संपादकीय : अमेरिकाच ‘मास्टरमाईंड’ !

जो बिडेन आणि शेख हसीना

साधारण सव्वा वर्षापूर्वी बांगलादेशात झालेला हिंसाचार आणि त्यामुळे झालेला सत्तापालट यांमागची एक-एक गुपिते आता बाहेर येत आहेत. ज्यांच्या विरोधात हा हिंसाचार झाला, त्या बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री असदुज्जमान खान यांनी या घटनेमागे अमेरिका अन् पाकिस्तान यांचा हात असल्याचे जे सत्य उघड केले आहे, ते स्वीकारायचे कि नाकारायचे ?, हा बांगलादेशातील नागरिकांचा प्रश्न आहे; पण ‘ही परिस्थिती भारतासाठी मात्र भविष्यातील धोक्याची घंटा आहे’, हे भारतियांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. असदुज्जमान खान यांच्या म्हणण्यानुसार हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने, म्हणजेच ‘सीआयए’ने दीर्घकाळापासून मोठे षड्यंत्र रचले होते. हे काम इतक्या गुप्तपणे चालले होते की, स्वतः हसीना यांना त्याचा जराही मागमूस लागला नाही. हे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी अमेरिकेने शेख हसीना यांचे नातेवाईक असलेले सैन्यदलप्रमुख वकार-उज-जमाँ यांनाच फुटीर बनवले आणि त्यांच्या माध्यमातून हसीना यांची सत्ता उलथवून लावली. खरेतर बांगलादेशातील सत्तापालटाची अमेरिकाच ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) असल्याचे आता जरी अधिकृतपणे उघड झाले असले, तरी ही गोष्ट तशी सर्वांनाच ठाऊक होती; कारण एका विद्यमान पंतप्रधानाला देशातून हाकलून लावून त्याची सत्ता उलथवण्याची शक्ती बांगलादेशात कधीच नव्हती. मग प्रश्न हा पडतो की, अमेरिकेने हे कृत्य कशासाठी केले ? आणि तिने त्यातून काय मिळवले ? अमेरिकेचा दक्षिण आशियातील रस कधी लपून राहिलेला नाही. ‘चीन आपल्याला आज ना उद्या अडचणीत आणून महासत्ता बनेल’, अशी भीती अमेरिकेला आहे. त्यामुळे चीनला शह देण्यासाठी त्याच्या शेजारी देशांत अस्थिरता निर्माण करणे, हा अमेरिकेच्या युद्धनीतीचा भाग आहे. अमेरिकेला चीनचा दक्षिण आशियातील वाढता प्रभाव न्यून करण्यासाठी त्याच्यावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिकेने बांगलादेशाकडे ‘सेंट मार्टिन बेट’ देण्याची मागणी केली होती. त्यास तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी ठामपणे नकार दिला आणि तेथेच त्यांच्या गच्छंतीची पायाभरणी झाली. भौगोलिकदृष्ट्या हे बेट अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण ते जगाच्या कोणत्याही भागातून समुद्री मार्गाने सहज गाठता येते. हा भाग रणनैतिकदृष्ट्याही अतिशय संवेदनशील आहे. या बेटावर नियंत्रण मिळवल्यास तेथून चीनवर लक्ष ठेवणे अमेरिकेला सोपे जाणार आहे. हसीना यांनी ते हसत-हसत न दिल्याने अमेरिकेने ते अशा प्रकारे हिसकावून घेतले.

अमेरिकेचा हा उद्देश इथपर्यंतच मर्यादित असता, तर एक वेळ ठीक होते; परंतु अमेरिकेचा एक डोळा भारताच्या वाढत्या सामर्थ्यावरही आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण उपरोल्लेखित बेटावरून जसे चीनवर लक्ष ठेवता येते, तसेच भारतावरही लक्ष ठेवता येते. त्यादृष्टीने अमेरिकेने बांगलादेशात केलेली कारवाई भारतासाठी गंभीर चेतावणी आहे. अमेरिकेची तिरकी चाल, चीनचा विस्तारवाद आणि पाकचा आतंकवाद, अशा तिहेरी कचाट्यातून देशाला सोडवण्यासाठी आगामी काळात भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा कस लागणार आहे. अमेरिकेने स्वतःचा स्वार्थ साधण्यासह एका दगडात ३ पक्षी मारण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी चीन त्याच्या भात्यातून आता कुठले शस्त्र काढणार ?, हेही पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘सेंट मार्टिन बेट’

पाकिस्तानचा चीनशी द्रोह !

या सर्व घटनाक्रमात खरा प्रश्न हा आहे की, पाकिस्तानने चीनच्या विरोधात जाऊन अमेरिकेला साहाय्य कसे केले ? अमेरिकेला बांगलादेशातील कारवाई पाकिस्तान्यांच्या पाठिंब्याविना तशी शक्य नव्हती. पाकिस्तान भारताविरुद्ध लढण्यासाठी चीनकडूनच अधिक प्रमाणात रसद मिळवतो. ही रसद पुरवतांना ‘अमेरिकेच्या तालावर नाचायचे नाही’, अशी चीनची पाकसाठी अघोषित अट असते. त्याचे उल्लंघन करत चीनला धोका देऊन पाकिस्तानने अमेरिकेला साहाय्य करणे, हे चीनला निश्चितच अस्वस्थ करणारे आहे.  सध्या पाकिस्तानला भारताच्या विरोधात चीनच्या साहाय्याची आवश्यकता आहे; पण त्याच वेळी त्याला अमेरिकेची हांजी-हांजी करून अमेरिकेलाही खुश ठेवायचे आहे. अशा त्रिकोणी प्रेमसंबंधांचे परिणाम किती वाईट असतात ?, हे पाकिस्तानला लवकरच कळेल. दुसरीकडे ‘आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानला साहाय्य करून काहीच मिळणार नाही’, हे ठाऊक असूनही अमेरिका किंवा चीन केवळ भारताला शह देण्यासाठी पाकला साहाय्य करत आहेत. यासाठी या दोघांकडेही अापण शत्रू म्हणून पाहिले पाहिजे. चीन तर भारताचा उघड शत्रू आहेच; पण अमेरिका त्यापेक्षा अधिक घातक शत्रू आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेतले पाहिजे. ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला’, याप्रमाणे ‘आधीच अमेरिका त्यात ट्रम्प अध्यक्ष’ असल्यानेही भारतासमोरील संकट आणखी गडद झाले आहे. हे असेच चालू राहिले, तर भविष्यात भारताची स्थिती अवघड होऊ शकते.

भारताकडून आक्रमकताच अपेक्षित !

डॉनल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग

असे होऊ द्यायचे नसेल, तर एक राष्ट्र म्हणून भारताला रोखठोक भूमिका घ्यावी लागेल. समस्येच्या कारणांचा शोध घेऊन ती नष्ट करणे, हाच समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय असतो. त्याप्रमाणे अमेरिका आणि चीन ज्या पाकिस्तानचा भारताविरुद्ध प्यादे म्हणून वापर करतात त्या पाकला नष्ट करणे, हा आज अवास्तव; पण उद्या अपरिहार्य वाटणारा उपाय योजावाच लागणार आहे. त्यासाठी एक ‘ऑपरेशन सिंदूर’ करून उपयोगी नाही, तर पाकिस्तान आणि त्याचे जिहादी जाळे यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत सैनिकी मोहीम चालवायला हवी, तसेच त्याच वेळी अंतर्गत शत्रूंचाही चोख बंदोबस्त करावा लागेल. आता वेळ आली आहे की, आपण शब्दांपेक्षा कृतीतून आपली आक्रमकता वारंवार दाखवून दिली पाहिजे. चर्चेतून जर प्रश्न सुटत असते, तर ७८ वर्षांत ते सुटायला हवे होते; पण शत्रूला ती भाषाच समजत नसेल, तर आपलाही नाईलाज आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरण केवळ कागदावरचे नसावे, तर त्याला कृतीतील शौर्याची जोड असावी. ‘युद्ध नेहमी शत्रूच्या भूमीत लढायचे असते’, या धोरणानुसार जर अमेरिका आणि चीन भारताविरुद्ध कारवाया करत असतील, तर हेच धोरण भारतानेही त्यांच्या संदर्भात अंगीकारणे आवश्यक आहे. स्वावलंबित्व, सुसज्ज गुप्तचर यंत्रणा, रोखठोक परराष्ट्र धोरण आणि धडक कृती, ही चतुःसूत्री भारताची प्रबळ शस्त्रे आहेत. या शस्त्रांच्या आधारे शत्रूला नेस्तनाबूत करूनच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण होऊ शकते. थोडक्यात आज संकट बांगलादेशावर आहे; पण उद्या त्याचे परिणाम भारतावर होणार आहेत, हे लक्षात घेऊन अगोदरच कृती करणे, यातच देशहित आहे !

चीन भारताचा उघड शत्रू, तर अमेरिका त्यापेक्षा अधिक घातक शत्रू आहे, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक !