतारास लागते अन् एक दिवस मरून जाते. मनाचे तसेच आहे का ? ते म्हातारे होते का ? म्हातार्या माणसाचे मन मात्र तरुण रहाते. तो माणूस शरिराने तरुण होण्याची इच्छा करतो; पण ते शक्य नसते. त्याचे मन, त्याच्या इच्छा, आशा आणि आकांक्षा तरुण असतात; म्हणून मनाला त्याच्या योग्यतेचे तरुण शरीर हवे असते. मन शेवटी म्हातार्या शरिराला सोडून जाते आणि वासनारूप दुसर्या देहामध्ये जन्म घेते.
३. मन सुख-दुःखाच्या, म्हणजे जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी गुरूंच्या उपदेशाप्रमाणे व्यायामरूपी साधना करू लागणे; परिणामी मनाचा भित्रेपणा, दुर्बलपणा, चंचलपणा इत्यादी न्यून होऊन मनाची शक्ती वाढणे
एखादा डोंबारी तोच तोच खेळ करत असतो. तो केवळ एका ठिकाणीच खेळ करत नाही, तर एका नाक्यावर खेळ करून पुढील नाक्यावर जातो आणि परत तोच खेळ करतो. त्याचप्रमाणे मन एका देहातील खेळ करून झाला की, दुसर्या देहात जाते अन् पुन्हा तोच खेळ करते. या खेळांतून जर त्या मनाला बाहेर पडायचे असेल, तर त्याला खेळ बंद करावा लागतो किंवा खेळ पालटणे त्याला भाग पडते. मनाला जेव्हा पुनःपुन्हा ‘देह धारण करणे आणि मृत्यू सहन करून नवीन देहात जाणे’, याचा कंटाळा येईल, तेव्हाच ते विचार करील की, ‘आपल्याला हा सुख-दुःखाचा खेळ तसाच चालू ठेवायचा आहे कि त्यातून लवकर सुटका करून घ्यायची आहे ? सुटकेसाठी काय करायचे ?’, याचा विचार मग ते करू लागते. त्यासाठी मग ते मन सूज्ञ माणसाच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजेच गुरूंच्या उपदेशाप्रमाणे व्यायामरूपी साधना करू लागते.
अर्थात् या व्यायामाचा आपल्याला उपयोग होतो कि नाही, हे काही काळानंतरच समजू शकते. माणूस शारीरिक व्यायाम करू लागला की, लगेच बलवान होत नाही, तर थोड्या दिवसांनी त्याचे शरीर सुडौल होते. त्याचा उत्साह आणि शक्ती वाढते; पण इतर लोकांच्याही लक्षात येण्याइतकी सुदृढता येण्यासाठी काही काळ जावा लागतो. आपण मनाचा व्यायाम केल्यावर ‘आपल्या मनाचा भित्रेपणा, दुर्बलपणा आणि चंचलपणा इत्यादी गेले आहेत अन् मनाची शक्ती वाढली आहे’, हे आपल्या लक्षात येऊ लागते. मनाच्या व्यायामाने मन उत्साही होते. मन सशक्त असेल, तर आपल्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडची कामेही माणूस मनाच्या शक्तीने करू शकतो.
४. मन समर्थ करण्यासाठी व्यायाम प्रकार केल्यास ते सर्व परिस्थितीत निरोगी रहाते !
ज्या माणसाच्या शरिराने त्याच्या मनावर नियंत्रण मिळवले नसेल, त्याला आपण आळशी म्हणतो. शरिराला जर सदासर्वदा सुस्त पडून रहाण्याची सवय जडलेली असेल, तर त्या माणसाचे मनही आळशी बनते. काहींना आडवे पडून वाचण्याची, नाहीतर काम नसल्यावर नुसते लोळत रहाण्याची सवय असते. अशा सवयींमुळे मनही सुस्त होते; पण ज्यांचे शरीर नित्य उत्साहाने कार्यरत असते, त्यांचे मनही उत्साही आणि क्षमतापूर्ण असते. मन समर्थ करण्यासाठी कोणते उपाय किंवा कोणते व्यायाम करायला पाहिजेत ? मनाचे काही प्राथमिक व्यायाम प्रकार पुढे दिले आहेत.
१. आरंभी अर्धा-एक मिनिट आपण एखाद्या संथ तेवणार्या दिव्याच्या ज्योतीकडे सतत पहाण्याचा प्रयत्न करावा. तो वेळ हळूहळू वाढवत जावा.
२. डोळे मिटून स्वस्थ बसावे आणि ‘मनात कोणकोणते विचार येतात ?’, याकडे तटस्थपणे लक्ष द्यावे.
३. राग, लोभ, मत्सर इत्यादी विकार आपल्या मनात येतात. ते उत्पन्न होताक्षणीच त्यांची जाणीव व्हावी, यासाठी त्या विकारांकडे साक्षीभावाने पहावे.
४. आपल्याला दुःख होते किंवा आपल्याला सुख वाटते, त्या वेळी आपण त्या दुःखाकडे किंवा सुखाकडे अलिप्तपणे पाहू शकतो कि नाही, यासाठी प्रयत्न करावा.
५. जेव्हा जमेल, तेव्हा २ मिनिटांपर्यंत आपल्या शरिराचा कोणताही अवयव न हलवता स्वस्थ बसण्याचा प्रयत्न करावा.
६. सतत मनात कोणते तरी नाम घेत रहावे. धार्मिक साधना म्हणून हा जप करायचा नसून ‘मन सतत एकाच शब्दावर स्थिर होते कि नाही ?’, हे पहायचे आहे.
वर दिलेल्या मनाच्या व्यायाम प्रकारांचा सराव केल्यास आपण कोणत्याही प्रसंगी गडबडून न जाता कठीण प्रसंगालाही धैर्याने तोंड देऊ शकतो. आपल्या घरात आणि समाजात अनेक लहान-मोठे अन् प्रिय-अप्रिय प्रसंग घडतात. संसारात कसोटीचे प्रसंग येतात, तरी आपले मन प्रसन्न आणि समर्थ रहाते. आपण निराश होत नाही. ‘मनाच्या या व्यायामांनी आपले मन सर्व परिस्थितीत निरोगी राहील’, असा मला विश्वास वाटतो.’
– योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (साभार : मासिक : ‘श्रीगजानन आशिष’, जुलै २०१०)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !