‘करवीर निवासिनी महालक्ष्मीदेवी अखंड समवेत असून आशीर्वाद देत आहे’, याविषयी आलेली अनुभूती

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी

१. बस कोल्हापूर येथे पोचल्यावर श्री महालक्ष्मीदेवीने तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे

कु. अपाला औंधकर

‘६.१०.२०२५ या दिवशी पहाटे मी बसने गोव्याहून पुण्याला प्रवास करत होते. प्रवासात मला साधारण मध्यरात्री २.४५ ते ३.०० च्या दरम्यान जाग आली. तेव्हा मला पुष्कळ प्रमाणात देवीचे तत्त्व जाणवू लागले. माझ्याकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होऊन मला वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवली. त्यानंतर मला श्री महालक्ष्मीदेवीचे स्मरण होऊ लागले; मला प्रथम कळले नाही की, असे का होत आहे ? मी खिडकीचा पडदा उघडून ‘मी कुठे पोचले आहे ?’ हे पाहिले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, ‘गाडी कोल्हापूर येथे पोचली आहे !’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि आनंदही होऊ लागला की, ‘मी साक्षात् महालक्ष्मीच्या नगरीत आहे आणि देवीनेच तिच्या अस्तित्वाची मला जाणीव करून दिली.’

२. प्रवासात श्रीमन्नारायण आणि महालक्ष्मीमाता यांच्याप्रती भाव दाटून येऊन ते समवेत असल्याची जाणीव होणे

मध्यरात्री माझा श्रीमन्नारायण आणि माता महालक्ष्मी यांच्याप्रती पुष्कळ भाव दाटून आला. ‘प्रवासात ते माझ्या समवेतच आहेत’, असे मला जाणवले. साधारण ब्राह्ममुहूर्ताची वेळ जवळ आली होती आणि श्रीमन्नारायणाची आठवणही येत होती; म्हणून मी भ्रमणभाषवर ‘वेंकटेश्वर सुप्रभातम्’ ऐकू लागले. तेव्हा अकस्मात् ते स्तोत्र बंद होऊन ‘श्रीमहालक्ष्मी वैकुंठ सोडून करवीर येथे येते’, हा प्रसंग सांगणारे गीत माझ्या भ्रमणभाषमध्ये लागले. हे गीत माझ्या भ्रमणभाषमध्ये आधीपासूनच होते; परंतु ‘वेंकटेश्वर सुप्रभातम् बंद होऊन हे गीत कसे लागले ?’, याचे मला आश्चर्य वाटले. तेव्हा ‘करवीर निवासिनी महालक्ष्मीदेवी अखंड माझ्या समवेत आहे आणि मला आशीर्वाद देत आहे’, असे जाणवून मी कृतज्ञता व्यक्त केली.

‘श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या कृपेनेच ही दैवी अनुभूती घेता आली आणि श्री महालक्ष्मीदेवीला अनुभवता आले’, यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते !’

– परात्पर गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (वय १८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१३.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक