थोडक्यात महत्त्वाचे (२६.११.२०२५)

कल्याणमधील बारवर धाड !

१५ बारबालांसह २८ जणांवर गुन्हा नोंद !

कल्याण – येथील ताल नावाच्या बारमध्ये गैरप्रकार चालू असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे धाड घातली. येथील १५ बारबालांसह २८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापैकी बारचे मालक, चालक, व्यवस्थापक अशा एकूण ६ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले.


ठाणे येथील घोडबंदर भागात गॅस पुरवठा खंडित; गृहिणी संतप्त ! 

ठाणे – येथील घोडबंदर भागातील आनंदनगर, साईनगर, विजय पार्क, कासारवडवली अशा विविध परिसरातील इमारतींचा गॅसपुरवठा २४ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता अचानक ठप्प झाला. ऐन दुपारी स्वयंपाक करण्याच्या वेळी गॅस पुरवठा खंडित झाल्याने गृहिणी संतप्त झाल्या होत्या. ‘काही तांत्रिक कामांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गॅस पुरवठा खंडित करण्यात येईल’, असा संदेश ग्राहकांना पाठवण्यात आला होता, असा दावा महानगर गॅस आस्थापनाने केला.


अयोध्येत भगवा धर्मध्वज फडकताच ठाणे येथील मंदिरांमध्ये घंटानाद !

ठाणे, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते २५ नोव्हेंबरला दुपारी ११.५५ वाजता मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला. हा क्षण राष्ट्रभरातील रामभक्तांसाठी धर्मसन्मानाचा पर्वणीक्षण ठरला. ध्वज फडकताच ठाणे येथील श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या आवाहनानुसार मंदिरांसह अनेक घरांमध्ये घंटानाद चालू झाला. ११.५५ ते १२.१० अशी २० मिनिटे घंटानाद निनादत होता. येथील घंटाळी मंदिरातही भक्तांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण घंटानाद करण्यात आला.


मेट्रो-३ मध्ये तांत्रिक बिघाड; प्रवासी खोळंबले !

मुंबई – मुंबईतील पहिल्या आणि महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो-३ मध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाला. दक्षिण मुंबईतील कफ परेड स्थानकाजवळ भुयारात मेट्रो बंद पडली आहे. यामुळे प्रवाशांना काही काळ थांबावे लागले. या घटनेत कोणतीही दुर्घटना झाली नाही; मात्र मेट्रोच्या वेळेवर परिणाम झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. मेट्रोत झालेल्या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी चालू आहे.