मुसलमान पुरुषाला दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीची अनमुती घ्यावी लागेल ! – Kerala High Court

कुराण आणि इस्लामी कायदे यांतही याचा उल्लेख असल्याचे उच्च न्यायालयाने केले स्पष्ट !

नवी देहली – एखादा मुसलमान पुरुष पहिला विवाह अस्तित्व असतांनाच दुसर्‍या विवाहाची नोंदणी करावयास इच्छित असेल, तर त्या प्रक्रियेपूर्वी त्याची पहिली पत्नी याविषयी सहमत आहे कि नाही ?, हे जाणून घेणे आवश्यक आहे, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भातील याचिकेत एका पुरुषाने आणि त्याच्या दुसर्‍या पत्नीने राज्य सरकारला त्यांचा विवाह नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली; कारण पहिली पत्नी या प्रकरणात पक्षकार नव्हती.

१. न्यायालयाने म्हटले की, मुसलमान कायद्यानुसार दुसरे लग्न काही विशिष्ट परिस्थितीतच मान्य आहे. पहिली पत्नी केवळ प्रेक्षक बनून राहू शकत नाही. अशा परिस्थितीत धार्मिक नियमांपेक्षा राज्यघटनेने दिलेले अधिकार प्राधान्याने मान्य असले पाहिजेत. म्हणूनच दुसर्‍या विवाहाच्या नोंदणीच्या संदर्भात परंपरागत कायद्याऐवजी घटनात्मक न्यायाचा विचार होईल. पहिल्या पत्नीच्या भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत.

२. न्यायालयाने स्पष्ट केले की, विवाह नोंदणी अधिकारी दुसर्‍या विवाहाच्या वेळी पहिल्या पत्नीचे म्हणणे ऐकू शकतात. जर ती दुसरे लग्न अवैध असल्याचे सांगत असेल, तर तो विषय नागरी न्यायालयाकडे पाठवला जाऊ शकतो.

कुराण किंवा मुसलमान कायदा यांत अनुमती नाही !

न्यायमूर्तींनी नमूद केले की, पवित्र कुराण किंवा मुसलमान कायदा यांतही पहिली पत्नी जिवंत आणि वैवाहिक नात्यात असतांना तिच्या माहितीविना दुसर्‍या स्त्रीशी संबंध ठेवण्यास मान्यता नाही. त्यामुळे दुसर्‍या विवाहाच्या वेळी पहिल्या पत्नीला तिचा पक्ष मांडण्याची संधी मिळालीच पाहिजे. ९९.९९ टक्के मुसलमान महिला त्यांच्या विवाहाच्या काळात पतीच्या दुसर्‍या लग्नाला मान्यता देणार नाहीत.

संपादकीय भूमिका

उच्च न्यायालयाचा हा निर्णय मुसलमान मान्य करतील का ? जर मुसलमानांच्या धार्मिक गोष्टींमध्येच या संदर्भातील उल्लेख आहे, तर त्याचे पालन केले जात नाही, असेच म्हणावे लागेल !