नवी देहली येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव पार पडल्यामुळे देहलीकरांना वेगळ्याच आध्यात्मिक-राष्ट्रीय अशा स्वरूपाचा कार्यक्रम अनुभवण्यास मिळाला. ज्या ‘भारत मंडपम्’मध्ये बहुतांश करून व्यवसाय, उद्योग आणि गुंतवणूक यांविषयीचे कार्यक्रम आयोजित केले जातात अन् काही प्रमाणात धार्मिक स्तरावरील आयोजनही केले जाते. तेथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव या धर्मतेज आणि क्षात्रतेज संक्रमित करणार्या कार्यक्रमामुळे अनेक स्तरांवर परिवर्तनाचा भाग चालू झाला आहे. त्याचे काही दृश्य परिणाम महोत्सवाच्या कालावधीतच दिसत आहेत, तर काही परिणाम आगामी काळात दिसतील.
संकलक – श्री. यज्ञेश सावंत, इंद्रप्रस्थ (नवी देहली)

देहलीत धार्मिक आणि राष्ट्रहितकारी कार्यक्रम प्रथमच !
देहलीकरांसाठी आणि विशेषत: उत्तर भारतियांसाठी हा महोत्सव अद्भुत, आध्यात्मिक, सुंदर, अवर्णनीय अशा स्वरूपाचा होता. उत्तर भारतातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ शंखनाद महोत्सवाच्या रूपाने एकत्र आले, तर देहलीतील सर्वसामान्य आणि शालेय विद्यार्थी हे शस्त्रप्रदर्शनाच्या निमित्ताने शंखनाद महोत्सवात सहभागी झाले. ३ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि ८०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना या महोत्सवाचा भाग झाल्या होत्या. त्याचप्रमाणे केंद्रशासनाचे सांस्कृतिकमंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक हे ३ मंत्री-राज्यमंत्री आणि देहली सरकारचे सांस्कृतिकमंत्री श्री. कपिल मिश्रा आणि काही प्रशासकीय अधिकारी या महोत्सवात सहभागी झाले होते. यांसह जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे मुख्य प्रवक्ते श्री. सुधांशू त्रिवेदी आणि
श्री. प्रदीप भंडारी यांनी या महोत्सवात उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच प्रदर्शनाचा लाभ घेतला. महोत्सवकाळात राष्ट्र आणि धर्मविषयक सत्रे ऐकून सभागृहाबाहेर पडणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या चेहर्यावर समाधान होते. त्यांनी सभागृहातून बाहेर पडून वरच्या मजल्यावरून खाली येईपर्यंत उत्स्फूर्तपणे दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने त्याचीच पोचपावती दिली. शंखनाद महोत्सवामुळे ज्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ भारित झाले, तसे वातावरणही भारित झाले होते.
– श्री. यज्ञेश सावंत
इंद्रप्रस्थ ते देहली प्रवास !

इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होेती. ते यमुना नदीच्या काठी वसलेले एक भव्य नगर होते. ‘आजचे पुराना किल्ला हे ठिकाण प्राचीन इंद्रप्रस्थच्या अवशेषांवर किंवा त्याच्याजवळ बांधले गेले असावे’, असे मानले जाते. महाभारत युद्धानंतर अनेक शतकांपर्यंत या प्रदेशात मोठी शहरे टिकली नाहीत. त्यामुळे ‘इंद्रप्रस्थ’ हे नाव दैनंदिन वापरातून हळूहळू नाहीसे झाले. ११ व्या शतकात, तोमर वंशातील राजा अनंगपाल याने या प्रदेशाला ‘राजधानी’ बनवून तेथे नव्याने वस्ती वसवली. या काळात या शहराला ‘ढिल्ली’ किंवा ‘ढिल्लिका’ या नावाने ओळखले जाऊ लागले. राजा अनंगपालाने राजवाड्याचा पाया रचतांना एक लोहस्तंभ रोवला. ज्योतिषाने तो शेषनागाच्या मस्तकावर स्थिर असल्याचे सांगितले. राजाने शंका घेऊन तो स्तंभ उपटला, तेव्हा मुहूर्ताची वेळ चुकली होती आणि तो स्तंभ पुन्हा व्यवस्थित बसला नाही, तो ‘ढिल्ला’ (सैल) राहिला. यावरून या शहराला ‘ढिल्ली’ हे नाव पडले. १३ व्या शतकापासून
१६ व्या शतकापर्यंतच्या मोगल काळात ‘दिल्ली’ हे नाव मोठ्या प्रमाणावर रूढ झाले. मोगलांनी या ठिकाणी ‘शाहजहानाबाद’ (जुनी दिल्ली) सारखी नवीन शहरे वसवली; पण संपूर्ण प्रदेशासाठी ‘दिल्ली’ हे नाव टिकून राहिले.
– श्री. यज्ञेश सावंत
महोत्सवातील सात्त्विकता आणि चैतन्य यांचा दृश्य परिणाम !

महोत्सवाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रदर्शनांसाठीची पायाभूत व्यवस्था श्री. सुकृत वत्स यांनी केली. त्यांचे प्रदर्शनाच्या व्यवस्था उभारण्यासाठी पूर्वीपासून सहकार्य होते. काही अधिकची कामे आल्यास ते नंतर साधकांना हात जोडून ‘थोडा वेळ द्या, मी प्रयत्न करतो’, असे सांगत. प्रदर्शनाच्या ठिकाणी विजेची कामे करण्यासाठी अन्य एका आस्थापनाला (‘वेंडर’ला) श्री. वत्स यांच्या आस्थापनाने नियुक्त केले होते. त्या आस्थापनाचे कर्मचारी काही ठिकाणची व्यवस्था करण्यास सिद्ध नव्हते. तेव्हा श्री. वत्स यांनी त्यांना सांगितले, ‘‘तुमचे पैसे आम्ही देणारच आहोत. येथे काय काम चालू आहे, हे फलकावर वाचून समजून घ्या, हे आपल्यासाठी करत आहेत, तेव्हा काही सेवा म्हणूनही कामे करा’, असे सांगून त्यांना कामे करण्यास प्रवृत्त करत होते. प्रदर्शनाचे २ दिवस संबंधित सर्व कर्मचारी टी-शर्ट, जीन्स अशा नेहमीच्या वेशभूषेत होते; मात्र शेवटच्या दिवशी पुरुष कर्मचारी सदरा-पायजमा, तर स्त्री कर्मचारी साडी नेसून आल्या होत्या.
श्री. वत्स यांनी सांगितले की, सनातन धर्माला पुढे नेण्यासाठी गोवा येथील सनातन संस्थेने पुष्कळ महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मी याचा भाग झालो, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो ! मी येथे सेवा करू शकलो, यासाठी मी कृतार्थ आहे. या ठिकाणी मला असे लोक भेटले की, जे आपल्या संस्कृतीशी अजून जोडलेले आहेत. मी कॉर्पाेरेट स्तरावर (मोठी व्यावसायिक आस्थापने) कामे करतो; पण यापूर्वी कधी असे भव्य आयोजन पाहिले नव्हते ! (हे सर्व सांगतांना श्री. वत्स यांचा भाव जागृत झाला होता.)
– श्री. यज्ञेश सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख !

अधिकोषातून निवृत्त झालेल्या एकाने सांगितले की, येथील पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी ‘ते आग्रा येथे बंदीवासात होते आणि नंतर चातुर्याने पळाले’, एवढीच माहिती दिली जाते. पेशवा कोण आहेत ? हे तर ठाऊकही नाही. ‘तुमच्या प्रदर्शनांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढे कार्य केले आहे’, हे आम्हाला समजले. आम्हाला त्यांच्याविषयी काही शिकवले जात नाही; पण पूर्ण भारतात कुठेही शिकवले जात नाही. याच व्यक्तीने सांगितले की, मी नुकताच रा.स्व. संघाशी जोडलो गेलो असून संघाच्या सामाजिक माध्यमांवरील गटांमध्ये महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे कळवले होते, त्यानुसार आम्ही सहभागी झालो.
गाझियाबाद येथील संघांशी संबंधित संस्थांकडून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले की, आम्ही आणखी स्वयंसेवकांना या कार्यक्रमाला आणले असते. जागेची अडचण असावी; म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याविषयी विचारणा केली नाही.
वैचारिक क्रांतीला महाराष्ट्रातून प्रारंभ !
देहलीत जुलमी मोगल सत्ता असतांना महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी रणशिंग फुंकले आणि हिंदवी स्वराज्याची सिंहगर्जना करून मोगल साम्राज्याला तडाखा दिला, तर पेशव्यांनी देहलीतील मोगल सत्तेचे सिंहासन उद्ध्वस्त करून आणि त्याही पुढे अटकेपार जाऊन हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. ‘शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे’, असे लक्षात येते. महोत्सवाचे मुख्य कार्य हिंदुत्वनिष्ठांना एकत्र करून त्यांना धर्माधारित राष्ट्रनिर्मितीस कृतीप्रवण करणे आहे. तेही भारताच्या राजधानीतच झाल्यामुळे या वैचारिक परिवर्तनाला गती येण्याची शक्यता आहे.
– श्री. यज्ञेश सावंत
‘आयटीसी कॅटरिंग’च्या मालकांनी अनुभवले कार्यक्रमातील वेगळेपण !

