१ कोटी ३१ लाख १४ सहस्र ८५० रुपयांचा दंड आकारला !

  • मुंबईत वाहतूक पोलिसांची ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम  

  • २११ मद्यपी चालक कह्यात  

  • १३ सहस्र ७५२ जणांकडून दंड वसूल

मुंबई – ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही मोहीम राबवली होती. वाहतुकीचे नियम धुडकावणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणार्‍या २११ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले. एकूण १ कोटी ३१ लाख १४ सहस्र ८५० रुपयांचा दंड ‘ई-चलना’द्वारे आकारला आहे. शिरस्त्राण (हेल्मेट) न वापरणे, दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, चुकीच्या मार्गावरून वाहन चालवणे, आसनपट्टा (सीटबेल्ट) न लावणे, वेगाने गाडी चालवणे आणि सिग्नल तोडणे, आदींची छायाचित्रे काढून १३ सहस्र ७५२ जणांकडून दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांनी आधीच जनजागृती केली असतांनाही अनेक चालकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले होते. पोलिसांनी रात्रभर पहारा दिल्याने अपघातांच्या घटना टळल्या.

संपादकीय भूमिका

आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय ! शिस्तीचे पालन करणे हे नागरिकांच्या तत्त्वातच बसत नाही. अशांकडून दंड आकारण्यासह त्यांना कठोर शिक्षाही व्हायला हवी !