श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी १६ देशांमध्ये ‘श्री नारायण महायज्ञा’ला प्रारंभ : मुंबईतही महायज्ञ चालू !

यज्ञकुंडाभोवती बसलेले पुरोहित आणि यजमान

मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, यासाठी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने विश्वातील १६ देशांमध्ये १५ नोव्हेंबर या दिवशी ‘श्री नारायण महायज्ञा’ला प्रारंभ झाला. मुंबईतील वरळी येथेही गांधी (जांभोरी) मैदानात या महायज्ञाला प्रारंभ झाला. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष पू. दिनेश फलाहारी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा महायज्ञ चालू आहे. सकाळी १०.३० वाजता महायज्ञाला प्रारंभ झाला.

मुंबईत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या पदाधिकार्‍यांनी या यज्ञाचे यजमानपद भूषवले. या ठिकाणी ११ यज्ञकुंडांद्वारे हवन केले गेले. १५ आणि १६ नोव्हेंबर असे २ दिवस हा महायज्ञ होणार आहे. या वेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री डॉ. उपेंद्र डहाके, मुंबईचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. शंकर वराडकर, राष्ट्रीय महामंत्री श्री. पराग फडणीस, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अनघा बेडेकर, महाराष्ट्राचे संघटन महामंत्री श्री. विशाल रोहणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘शिवगर्जना प्रतिष्ठान’च्या वतीने कार्यक्रमस्थळी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन !

मुंबई – तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन कार्यरत व्हावे, यांसाठी ‘शिवगर्जना प्रतिष्ठान’च्या वतीने कार्यक्रमस्थळी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. शिवकालीन नाणी, वाघनखे यांसमवेत विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, कट्यारी, ढाल, धनुष्यबाण, खंजीर, कुर्‍हाड यांसह अनेक शस्त्रास्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेली प्रदर्शने आणि विक्री केंद्र

कार्यक्रमस्थळी दैनिक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा कक्ष, सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन अन् विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’च्या वतीने देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या उत्पादनांचे विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. यासमवेत श्री आसारामजी बापू आश्रम, जीवनविद्या मिशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इस्कॉन आणि अन्य संघटना यांच्या वतीने ग्रंथ वितरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भगवंताच्या कृपेने श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त होईल ! – पू. दिनेश फलाहारी महाराज, अध्यक्ष, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास

मोगल शासकांनी तलवारीच्या बळावर श्रीकृष्ण जन्मभूमी कह्यात घेतली. सध्या जे मोगलांचे वंशज आहेत, त्यांच्याकडे या भूमीचा कोणताही पुरावा नाही. याउलट श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाने वीजदेयक, पाण्याचे देयक यांसह सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आमचा न्यायालयीन लढा चालू आहे. या कार्याला यश प्राप्त व्हावे, यासाठी ‘श्री नारायण महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. औरंगजेबाने वर्ष १६७० मध्ये श्रीकृष्ण मंदिर अवैधरित्या कह्यात घेतले आणि त्यावर कथित मशीद बांधली. आजही श्रीकृष्ण जन्मभूमीच्या सवा २ एकर भूमीवर कथित मशीद आहे. श्रीकृष्णाचे जन्मस्थान, म्हणजेच मंदिराचे गर्भगृह या कथित मशिदीच्या खाली आहे.

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान प्राप्त केल्याविना रहाणार नाही ! – प्रियाकिशोरी भारद्वाज, आंतरराष्ट्रीय प्रचारक, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान हिंदूंच्या कह्यात नसणे, हा सनातन धर्मासाठी मोठा वेदनेचा विषय आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्वांचे गुरु आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या स्थानाचे उत्खनन केल्यास त्या ठिकाणी मंदिराचे आणखी अवशेष मिळतील. भगवान श्रीकृष्णाचे हे जन्मस्थान आम्ही प्राप्त केल्याविना रहाणार नाही.