Assam Violence : आसाममध्ये आदिवासींनी केलेल्या हिंसाचारात २ जण ठार, तर ३८ पोलीस घायाळ

गौहत्ती (आसाम) – आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी आदिवासींनी केलेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ पोलिसांसह ४५ जण घायाळ झाले. २५ वर्षीय सुरेश डे याचा मृतदेह एका जळालेल्या इमारतीतून बाहेर काढण्यात आला, तर अथिक तिमुंग याचा मृत्यू या संघर्षाच्या वेळी झाला. हिंसाचारात अनेक दुकाने आणि वाहने यांना आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. प्रशासनाने कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. परिसरात जमावबंदी लागू असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याशी संबंधित आदिवासी आंदोलक कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यांमधील व्यावसायिक चराई राखीव आणि ग्रामीण चराई राखीव येथे बेकायदेशीरपणे रहाणार्‍या लोकांना हटवण्याची मागणी करत आहेत. यातून हा हिंसाचार होत आहे. या प्रकरणात भाजपच्या नेत्याचे घरही जाळण्यात आले.