कोकणाविषयी सकारात्मक सूत्रे समाजमाध्यमांतून समोर आणा ! – सुशील कुलकर्णी  

दैनिक ‘सकाळ’च्या राजेंद्र बाईत यांना कर्‍हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार प्रदान

कर्‍हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कार राजेंद्र बाईत यांना प्रदान करतांना सुशील कुलकर्णी. सोबत माधव हिर्लेकर आणि डॉ. शरद प्रभुदेसाई,

रत्नागिरी – महाराष्ट्रात शिक्षित कुटुंबांची संख्या, टीव्ही आणि ‘स्मार्ट मोबाईल’ वापरणार्‍यांची संख्या पहाता भविष्य हे ‘डिजिटल’मध्ये आहे. त्यामुळे कोकणाविषयी चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणे आवश्यक आहे. महामार्ग रखडला, खड्डे पडले, हेच सारखे सारखे सांगितल्यामुळे कोकणकडे पर्यटकही पाठ फिरवतात. यातून कोकणची हानी होते. कोकणाविषयी अनेक विषय समाजमाध्यमांतून येण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कोणते रस्ते चालू आहेत, वाहतूक व्यवस्था, सण, संस्कृती, निसर्ग पर्यावरण अशा अनेक गोष्टी प्रसारित करता येतील. याकडे सार्‍यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन ‘यू ट्यूबर’ सुशील कुलकर्णी यांनी केले.

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघ आणि के.जी.एन्. फाऊंडेशनच्या वतीने राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमात दैनिक ‘सकाळ’चे राजापूर येथील पत्रकार राजेंद्र बाईत यांना दर्पण पुरस्कार वितरण श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी के.जी.एन्. आणि कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, डॉ. शरद प्रभुदेसाई, चंद्रकांत हळबे, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, ऋचा जोशी, सुयोगा जठार, दिलीप ढवळे, प्रमोद कोनकर, उमेश आंबर्डेकर, सौ. निता कुवळेकर आणि शिल्पा पळसुलेदेसाई आदी उपस्थित होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने दोन दिवशीय व्याख्यानमालेची सांगता झाली.

सुशील कुलकर्णी बोलतांना 

या वेळी सुशील कुलकर्णी म्हणाले की,

१.  पत्रकारांचा सन्मान सामाजिक संस्थांनी करणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर किंवा केसरी, मराठाचे लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांच्या विरोधात आणि भारतियांच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन वृत्तपत्र चालवले होते; परंतु ज्यांना धंदा करायचा त्यांनी ‘पत्रकार नेहमी तटस्थ असला पाहिजे’, असे बोलायला सुरवात केली. आज राष्ट्रहितासाठी पत्रकारांनी योगदान दिले पाहिजे.

२. आजचे प्रचंड मोठे डिजिटल जग सर्वांसाठी खुले आहे. येथे विचार मांडता येतात. यू ट्यूबच नव्हे, तर व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशी अनेक समाजमाध्यमे तुम्हाला वापरता येतील. तरुण मुले समाजमाध्यमांचा वापर भरपूर करत आहेत. त्यामुळे चांगल्या, सकारात्मक गोष्टी पोचवण्यासाठी लोकांनी सक्रीय व्हावे. हे करण्यास अनेकांची मानसिकता नाही, तुम्ही स्वतः पत्रकार व्हा. ‘ब्रेकिंग’ बातमी समाजमाध्यमातून ‘व्हायरल’ होते. त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करावा.

३. कोकणात आल्यावर थांबायचं कुठे ? खायचं काय ? कुठून प्रवास केल्यावर अख्खे कोकण पाहू शकेन, कोणत्या घाटात काम चालू आहे, व्यवसाय कोणते ? रोजच्या येणार्‍या माणसांना कोकणाविषयी सकारात्मक माहिती देण्याची आवश्यकता आहे.

४. एक ट्रक ड्रायव्हर प्रतिदिन व्हिडिओ करतो. आज सकाळी निघालो, हा रस्ता सुरेख आहे, आता मी जेवण तयार करणार आहे, ही गोष्ट इथे चांगली आहे, असे अनेक प्रकारचे व्हिडिओ करतो. करोडो लोक हे बघतात. तो कधीही नकारात्मक तक्रारीचा सूर लावत नाही. जे दाखवेल ते सकारात्मकच. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग पुष्कळ आहे, याचा विचार करून डिजिटल माध्यमांचा उपयोग करावा.

कर्‍हाडे ब्राह्मण संघाने दिलेला पुरस्कार उमेद वाढवणारा ! – राजेंद्र बाईत

सत्काराला उत्तर देतांना राजेंद्र बाईत म्हणाले की, गेली २० वर्षे ‘सकाळ’मध्ये सामाजिक, पर्यावरण, संस्कृती यांविषयी विविध प्रकारचे लेखन केले. याकरता कोल्हापूरचे निवासी संपादक निखील पंडितराव यांचे मार्गदर्शन आणि सहकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाले. कोणताही प्रस्ताव न मागवता रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाने दिलेला हा पुरस्कार माझी उमेद वाढवणारा आहे. अनेक मार्गदर्शक, सहकारी आणि कुटुंबीय यांच्यामुळेच आजवरची ही वाटचाल यशस्वी करता आली आहे.