श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील श्री भागमप्रियाळदेवी मंदिरात दर्शन घेतले !

श्री भागमप्रियाळदेवी

रामनाथपुरम् (तमिळनाडू) – सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार येथील तिरुवेत्रियुर गावातील श्रीवलमीकनाथ समवेत श्री भागमप्रियाळदेवी मंदिरात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी दर्शन घेतले. या वेळी त्यांनी ‘भारतासह संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होऊ दे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे अन् सर्वत्रच्या साधकांचे रक्षण होऊन त्यांनाही चांगले आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना केली.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री भागमप्रियाळदेवीचे दर्शन घेतले, त्याच दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे औक्षण करावे. यामुळे श्री भागमप्रियाळदेवीचा आशीर्वाद गुरुदेवांना मिळेल’, असाही उल्लेख सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आला होता. त्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे औक्षण केले..

 

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत मंदिरात शिव आणि देवी यांना अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी मंदिराच्या पुजार्‍यांनी देवीचा प्रसाद म्हणून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हार घातला. प्रसाद म्हणून मिळालेला हा हार पायापर्यंत लांब होता. दर्शनानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते मंदिरात आलेल्या भाविकांना प्रसाद देण्यात आला.

श्री भागमप्रियाळदेवीचे महत्त्व

श्री भागमप्रियाळदेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुजार्‍यांनी प्रसादरूपी दिलेला पुष्पहार घातलेल्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्री भागमप्रियाळदेवी ही शारीरिक व्याधींच्या मुक्ततेसाठी अंतिम स्थान मानली जाते. ती तिच्या भक्तांच्या वाईट स्थितीचे रूपांतर चांगल्या स्थितीमध्ये करते, असे मानले जाते. तेथे स्थळ वृक्ष म्हणून बेलाचे झाड आहे. अनेक भक्त त्याचे दर्शन घेतात.

श्री भागमप्रियाळ मंदिराचा इतिहास !

श्री भागमप्रियाळ मंदिराचा इतिहास राजा महाबली यांच्या संदर्भातील एका आख्यायिकेवर आधारित आहे. हे मंदिर रामेश्वरम्च्या जवळ आहे. मंदिराच्या पुजार्‍यांनी सांगितलेल्या कथेनुसार महाबली राजा पूर्वजन्मी एक उंदीर होता. एके दिवशी तो उंदीर शिवाच्या मंदिरात चोरून प्रसाद खाण्यासाठी गेला. त्या वेळी मंदिरात लावलेला दिवा विझण्याच्या स्थितीत आला होता. प्रसाद खातांना उंदराकडून सहजपणे त्याच्या शेपटीच्या धक्क्याने विझणार्‍या दिव्याची वात पुढे सरकवली जाते आणि तो दिवा व्यवस्थित चालू रहातो. उंदराच्या या कृतीमुळे त्याला पुण्य मिळते; परंतु प्रसाद चोरून खाल्यामुळे त्याच्याकडून पापही झालेले असते. त्यामुळे त्याचा पुढील जन्म राक्षस कुळात होतो; पण नकळत ज्योत प्रज्वलित झाल्याच्या कृतीमधून जे पुण्य मिळालेले असते, त्यामुळे तो राजाही होतो.

राजा महाबली परम विष्णुभक्त होता. श्रीविष्णूने महाबलीला बटू वामन रूपात दर्शन दिले आणि त्याच्याकडून ३ पावले भूमी मागितली. दोन पावलांतच संपूर्ण त्रिभुवन व्यापले गेले. तिसरे पाऊल श्रीविष्णूने महाबलीच्या डोक्यावर ठेवून त्याला कायमचे पाताळात ढकलले. हे सर्व करत असतांना श्रीविष्णु व्याधीग्रस्त होतात. त्यांच्या पायाला दुखापत होते. श्रीविष्णुने तिरुवेत्रियुर मंदिराच्या वासुकी तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्याची ही जखम बरी झाली. तेव्हा श्रीविष्णूने त्या ठिकाणी असणारे शिव आणि त्याचा अंश किंवा भाग असलेली पार्वती म्हणजे भागमप्रियाळदेवीची पूजा केली; म्हणून या स्थळाला पुष्कळ महत्त्व आहे.