High-Altitude Mono Rail : अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याने १६ सहस्र फूट उंचीवर ‘मोनोरेल’ चालू केली !

  • सैन्याच्या ‘गजराज पथका’ची कामगिरी

  • पर्वतीय भागात साहाय्य पोचण्यास सुलभ होणार

अरुणाचल प्रदेश – भारतीय सैन्याच्या ‘गजराज कॉर्प्स’ने (गजराज पथकाने) एक ‘इनहाऊस हाय अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम’ विकसित केली आहे. अरुणाचल प्रदेशाच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात १६ सहस्र फूट उंचीवर ही मोनोरेल (छोटी आधुनिक रेल्वेगाडी) चालवण्यात आली. यामुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोचवता येणे शक्य होणार आहे.

सैनिकांचा वेळ आणि श्रम वाचणार, धोका न्यून होणार !

ही नवीन प्रणाली भारतीय सैन्याला हिमालयाच्या कामेंग प्रदेशात साहित्याचा पुरवठा करण्यास साहाय्य करत आहे, जिथे रस्ते किंवा अन्य वाहने उपलब्ध नाहीत. पर्वतांमधील अरुंद रस्ते, सैल खडक, अनपेक्षित हवामान आणि मर्यादित ऑक्सिजन, यांमुळे लहान अंतरही लांब आणि कठीण वाटते.

अनेकदा सैनिकांना विविध आवश्यक वस्तू त्यांच्या पाठीवर वाहून न्याव्या लागत होत्या. त्यासाठी वेळ आणि कष्ट घ्यावे लागत होते. आता मोनोरेलमुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाचणार असून धोकाही न्यून होणार आहे.