‘आयटीसी कॅटरिंग’कडून ‘भारत मंडपम्’मध्ये जेवणाची व्यवस्था केली जाते. त्यांच्या मालकांनी सांगितले की, हा कार्यक्रम अगदी वेगळा वाटला ! सनातनचे सर्व कार्यकर्ते अतिशय नम्रतेने सर्वांशी वागत होते. त्यामुळे आम्हाला तुमच्यासाठीची व्यवस्था करण्यात काही अडचण आली नाही. आम्ही तुमच्या साधकांच्या समवेत कौटुंबिक वातावरण अनुभवले !
खासगी सुरक्षा कर्मचार्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत जिज्ञासूंचे स्वागत करणे
महोत्सवाच्या ठिकाणी आणि मुख्यत्वे प्रवेशद्वाराच्या ठिकाणी नियुक्त केलेले ‘बाऊन्सर’ही (खासगी सुरक्षा कर्मचारी) २ दिवस ‘वेलकम सर’, ‘येस सर’, असे म्हणत होते; मात्र शेवटच्या दिवशी ‘जय श्रीराम’ म्हणून प्रवेशद्वाराजवळ आलेल्या जिज्ञासूंना ते अभिवादन करू लागले.
‘आयटीपीओ कन्व्हेन्शन्स सेंटर’च्या प्रमुखांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘आयटीपीओ कन्व्हेन्शन्स सेंटर’चे (‘आयटीपीओ’ म्हणजे ‘भारत व्यापार संवर्धन संघटना’ या संस्थेकडे मुख्यत्वे ‘भारत मंडपम्’चे दायित्व आहे.) प्रमुख श्री. भाटिया यांनी महोत्सवात लावलेले प्रदर्शन पाहिले. प्रदर्शन पुष्कळ चांगले वाटल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण प्रदर्शन अतिशय दुर्लभ आहे’, असा अभिप्राय त्यांनी नोंदवला.
प्रसारमाध्यमांचा उत्तम प्रतिसाद !

देहलीत राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांची कार्यालये आहेत. ‘एबीपी न्यूज’, ‘रिपब्लिक भारत’, ‘टाईम्स नाऊ’, ‘झी न्यूज’, ‘न्यूज १८’ इत्यादी महत्त्वाच्या वाहिन्यांच्या संपादकांच्या भेटीत त्यांनी महोत्सवाविषयी सकारात्मकता दर्शवली. या वेळी त्यातील काहींनी ‘गोवा येथे येऊन अधिक माहिती घेणार’, असे सांगितले आहे.

महोत्सवाच्या वार्तांकनासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि प्रादेशिक असे एकूण मिळून १२० हून अधिक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले होते. ‘रिपब्लिक टीव्ही’ने त्यांच्या ‘डिजिटल’ वाहिनीवरून प्रसारण केले, तर ‘एबीपी’ने त्यांच्या सकाळच्या वार्तासत्रात महोत्सवाचे वृत्त दाखवले. ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेने केलेले महोत्सवाचे वार्तांकन अनेक माध्यमांनी घेतले. या व्यतिरिक्त राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी कपिल मिश्रा यांचे महोत्सवातील भाषण आणि शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन यांचे वृत्त दाखवले. या वृत्तवाहिन्यांची दर्शकसंख्या कोट्यवधींच्या घरात आहे.
– श्री. यज्ञेश सावंत
महोत्सवाचा व्यापक आणि नवी देहलीला ‘सनातनमय’ करणारा प्रसार !

देहलीच्या ४० चौकांमध्ये एकूण ८० हून अधिक फलक, तर २० मेट्रो स्थानकांवर फलक लावण्यात आले होते. देहलीतील अतिशय प्रसिद्ध, राष्ट्रपती भवन, मंत्री, खासदार आणि उच्चपदस्थांची घरे असणार्या लूट्न्स भागातही महोत्सवाची विज्ञापने करणारे फलक लागले होते. त्यामुळे सनातन हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रसारानिमित्त ‘देहली झाली सनातनमय’, असे चित्र दिसून येत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या सामाजिक माध्यमाच्या गटांमध्ये महोत्सवाला उपस्थित रहाण्यासाठी ‘पोस्ट’ प्रसारित करण्यात आली होती. त्यामुळे संघाचे कार्यकर्तेही महोत्सवात सहभागी झाले. सहभागी झालेल्या एका हिंदुत्वनिष्ठाने ‘असे कार्यक्रम सतत होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या शाखेतील आणखी काही कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला बोलावले असते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
– श्री. यज्ञेश सावंत
शंखनादाचा प्रतिध्वनी भारतभरात निघून लवकरच सनातन राष्ट्र साकार होईल !
ज्या इंद्रप्रस्थावर काही शतकांपूर्वी हिंदु धर्मीय पांडव रहायचे, ती देहली मोगल इस्लामी आक्रमकांचे अनन्वित अत्याचार, बलात्कार, नरसंहार यांमुळे पतीत आणि अशुद्ध झाली होती. ती शुद्ध करण्याचे काम प्रचंड आध्यात्मिक शक्तीच्या या महोत्सवामुळे साध्य झाले ! देहलीची भूमी, देहलीचे राज्य हे अनेक शतकांमध्ये देशाच्या केंद्रीय स्थानी राहिले आहेत. देहलीत काही झाले, तर त्याचे पडसाद भारतभरात नव्हे, तर जगभरात उमटतात. त्यामुळे शंखनादाचा प्रतिध्वनी भारतभरात निघून लवकरच सनातन राष्ट्र साकार होईल, याची निश्चिती आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, इंद्रप्रस्थ (नवी देहली) (१५.१२.२०२५)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !