खेड तालुका वारकरी आणि भाविक संप्रदाय मंडळ, भरणे, खेडच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह

खेड, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – साधकाचे मन साधना करतांना पक्के असले पाहिजे. झाड लावल्यानंतर सरतेशेवटी परिपक्व फळ मिळते. सध्या साधनेकडे पुष्कळ लोक वळत नाहीत आणि वळले, तर टिकत नाहीत. मुले सुशिक्षित संस्कारित झाली पाहिजेत. पारमार्थिक साधनेचे फळ मिळण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले पाहिजेत. टाकीचे पुष्कळ घाव सोसल्यानंतरच दगडातून मूर्ती साकार होते. हिंदुत्वाची भगवी पताका फडकत ठेवण्यासाठीही पुष्कळ सहन करावे लागते, असे मार्गदर्शन पंढरपूर येथील वासकर फडाचे ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी केले. खेड तालुका वारकरी आणि भाविक संप्रदाय मंडळ, भरणे, खेडच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते.
यावर्षी मठ स्थापन केल्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असून या मठाच्या माध्यमातून राष्ट्रधर्म आणि भक्ती यांचा प्रसार सर्वत्र मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा लाभ मोठ्या संख्येने भाविक घेत आहेत. तालुक्यातील भरणे जाधववाडी येथील वारकरी मठात २७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हे कीर्तन पार पडले. ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी जगद्गुरु प.पू. संत तुकाराम महाराज यांचे अभंग मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील पुढे म्हणाले,
१. खेड येथील वारकरी मठ उत्तम बनले असून व्यवस्थाही चांगली आहे. येथून धर्माचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. प्रपंच करणारे भरपूर आहेत. राष्ट्रधर्माचे कार्य करणारे पुष्कळ अल्प आहेत. सत्तेचा उपयोग देव, देश, धर्मासाठी झाला पाहिजे.
२. आज पुष्कळ माणसे पैशाच्या मागे धावत आहेत. भगवंताप्रति प्रेम असले पाहिजे. दुभंगलेली मने एकत्र आणतो तो सप्ताह. जीवन हे क्षणभंगुर आहे ? मी कोण आहे ? हे दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
३. सीमेवरील सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. कुटुंबातील स्त्रियांचा त्याग महत्त्वाचा आहे. त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे. स्त्रिया समाधानी असतील, तर कुटुंबात चांगले वातावरण निर्माण होते. धर्मप्रचारकाला समाजाने सांभाळायचे असते.
४. अयोध्येतील प्रत्येक पात्र सहन करणारे आहे. देव, देश, धर्म यांसाठी काम करणारी पिढी उत्पन्न झाली पाहिजे. कोवळ्या वयात भगतसिंह फासावर गेले. गुटखा खाऊन किंवा चप्पल घालून आज काही ठिकाणी ध्वज फडकवला जातो, हे योग्य नाही. नेतृत्व करणार्यांकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात; म्हणून चुका करू नयेत. नेतृत्व करणार्यांने स्वच्छ वागले पाहिजे. या जगात फक्त संतच स्वच्छ आहेत.
२५ नोव्हेंबरपासून चालू झालेल्या या सप्ताहाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. याआधी परशुराम येथील ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, पेवे गुहागर येथील ह.भ.प. सचिन साळवी महाराज, देवघर येथील ह.भ.प. सदाशिव मोरे महाराज, पोसरे येथील ह.भ.प. रवींद्र म्हाब्दी महाराज यांची प्रवचने, तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज, पंढरपूर यांची कीर्तने झाली आहेत. पुढील दिवसांत ह.भ.प. चिकणेगुरुजी, खेड; ह.भ.प. शंकर महाराज जाधव वडगाव; तसेच ह.भ.प. प्रसाद महाराज दळवी, खवटी यांची प्रवचने आणि सांगली येथील ह.भ.प. मोहनकाका पाटील; देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली करंजीकर आणि पंढरपूर संस्थान येथील सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांची कीर्तने आणि २ डिसेंबरला ह.भ.प. अविनाश येसरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहसोहळ्याचा भाविकांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !